सावरकरांची क्षमापत्रे : आक्षेप आणि वास्तव

    दिनांक  27-May-2021 19:08:07   
|
Veer Savarkar _1 &nbज्यांना राजकीय कूटनीती म्हणजे काय हे माहीत नाही, तेच कदाचित सावरकरांच्या या तथाकथित क्षमापत्रांना सावरकरांची शरणागती समजत असावेत किंवा सावरकरांनी तेव्हा शत्रूला फसवण्यासाठी, त्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी रचलेल्या सापळ्यात सावरकरविरोधक अडकले असावेत. चाणाक्ष शत्रू म्हणजे ब्रिटिश फसले नाहीत. पण, तथाकथित बुद्धिवादी यात फसले असावेत.

‘सावरकर इंग्रजांची क्षमा मागून अंदमानातून सुटले! नुसती क्षमा मागून नाही तर ‘मी राजकारणात भाग घेणार नाही व माझी चौकशीही पुष्कळ चांगली झाली व शिक्षाही अधिक न्याय्य झाली हे खरे आहे,’ अशी सपशेल शरणागती पत्करून सुटले व याचे पुरावे नवी दिल्लीच्या ‘शासकीय अभिलेखागारात’ उपलब्ध आहेत.’ अशाप्रकारे सावरकरांवर सदैव आरोप केला जातो. ज्या व्यक्तीने सावरकर चरित्र अभ्यासले आहे किंवा निदान ‘माझी जन्मठेप’ हे सावरकरांचे अंदमानातील कारावासावर आधारित आत्मचरित्र वाचले आहे, त्यांना या आरोपातील फोलपणा त्वरित लक्षात येईल.
 
 
 
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटिशांच्या तुरुंगात खितपत पडणे ही काही सावरकरांची देशभक्तीची कल्पना नव्हती, ते त्यांचे ध्येयही नव्हते. “सावरकरांसारखी उत्कट चैतन्यमय व्यक्ती कारागारात जीवन कंठीत असलेली मी सहनच करू शकत नाही,” असे सावरकरांचा आंग्ल-मित्र डेव्हिड गार्नेटचेही मत होते. “कारागृहात राहून जे करता येत आहे, त्याहून काही तरी अधिक प्रत्यक्ष सेवा या आमच्या मातृभूमीची करता येईल, अशा प्रकारच्या कोणत्याही अटी मान्य करून मुक्तता करून घेणे हे प्रतियोगी धोरणानेच नव्हे, तर समाजहिताच्या दृष्टीनेही आमचे परमकर्तव्य आहे,” असे सावरकरांचे स्पष्ट मत होते. दुष्ट शत्रूवर आघात करून पुन्हा जो निसटून जातो तोच खरा शूर, तो भित्रा नव्हे, असे सावरकरांचे धोरण होते.
 
 
 
सावरकरांवर ब्रिटिश राजसत्तेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेण्याचा प्रसंगच उद्भवला नाही. पण, तशी वेळ आली असतीच तर सावरकरांनी तशी शपथ घेतली असती आणि वेळ येताच ती मोडलीही असती. कारण, शत्रूला खोटे आश्वासन देणे, फसवणे, शत्रूचा विश्वासघात करणे यात गैर काय आहे? पण, आपल्याकडे शत्रूशी खरं बोलायचं, शत्रूला दिलेले वचन प्राणपणाने पाळायचं आणि स्वकीयांशी द्रोह, विश्वासघात करायचा, अशी सद्गुण-विकृती प्रचलित आहे, त्यामुळे सावरकरनीती कळणे अथवा समजणे जरा कठीणच आहे.
 
 
सावरकरांचे धोरण
 
अंदमानात जे काय राष्ट्रहित साधता येईल ते इतके महत्त्वाचे कधीही नसणार की, जितके मुक्तता झाल्यास हिंदुस्थानात येऊन साधता येईल. परंतु, म्हणून मुक्ततेसाठी वाटेल ते विश्वासघातक, निंद्य, नीच आणि देशाच्या किंवा जातीच्या स्वाभिमानास कलंक लागेल, असे लाळघोटी वर्तन त्यामुळे समर्थनीय ठरणार नाही. कारण, त्यायोगे होणारी मुक्तता ही राष्ट्रास अधिक हितकारक होण्यापेक्षा स्वत:च्या उदाहरणाने अधिक अनीतिमान आणि राष्ट्रघातकी मात्र होणारी होती. तेव्हा असे वर्तन टाळून जर मुक्तता मिळण्याची निश्चित संधी मिळत असेल तर ती साधावयाची. ती निश्चित संधी मिळेतो त्या परिस्थितीतच जे काय राष्ट्रहित साधता येईल ते साधण्याचा प्रयत्न करीत राहून दिवस कंठावयाचे.
 
