मिशन ऑलिम्पिक : गोली मार भेजेमें...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jul-2021
Total Views |

Tokyo_1  H x W:
टोकियो (संदीप चव्हाण) : ‘सत्या’ सिनेमातील ‘गोली मार भेजेमें... के भेजा शोर करता हैं...’ हे गाणे ‘सुपरडूपर हिट’ झाले होते. पण सध्या हे गाणे भारतीय नेमबाजी महासंघाचे शीर्षक गीत बनले आहे. ऐन ‘ऑलिम्पिक’मध्ये नेमबाजीचा खेळ सुरु असताना शूटिंग महासंघात मात्र ‘संगीत मानापमान’ रंगले आहे. हेही एक कारण आहे की, खेळाडूंच्याही एकाग्रतेचे तीन-तेरा वाजले आहेत. नेमबाज पात्रता फेरीत चांगला खेळ करत आहेत, पण पदाधिकार्‍यांच्या या शोरबाजीमुळे ऐन ‘फायनल’मध्ये अवसान घातकी खेळ करताहेत. दुसरीकडे महासंघाचे अध्यक्ष ‘राजर्षि’ रणीनंदर सिंग ऑलिम्पिकच्या स्टेडियममध्ये उभे राहून भारतीय नेमबाजांच्या अपयशास त्यांच्या प्रशिक्षकांना जबाबदार धरत आहेत. नेमबाजीत कुणाचीही हुकूमशाही खपून घेतली जाणार नाही, हे काही चीन नाही, अशी दमबाजी करतात. रणिनंदर हे पंजाबचे मुख्यमंत्री अमिरिंदर सिंग यांचे सुपुत्र. राजघराण्याचा वारसा असल्याने राजेशाही गेली, तरी अजूनही थाट कायम आहे. टाळी वाजवली की, हुजरे हजर झाले पाहिजे, असा रुबाब. थोडक्यात, नेमबाजी महासंघातही अनेक हुजरे आहेत. जे स्पष्ट बोलतात त्यांचा काटा काढला जातो.
 
 
 
आता हेच पाहा, नेमबाजीत आपल्याला सर्वाधिक ‘मेडल’ची अपेक्षा यंदा पिस्तुल प्रकारात आणि रायफलमध्ये होती. 2000च्या मार्चमध्ये दिल्लीत झालेल्या ‘वर्ल्ड कप’पर्यंत जसपाल राणा भारतीय संघाचा कोच होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय ज्युनियर संघाने दिग्विजय संपादन केला. मनू बाकर ही आघाडीची शूटर त्यापैकीच एक. परंतु, नंतर दोघांत दिल्लीतील ‘वर्ल्ड कप’नंतर बेबनाव झाला आणि मग मनूने निवड केली रौनक पंडितची. तीही ‘ऑलिम्पिक’ला अवघे तीन महिने असताना. रौनक एकेकाळी स्वत: नेमबाज होता. नेमबाज हीनाशी त्याने लग्न केले आणि मग तो तिचा अधिकृत कोचही झाला. या ‘ऑलिम्पिक’मध्ये हीना खेळत नाही. असो तर अशाप्रकारे रौनक ‘ऑलिम्पिक’साठी ‘इन’ झाला, पण त्यामुळे जसपाल राणाचा ‘ऑलिम्पिक’ला येण्याचा पत्ता कट झाला आणि येथून कडवट सुरु झालीय. राणा परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. मनू आणि राणा जुळवून घेण्यास तयार नाहीत म्हटल्यावर ऐनवेळी टोकियोसाठी रौनकची वर्णी लागली. जगातील सर्वोच्च अशा लढतीपूर्वी नेमबाजी महासंघातील हा महागोंधळच अखेर खेळाडूंच्या अपयशी कामगिरीस कारणीभूत ठरला. संगीतात जशी चांगल्या अर्थाने ‘घराणी’ असतात, तशी आता शूटिंगमध्ये वाईट अर्थाने घराणेशाही निर्माण झाली आहे. खेळाडू जेव्हा खेळापेक्षा मोठा होतो तेव्हा तो तर हरतोच, पण त्याच्यासोबत त्याचा खेळ आणि देशही हरतो. मनू बाकर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
 
 
 
आज मिश्र दुहेरीत एकीकडे तिचा सहकारी सौरभ चौधरी २९६ गुणांची कमाई करत होता तेव्हा मनू बाकर मात्र २८६ पर्यंतच मजल मारू शकली होती. तरीही सौरभच्या खेळाच्या जोरावर या भारतीय जोडीने पात्रता फेरीचा पहिला अडथळा पार केला आणि तोही अव्वल येत. ५८२ गुणांसह पात्रता फेरीचा नवा ‘ऑलिम्पिक रेकॉर्ड’ त्यानी नोंदवला. दुसर्‍या पात्रता फेरीत त्यांना ‘मेडल’ नक्की करण्यासाठी एकूण आठ संघात फक्त पहिल्या चार खेळाडूंत यायचे होते. पण मनू बाकरचा खेळ ढेपाळला. सौरभ एकीकडे ९६ आणि ९८ गुणांची कमाई करत असताना मनू बाकर मात्र ९२ आणि ९४ गुणांची कमाई करू शकली. त्यामुळे भारताला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. नेमबाजीतील या भाऊबंदकीचा सौरभला सर्वाधिक फटका बसला. वैयक्तिक आणि मिश्र अशा दोन्ही प्रकारात पात्रता फेरीत अव्वल येऊनही पदकाने त्याला हुलकावणी दिली. जसपाल राणा टोकियोत असता तर आपण मेडल जिंकू शकलो असतो का ? केवळ तीन महिन्यांच्या अवधीत नवा कोच रौनक पंडितकडून खूप अपेक्षा करतोय का? अजून महाराष्ट्राच्या राही सरनौबत आणि तेजस्विनीचा खेळ बाकी आहे, अशावेळी कोचेसवर कारवाई करू, असा फतवा काढण्याची रणीनंदर सिंगला खरेच गरज होती का? रणिनंदर सिंग म्हणतात, तसे खरेच नेमबाजीत हुकूमशीही आहे का? असे अनेक प्रश्न घेऊन टोकियो ‘ऑलिम्पिक’मधील असा ‘शूटिंग रेंज’मधून टळटळीत उन्हात भर दुपारी बाहेर पडलो तेव्हा डोक्याचा अक्षरश: भुगा पडला होता. अगदी ‘सत्या’ सिनेमातील गाण्यासारखे हे सगळे लिहून माझा भेजा आणि हे वाचून तुमचाही भेजा शोर करू लागला असेल. टोकियो ‘ऑलिम्पिक’च्या पदकांवरील चुकलेला नेम आता भारतीय नेमबाजीत कुणाचा बळी घेतो, ते पाहायचे...
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@