‘राफेल’च्या घोटाळ्यांत काँग्रेसच अडकणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2021
Total Views |

Rafeal_1  H x W
 
 
फ्रेंच माध्यमांतील वृत्ताने शैथिल्यग्रस्त काँग्रेसच्या तोळामासा प्रकृतीत धुगधुगी आल्याचे दिसते. देशाच्या सुरक्षेशी खेळ करत काँग्रेस सर्वोच्च न्यायालय, ‘कॅग’वर अविश्वास दाखवून डाव्या विचारांच्या ‘मीडिया पार्ट’वर विश्वास दाखवते. पण, त्यात आलेल्या सुशेन गुप्ताचे नाव काँग्रेसशी दृढ संबंध दाखवते आणि एकूण प्रकरणाची संपुआ काळापासून चौकशी झाली, तर त्यात काँग्रेसच अडकेल, हे नक्की.
 
 
एकेकाळी संपूर्ण भारतावर सत्ता गाजवणाऱ्या शतायुषी काँग्रेस पक्षाची आजची अवस्था अतिशय दयनीय आणि अप्रासंगिक झाल्याचे दिसते. कारण, काँग्रेसची अहंकारी, विरोधासाठी विरोध आणि द्वेषावर आधारलेली निवडणूक रणनीती. देशावर राज्य करण्यासाठी आणि पंतप्रधानपदासाठी केवळ काँग्रेस व गांधी घराण्यातील व्यक्तीच लायक असल्याची भावना त्या पक्षाच्या, त्याच्या कार्यकर्त्यांच्या आणि त्यांच्या पाळीव विचारवंत-बुद्धिमंतांच्या मनात आजही आहे. परिणामी, काँग्रेस आणि गांधी कुटुंबाला २०१४ पासून भारताच्या सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींचे आणि विविध राज्यांतील भाजपचे सरकार अजिबात बघवत नाही, पचत नाही. त्यातूनच निरर्थक आणि निराधार मुद्द्यांवरून काँग्रेस भाजप व मोदी सरकारविरोधात सातत्याने आकांडतांडव करताना दिसते. आताही पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारात काँग्रेस आपल्या त्याच जुन्या-पुराण्या अजेंड्याला आणू इच्छिते आणि नुकताच पुढे आणलेला ‘राफेल’ लढाऊ विमान खरेदी व्यवहारातील दलालीचा मुद्दा त्याचाच भाग. तत्पूर्वी २०१९ सालच्या लोकसभा व अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस व राहुल गांधी यांनी ‘राफेल’ लढाऊ विमानखरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. राहुल गांधींनी तर नरेंद्र मोदींविरोधात ‘चौकीदार चोर हैं’सारखी फालतू घोषणा देत ते वाक्य न्यायालयाच्या तोंडीही घातले होते. नंतर मात्र सर्वोच्च न्यायालयानेच त्यांना झापले आणि त्यातूनच राहुल गांधींवर गपगुमान न्यायालयाची माफी मागण्याची नामुष्कीही ओढवली. पण, तेवढ्याने सुधारतील ते राहुल गांधी कसले ; त्यांनी बेशरमपणे ‘राफेल’ लढाऊ विमान खरेदीतील कथित भ्रष्टाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या बदनामीचा खेळ जसाच्या तसा सुरूच ठेवला. तथापि, जनतेने मात्र त्यांच्या बालीश बडबडीकडे लक्ष दिले नाही नि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला, इतका की, स्वतः राहुल गांधीही अमेठीतून आपटले. कारण, बिनबुडाचे आरोप करून, त्यांची व त्यांच्या पक्षाची विश्वासार्हता पार रसातळाला गेली होती आणि ती अजूनही तशीच आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष करून काँग्रेसने आता पुन्हा एकदा ‘राफेल’ लढाऊ विमान खरेदीत लाचखोरी झाल्याचा विषय हाती घेतला आहे. त्याला निमित्त ठरले ते फ्रान्समधील एका वृत्तसंकेतस्थळाद्वारे करण्यात आलेला तशा प्रकारचा दावा.
 