 
त्यातही शक्यतो ज्यांच्यावर सरकारचा इतका उग्र दोष व तीव्र दृष्टी नाही, तोवर त्यांच्याकडून ती कृत्ये करवावयाची. जेव्हा आपणावाचून ती त्या परिस्थितीत शक्य असलेली सार्वजनिक चळवळ करण्यास दुसरे कोणी इतके इच्छुक वा समर्थ नसेल, तेव्हा ती प्रकरणे स्वत: करावयाची. मुक्ततेचा संभव दिसत असता दाटून दवडावयाचा नाही. पण, तो निश्चित संभव नसता केवळ आशाळभूत भ्याडपणाने ‘नाही तर सोडणार नाहीत’ असे म्हणत अंदमानात स्वकीयांचे चाललेले छळ निमूटपणे पाहतही बसावयाचे नाही, अशी सावरकरांची भूमिका होती. म्हणजे सुटकेसाठी वाट्टेल त्या देशविघातक किंवा देशद्रोही अटी त्यांनी मान्य केल्या नाहीत व अंदमानात निमूटपणे छळही सहन केला नाही.
 
 
वेळोवेळी संप, उपास, कामास नकार देऊन निषेध नोंदवला होता. सहा महिने कठोर एकांतवास, सात वेळा खडी दंडाबेडी व काम करण्याचे नाकारल्याबद्दल दहा दिवस खोडाबेडी, एकूण २०-२२ वेळा आडव्या बेड्या, उभ्या बेड्या, हातकड्या, कोठडीबंद्या, अन्नत्याग इत्यादी सर्व शिक्षा सावरकरांनी भोगल्या होत्या. आजारी रुग्णांना दूध देण्यात येई. पण, आजारी सावरकरांना फक्त कच्ची पोळी नाहीतर पाणी-भात देण्यात येई. या भयानक शिक्षा सावरकरांना मवाळ वागणूक मिळाली किंवा ब्रिटिशांबरोबर सावरकरांनी हातमिळवणी केल्याचे दर्शवतात का? तुरुंगवासात त्यांचे मनोधैर्य तर खचले नाहीच; पण त्यांनी तशा अमानुष बंदीवासातही हाती साधी कागद-पेन्सिल नसतानाही तुरुंगातील भिंतींवर पाच हजार ओळींचे ‘कमला’ हे उत्कट काव्य, नव्हे महाकाव्य लिहिले आणि ते सर्व मुखोद्गत केले. संपूर्ण जगाच्या इतिहासात अशा प्रकारचे हे एकमेव उदाहरण आहे. मनोधैर्य खचल्याचे हे लक्षण म्हणता येईल का?
 
सावरकर बंधूंच्या सुटकेला ब्रिटिशांचा प्रखर विरोध
 
सावरकर बंधूंना सोडावे लागू नये, यासाठी ब्रिटिश सरकार किती आटोकाट प्रयत्न करत होते हे ‘Source Material for History of Freedom Movement in India’ या शासनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथातील पुढील नोंदींवरून कळते.
 
