सेशेल्सचा धडा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2021   
Total Views |

Seychelle_1  H
 
 
 
लसीकरण... कोरोना महामारीच्या जागतिक संकटाला रोखण्याचे सामर्थ्य असलेले हे सध्या एकमेव शस्त्र. जगातील बहुतांश देशांमध्ये लसीकरणाची प्रक्रिया ही वेग घेत असून, लसींची मागणीही प्रचंड वाढली आहे. अशात भारतासारख्या १२५ कोटी लोकसंख्येच्या देशात लसीकरणाचे आव्हान हे निश्चितच चिंतेत भर टाकणारे. त्यामुळे वेगवान लसीकरण प्रक्रियेसाठी लसींच्या उत्पादन आणि पुरवठ्याच्या गणितात केंद्र-राज्य सरकारांना लवकरात लवकर ताळमेळ बसवून तत्परता दाखवावीच लागेल. पण, या दुसर्‍या आणि संभाव्य तिसर्‍या लाटेनंतरही, लसीकरणापश्चातही नागरिकांना मात्र गाफील राहून अजिबात चालणार नाही. गेल्या वर्षी लस उपलब्ध नसल्यामुळे जगभरात कोरोनाच्या दुसर्‍या, तिसर्‍या लाटा येऊन गेल्या. परंतु, लसीकरणाची वैश्विक प्रक्रिया पुढील एक-दोन वर्षं जरी सुरूच राहणार असली तरी त्यामुळे कोरोनाचा प्रकोप संपुष्टात येईल, याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेनेही वेळोवेळी फेटाळली आहेच. याचाच अर्थ, लस घेतली आणि आपण निर्धास्त झालो, हे पुन्हा एकदा कोरोनाला आमंत्रण देणारेच ठरू शकते. याचेच ताजे उदाहरण म्हणजे जगातील सर्वाधिक लसीकरण झालेल्या सेशेल्स देशात पुन्हा कोरोनाने वर काढलेले डोके. तेव्हा, सेशेल्समध्ये नेमके काय झाले, ते पाहू.
 
 
 
सेशेल्स... हिंद महासागरातले भारताचे एक मित्रराष्ट्र. आफ्रिकन युनियनचा भाग असलेला हा देश म्हणजे जवळपास ११५ बेटांचा समूह. आफ्रिका खंडाच्या सुमारे १,५०० किमी पूर्वेला आणि भारताच्या साधारण ३,७०० किमी पश्चिमेवर वसलेले हे द्वीपराष्ट्र. अजून नेमके या देशाचे स्थान सांगायचे तर मादागास्करच्या ईशान्येला आणि केनियाच्या पूर्वेला. या देशाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे, सेशेल्स हा आफ्रिका खंडातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश आहे. लोकसंख्या किती म्हणाल, तर फक्त 98 हजार. (म्हणजे मुंबईतील एका वॉर्डाच्या लोकसंख्येपेक्षाही कित्येक पटीने कमी.) त्यामुळे साहजिकच इतर देशांच्या तुलनेत सेशेल्सने लसीकरणात बाजी मारलेली दिसते. पण, अजूनही लसींच्या कमी पुरवठ्यामुळे या देशातही लसीकरण प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. परंतु, या देशातील ६२.२ टक्के इतक्या लोकसंख्येचे लसीकरण मात्र दोन्ही डोससकट पूर्ण झाले आणि त्यानंतर नंबर लागतो तो इस्रायलचा, ज्याने आजवर आपल्या देशातील ५५.९ टक्के जनतेचे लसीकरण वेगवान मोहिमेअंतर्गत पूर्ण केले. लसीकरण सुरू असले तरी कोरोनाचे रुग्ण सेशेल्समध्ये आढळत होतेच. पण, त्यांची संख्या एकाएकी वाढली आहे.२८ एप्रिलला जिथे ६१२ रुग्ण आढळले होते, तेच ३ मेपर्यंत याच संख्येने एक हजारांचा टप्पाही ओलांडला. या रुग्णांपैकी ८४ टक्के रुग्ण हे सेशेल्सचे निवासी आहेत व उर्वरित १६ टक्के विदेशी नागरिक, पर्यटक असल्याचे समजते. आता या ८४ टक्के कोरोनाग्रस्त सेशेल्सवासीयांपैकी दोन तृतीयांश असे रुग्ण आहेत, ज्यांनी लस घेतलेलीच नाही किंवा फक्त लसीचा एकच डोस घेतला आहे, तर एक तृतीयांश रुग्ण असे आढळले, ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यामुळे लसीकरण झाले म्हणजे कोरोना आपल्या आसपासही फिरकणार नाही, हा समज पुन्हा एकदा फोल ठरला. सेशेल्सवासीयांनीही लसीकरणानंतर कोरोनाविरोधी नियम धाब्यावर बसवले. ईस्टरनंतर नातेवाइकांकडे, मित्रांकडे येण्या-जाण्याचे प्रमाणही वाढले. तसेच या देशाची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असल्याने विदेशी पर्यटकांच्या वास्तव्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावात भर पडली. त्यातच सेशेल्सने ‘अ‍ॅस्ट्राझेन्का’, चीनची ‘सिनोफार्म’ आणि भारताची ‘कोव्हिशिल्ड’ अशा तीन लसींच्या माध्यमातून लसीकरण राबविले. पैकी ‘अ‍ॅस्ट्राझेन्का’ची लस ही फारशी परिणामकारक ठरत नसल्याचेही समोर आले. त्यामुळे सर्वाधिक लसीकरण करणार्‍या या छोट्याशा देशातही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहेच.
 
 
 
दुसरीकडे स्पेनमध्येही सहा महिन्यांनी कोरोनाकाळातील नियम सरकारने शिथिल केल्यानंतर रस्त्यांवर लोकांची एकच झुंबड उडाली. रेस्टॉरंट, समुद्रकिनारे गर्दीने फुलून गेले. त्यामुळे आधीच दोन-तीन कोरोनाच्या लाटांचा तडाखा बसलेल्या स्पेनच्या सरकारने व जनतेनेही यातून कोणताच धडा घेतला नाही का, असाच प्रश्न उपस्थित होतो. तेव्हा, जरी ‘लॉकडाऊन’ संपला, लस मिळाली तरी कोरोनाला रोखण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे, ही खूणगाठ मनाशी घट्ट बांधावीच लागेल. आधी विदेशात, मग आपल्या देशात पसरलेला हा विषाणू आता आपल्या दारातच आहे. तेव्हा, आपला व आपल्या प्रियजनांचा जीव प्रिय असेल, तर आजवर जशी खबरदारी आपण घेतली, तशीच लस घेतल्यानंतरही घेऊ, असा निर्धार करूया आणि कोरोनावर मात करूया!
 
 
@@AUTHORINFO_V1@@