 
नुकताच फ्रेंच वृत्तसंकेतस्थळ ‘मीडिया पार्ट’ने ‘राफेल’ लढाऊ विमान खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी ‘डसॉल्ट’ कंपनीकडून एका दलालाला दहा लाख युरो किंवा ९.४८ कोटी रुपये दलाली दिल्याचा दावा केला. ‘मीडिया पार्ट’च्या या दाव्यानंतर मोदी व भाजपविरोधासाठी कारण शोधणाऱ्या बुभुक्षित काँग्रेसजनांनी त्यावर पटापट उड्या मारल्या. रणदीप सुरजेवाला यांनी ‘राफेल’ लढाऊ विमानांची निर्मिती करणाऱ्या ‘डसॉल्ट’ने भारतात नेमकी कोणाला दलालीची रक्कम दिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचे उत्तर देतील का, असा सवाल विचारला. तर मोदी सरकारमुळे आपली दुकानदारी बंद झालेल्या, घरी बसावे लागलेल्या, सुट्टीवर जावे लागलेल्या, माध्यमसंस्थांतून हाकलून लावलेल्या पत्रकार-संपादकांनीही कुई कुई करायला सुरुवात केली. पण, ‘मीडिया पार्ट’ने केलेल्या दाव्यात सुशेन गुप्ताचे नाव आलेले आहे. हा सुशेन गुप्ता कोण आहे? तर सुशेन गुप्ताची ‘डेफसिस सोल्युशन्स’ नावाची कंपनी असून सोनिया गांधींचा जावई, प्रियांका गांधींचा नवरा, रॉबर्ट वाड्रांचा तो खास मित्र आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील संपुआ सरकारच्या काळात झालेल्या तीन हजार ६०० कोटींच्या ‘ऑगस्टा वेस्टलॅण्ड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी’ व्यवहारातील घोटाळ्यातील दलालीचा आरोप त्याच्यावर आहे. २६ मार्च, २०१९ रोजी मोदी सरकारच्या कार्यकाळात त्याला याच प्रकरणात ‘ईडी’ने अटक केली होती. तसेच २००४ ते २०१६ या १२ वर्षांत ‘आरजी’ नावाच्या व्यक्तीबरोबर ५० कोटींचे हस्तांतर झाल्याचे सुशेन गुप्ताच्या डायरी व ‘पेन ड्राईव्ह’मध्ये आढळले होते. चौकशीदरम्यान सुशेन गुप्ताने ‘आरजी’ नावाचा अर्थ ‘रजत गुप्ता’ असा सांगितला. पण, रजत गुप्ता नावाच्या व्यक्तीने तो फेटाळला आणि त्यावरूनच ‘आरजी’चे नेमके गूढ काय, हा प्रश्न उपस्थित झाला व त्याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. सोबतच याच प्रकरणातील चौकशी वेळी सुशेन गुप्ताने काँग्रेस नेते कमलनाथ यांचा भाचा ‘हिंदुस्थान पॉवर प्रोजेक्ट’चे अध्यक्ष रतुल पुरी यांचे नाव घेतले होते व ‘ईडी’ने रतुल पुरींच्या कोठडीचीही मागणी केली होती. दरम्यान, रविशंकर प्रसाद यांच्या वक्तव्यानुसार, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनीही एकदा स्वतःच्या तोंडाने आपण सुशेन गुप्ता आणि त्याच्या कुटुंबाला ओळखतो, असे म्हटले होते. यावरूनच, सुशेन गुप्ताचा संबंध काँग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळाशी असल्याचे दिसते.
 
 
दरम्यान, काँग्रेसने २०१९ साली ‘राफेल’ लढाऊ विमान खरेदी व्यवहारात घोटाळा झाल्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातही नेला होता. पण, आम्हाला ‘राफेल’ लढाऊ विमान खरेदी प्रकरणात प्राथमिक तक्रार नोंदवण्याची वा विनाकारण चौकशीचे आदेश देण्याची गरज नाही, असे मत व्यक्त करत याचिका फेटाळली होती. सर्वोच्च न्यायालयाने ‘राफेल’ लढाऊ विमान खरेदीत भ्रष्टाचार झाला नाही, असा निर्वाळा दिल्यानंतर ‘कॅग’नेही ‘राफेल’ लढाऊ विमान व्यवहारात कोणत्याही प्रकारची लाचखोरी, दलाली झाली नाही, असे स्पष्ट केले. तसेच २०१६ साली मोदी सरकारने केलेला व्यवहार काँग्रेसच्या २००७ सालच्या नऊ टक्क्यांनी स्वस्त असल्याचेही ‘कॅग’ने म्हटले होते. सर्वोच्च न्यायालय आणि ‘कॅग’च्या अहवालानंतर तोपर्यंत ‘राफेल’ लढाऊ विमानांच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा ठणाणा करणाऱ्या काँग्रेसींची आणि तथाकथित पुरोगामी बुद्धिजीवी-विचारवंतांच्या तोंडाला कुलूप लागले होते. कारण, बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे हा मुद्दा उपस्थित केला नव्हता. तथापि, आता मात्र, फ्रेंच माध्यमांतील वृत्ताने घोटाळ्याचा आरोप करून व त्यात काहीही तथ्य न आढळल्याने शैथिल्य आलेल्या काँग्रेसच्या तोळामासा प्रकृतीत धुगधुगी आल्याचे दिसते. देशाच्या सुरक्षेशी खेळ करत काँग्रेस देशाच्या सर्वोच्च न्यायालय, ‘कॅग’वर अविश्वास दाखवून फ्रान्सच्या डाव्या विचारांच्या ‘मीडिया पार्ट’वर विश्वास दाखवते. पण, त्यात आलेल्या सुशेन गुप्ताचे नाव काँग्रेसशी दृढ संबंध दाखवते आणि एकूण प्रकरणाची अगदी संपुआ सरकारच्या काळातील व्यवहारापासून चौकशी झाली, तर त्यात काँग्रेस व त्या पक्षाचे नेतेच अडकतील, हे नक्की!
 
 
@@AUTHORINFO_V1@@