१) गणेश दामोदर सावरकर व विनायक दामोदर सावरकर यांना शिक्षेत कोणतीही सूट देण्यात येऊ नये, अशी शिफारस मुंबई सरकार करत आहे.
२) सार्वजनिक शिक्षामाफीचा कोणताही लाभ सावरकर बंधूंना मिळू नये, याच्याशी दिल्ली सरकार पूर्णपणे सहमत आहे. - ८ डिसेंबर १९१७
३) मुंबई सरकारच्या गृह खात्याचे पत्र क्रमांक ११०६/३६, दिनांक २९ फेब्रुवारी, १९२१ - सावरकर बंधूंना अंदमानातून भारतात पाठवण्यात येऊ नये, असे गव्हर्नर कौन्सिलचे मत आहे. कारण, तसे केल्यास त्यांच्या सुटकेसाठीच्या चळवळीला बळ मिळेल.
तसेच १९१९च्या अखेरीस मुंबई प्रांतातील चांदवडकर, मरीवाला, दुर्गादास अडवानी व जेठमल परसराम हे राजबंदी सुटले, तर बंगालच्या प्रांतिक सरकारने अलीपूर बॉम्ब खटल्यातील बारींद्रकुमार घोष व त्यांच्या जन्मठेप भोगणार्‍या सहकर्‍यांना सोडून देण्याचे मान्य केले होते. यामुळे सावरकरांच्या सुटकेच्या मागणीला जोर चढला. पण, तेव्हा मुंबई सरकार सावरकर बंधूंना अंदमानातून भारतातील कारागृहात स्थलांतरित करण्यासही तयार नव्हते. भारतातील कारागृह शिफारस समितीने राजबंद्यांची गटवारी केली होती, त्यात अंदमानात बंदीवासात राहण्यास योग्य अशा भयंकर गुन्हेगारांच्या गटात सावरकर बंधूंचा समावेश केला होता. ब्रिटिश अधिकारी सावरकरांबाबत विशेष सावधगिरीने आणि अतीव दुष्टाव्याने वागत होते.
सावरकरांना ५० वर्षांची जन्मठेप काळे पाण्याची शिक्षा ठोठावल्यावर अंदमानला नेण्याआधी सावरकरांना डोंगरीच्या कारागृहात ठेवलं होतं. डोंगरीच्या कारावासात असतानाच सावरकरांनी आपली २५-२५ वर्षांची दोन जन्मठेपींची शिक्षा एककालिक करावी, असा अर्ज केला होता. कारण, मनुष्याला एकच जन्म असतो. तेव्हा दुसरी शिक्षा नवीन जन्मात भोगायची काय, हा प्रश्न निर्माण होत होता. पण, हिंदुस्थान सरकारने ४ एप्रिल, १९११च्या, क्रमांक २०२२ पत्राद्वारे ही विनंती त्यांच्या पहिल्या जन्मठेपीची शिक्षा संपल्यावर विचारात घेण्यात येईल, असे सांगून फेटाळून लावली. म्हणजे ५० वर्षांची जन्मठेपेची शिक्षा शक्य तितकी कमी करून घ्यावी, असा प्रयत्न अंदमानमध्ये पाऊल ठेवण्याच्या आधीपासून सावरकर करत होते. अंदमानातील छळामुळे त्यांचे मनोधैर्य खचले व मग त्यांनी क्षमापत्रांचा सपाटा लावला हा आरोपच त्यामुळे फोल ठरतो.
क्षमापत्रामागील भूमिका
हा राजकीय कूटनीतीचा एक भाग असतो. ज्यांना राजकीय कूटनीती म्हणजे काय हे माहीत नाही, तेच कदाचित सावरकरांच्या या तथाकथित क्षमापत्रांना सावरकरांची शरणागती समजत असावेत किंवा सावरकरांनी तेव्हा शत्रूला फसवण्यासाठी, त्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी रचलेल्या सापळ्यात सावरकरविरोधक अडकले असावेत. चाणाक्ष शत्रू म्हणजे ब्रिटिश फसले नाहीत. पण, तथाकथित बुद्धिवादी यात फसले असावेत.
 
 
क्रांतिकार्य करत असताना क्रांतिकारकांनी अकारण प्राणत्याग करू नये, पुढची मोठी झेप घेण्यासाठी प्रसंगी चार पावले माघार घ्यावी, हा सावरकरांचा दृष्टिकोन होता. ६३ दिवस अन्नत्याग करून दि. १३ सप्टेंबर, १९२९ या दिवशी लाहोरच्या कारागृहात जतिंद्रनाथ (जतिन) दास या क्रांतिकारकाने मृत्यूला कवटाळले. त्यानंतर सावरकरांनी ‘प्रशंसनीय! वंदनीय! आदरणीय पण अनुकरणीय नव्हे’ या शीर्षकाचा ‘श्रद्धानंद’मध्ये लेख लिहिला. तो वाचल्यास ब्रिटिशांनी घातलेली बंधने सावरकरांनी प्रसंगी का स्वीकारली, यावर उत्तम प्रकाश पडतो.
 
 
जतिंद्रनाथांप्रमाणे भगतसिंग प्रभृतींनी उपवास करून मरू नये, अशी विनंती करताना सावरकर लिहितात, “जोवर हिंदुस्थान पारतंत्र्यात आहे, तोवर लहान-सहान अधिकार हिसकावेल, तितके हिसकवत राहायचे, त्यासाठी परिमित आणि प्रमाणशीर स्वार्थत्याग करीत राहायचेच. पण, तरीही हे कधी विसरायचे नाही की, ते अधिकार जिने दिले ती परकी सत्ता जोवर जीवंत नि प्रबळ आहे, तोवर ते केव्हा छिनावले जातील याचा काही नियम नाही. ते धुळीवरचे सारवण, म्हणून भलत्याच दुय्यम प्रश्नास ‘हा मानाचा प्रश्न’ असे नसते महत्त्व देऊन लाखाचा प्राण मातीच्या मोलाने देण्याच्या प्रतिज्ञा यापुढे तरी कोणी कधी करू नयेत...” हुतात्मा जतिंद्रांचा अपवाद वंदनीय आहे, प्रशंसनीय आहे. पण, तो अपवाद आहे. सर्वांना तो मुळीच अनुकरणीय नाही. छत्रपती शिवाजी महाराज बंदीत पडले, तेव्हा त्यांनी अनशन करून आपले प्राण सोडले नाहीत, तर ते औरंगजेबाच्या छातीवर लाथ मारून निसटून गेले. परिस्थिती पाहून योग्य तो पालट करा! पण, मूळ रणनीती तीच ठेवा!”
 
 
“हिंदूंना आता केवळ हुतात्मे नकोत. आपल्यात विजयी वीरही निर्माण झाले पाहिजेत. ज्या राष्ट्रात प्रसंगी हुतात्मे निपजत नाहीत ते राष्ट्र आधीच मेलेले असले पाहिजे हे जितके खरे, तितकेच हेही खरे की, जे राष्ट्र केवळ हुतात्म्यांवर समाधान मानून विजय वीर निर्माण करण्याकडे दुर्लक्ष करते ते राष्ट्र मृतप्रायच राहते.”१० असे सावरकरांचे विजयी धोरण होते. ‘’राष्ट्रीय सैन्याचे मुख्य ध्येय विजय हे आहे. आपल्या न्याय्य पक्षाची एकंदरीत कमीत कमी हानी होऊन अन्याय विपक्षाची एकंदरीत जास्तीत जास्त हानी करण्यास जी युद्धकला झटते ती खरी युद्धकला होय! त्या युद्धकलेला हुतात्मता हाही केव्हा केव्हा एक अत्यंत अवश्य आणि अत्यंत वंद्य असा घटक होऊ शकतो.
 
पण, तो अपवाद म्हणून. केवळ हौतात्म्य ही काही विजयाची निश्चित हमी नव्हे!” कारण, पराभव हा शेवटी पराभव असतो, ‘हार कर जितने वालो को बाजीगर कहते हैं’ सारखा चित्रपटातील संवाद नसतो; कारण पराभवाचे मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय व राष्ट्रीय परिणाम दूरगामी असतात. चर्चिलच्या शब्दात सांगायचे झाल्यास, “पराभवाच्या शिक्षा मोठ्या भयानक असतात. स्तिमित करणारे भयंकर अरिष्ट, भोवळ आणणारा फटका, वाहत्या जखमा यानंतर पराभवाच्या रोगांना प्रारंभ होतो. राष्ट्रीय जीवनाचा कणा मोडतो आणि निरोगी जीवनाला आवश्यक असणारा सर्व ताबा नष्ट होतो. फारच थोडे समाज गुलामी जीवनाला पुरून उरू शकतात.” अलीपूर बॉम्ब खटल्यातील आरोपी बारींद्रकुमार घोष, लाहोर कटातील आरोपी सचिंद्रनाथ संन्याल यांनी सावरकरांप्रमाणेच ब्रिटिश सरकारला आवेदन केले होते, त्यांना ब्रिटिशांनी क्षमा करून सोडून दिले.
 
 
मुक्ततेसाठी तथाकथित दयेची याचना करताना सावरकरांनी ब्रिटिशांना पुढील मागण्या केल्या होत्या.
 
१. भारतातील व भारताबाहेरील सर्व राजबंदीवानांची मुक्तता
  
२. दायित्वपूर्ण शासनाधिकार
 
३. वरिष्ठ विधिमंडळात परिणामकारक बहुमत
 
४. भूतकाळी आमच्या क्रांतिकारक चळवळी कशा झाल्या, त्यात कोण होते, किती सिद्धता असे इत्यादी माहितीही दिली जावी, असा संकेत करण्यात येई. परंतु, भूतकाळाविषयी ब्रही विचारला जाऊ नये, सांगितला जाऊ नये. भूतकाळच्या घटना ज्या एकदा मोहरबंद झाल्या त्या झाल्या!
वरील मागण्या लक्षात घेता सावरकरांची शरणागती पूर्ण व सर्वांगीण होती, असे कसे म्हणता येईल? जर सावरकरांची शरणागती पूर्ण व सर्वांगीण असती तर त्यांनी आपल्या क्रांतिकारक चळवळीतील साथीदारांची नावे कधीच सांगून सशर्त नव्हे, तर बिनशर्त सुटका करून घेतली असती. शरणागतीचा देखावा करताना सावरकरांनी आपल्या सहकार्‍यांची नावे ब्रिटिशांना सांगून द्रोह केला नाही.
 
सावरकरांच्या या अटी, ही आवेदनपत्रे, यामागील राजकीय खेळी, मनोभूमिका स्वत: सावरकरांनी कधीही लपवून ठेवली नाही. सावरकरांचे आत्मचरित्र ‘माझी जन्मठेप’मध्ये या सर्वांचा सांगोपांग ऊहापोह केलेला आहे. त्यामुळे आम्ही नवी दिल्लीच्या ‘शासकीय अभिलेखागारात’ जाऊन संशोधन करून पत्र शोधून काढली, अशा फुशारक्या कोणी मारू नयेत. ‘माझी जन्मठेप’ या त्यांच्या अंदमानच्या कारावासावर आधारित आत्मचरित्रात त्यांनी स्पष्टपणे अंदमानातून सुटका, मग तिथून रत्नागिरी मग येरवडा तुरुंग व नंतर रत्नागिरीत स्थानबद्धता यांचा उल्लेख केलेला आहे.
 
व्हिएतनामच्या कम्युनिस्ट ‘हो-चि-मिन्ह’नेसुद्धा चीनच्या कोमिंग्टांग कारागृहातून अशाच प्रकारचे पत्र व सहकार्याची अट मान्य करून सुटका करून घेतली होती. मार्शल चँगला त्याने कोमिंग्टांग शासनाच्या आधाराने इंडो-चायनात स्थापन झालेल्या ‘डाँग-मिन्ह-होई’ (जी ‘हो-चि-मिन्ह’च्या ‘व्हिएत-मिन्ह’ला शह देण्यासाठी स्थापिली होती.) या संघटनेचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली व सुटका करून घेतली होती. तसेच रशियाने जेव्हा जर्मनीशी केलेला अनाक्रमणाचा करार संपुष्टात आल्यावर मित्रराष्ट्रांशी हातमिळवणी केली, तेव्हा एका रात्रीत कम्युनिस्टांनी आपली निष्ठा बदलली. म्हणजे कम्युनिस्ट करतील ती राजकीय खेळी व सावरकर करतील तो द्रोह? तात्पर्य हेच की, झोपलेल्याला उठवता येते. पण, झोपेचे सोंग घेणार्‍याला उठवता येत नाही.
संदर्भ:
 
१. Dubey, Krishnan Ramakrishnan, Venkitesh. Far from heroism - The tale of Veer Savarkar, Frontline, ७ April १९९६
 
२. Garnett, David, In the first volume of his autobiography, The Golden Echo, Harcourt, Brace and Company, New York,१९५४
 
३. सावरकर, वि. दा., माझी जन्मठेप, परचुरे प्रकाशन, अठरावी आवृत्ती, २०११, पृष्ठ ४७०
 
४. Source Material for a History of the Freedom Movement in India, खंड २, Government Printing, Publications and Stationery, Bombay State, Bombay, १९५८, पृष्ठ ४६७
 
५. जोशी, वि. श्री., क्रांतिकल्लोळ, मनोरमा प्रकाशन, १९८५, पृष्ठ ४८८
 
६. सावरकर, शां. शि. तथा बाळाराव. स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदूमहासभापर्व भाग १, वीर सावरकर प्रकाशन, १९७५, पृष्ठ ९१
 
७. समग्र सावरकर वाङ्मय- खंड २, संपादक- शं. रा. दाते, समग्र सावरकर वाङ्मय प्रकाशन समिती, महाराष्ट्र प्रांतिक हिंदूसभा प्रकाशन, १९६३-१९६५, पृष्ठ ४९४
 
८. Churchill, Winston S., Compiled by Charles Eade, The Dawn of Liberation, Cassell Company Ltd., १९४५, पृष्ठ
 
९. माझी जन्मठेप, पृष्ठ ४७१
 
१०. कानिटकर, वि. ग., व्हिएतनाम: अर्थ आणि अनर्थ, मनोरमा प्रकाशन १९९८, पृष्ठ ५३
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.