राष्ट्रवादीच्या विद्यमान व शिवसेनेच्या माजी खासदारामध्ये ट्विटरवॉर !

    दिनांक  19-Sep-2020 17:53:46
|

shivsena vs ncp_1 &nशिरूर :
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी सत्तेत आहे. मात्र सत्तेत एकत्र असलेल्या पक्षाच्या नेत्यांमधील स्थानिक पातळीवरील मतभेद कोणत्या न कोणत्या कारणाने समोर येत आहेत. आता राष्ट्रवादीचे विद्यमान आणि शिवसेनेचे माजी खासदार एकमेकांवर सोशल मीडियावर टीकास्त्र सोडताना दिसत आहे.


पुण्यातील शिरुर मतदारसंघांतील खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातील वाद समोर आले आहेत.खासदार अमोल कोल्हे यांनी एका वृत्तपत्राची बातमी ट्विटरवर शेअर करत त्या बातमीचा समाचार घेतला आहे. या बातमीत मतदारसंघातील चार आमदारांच्या दबावामुळे अमोल कोल्हे भाजपात जाणार असल्याचे म्हटले होते.यावर अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत म्हटलं की, '१५ वर्षे मालिका क्षेत्रात काम करताना एवढा अफाट कल्पनाविस्तार आणि करमणूक कधी पाहायला मिळाली नव्हती! मन:पूर्वक आभार!" यामध्ये कोल्हे यांनी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना टॅग करत अप्रत्यक्ष टोला लगावला. त्यामुळे आढळराव पाटलांनीही एक दुसरी बातमी ट्वीट करुन अमोल कोल्हेंना प्रत्युत्तर दिले.


आढळराव पाटील म्हणतात, "ज्यांनी विनोदाची सुरुवात केली अशांवर त्यांचेच विनोद उलटल्यावर त्यांना सहनही होत नाहीत आणि त्रागाही करता येत नाही. मग सुरू होते आभाराची भाषा! करमणूक अन कल्पनाविस्तारात रमण्यापेक्षा मोठ्या विश्वासानं लोकांनी सोपवलेली जबाबदारी पार पाडावी म्हणजे जनतेत हसं होणार नाही," असे ट्वीट आढळराव पाटलांनी केले. पंधरा वर्ष सत्तेत असलेले शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अमोल कोल्हे यांनी पराभव केला होता. शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांना खासदारकीसाठी तिकीट मिळाले.त्यामुळे या वादाची चर्चा चांगलीच रंगली असून हे वाद लवकर न थांबल्यास पक्षातील वरिष्ठांसाठी मात्र डोकेदुखी ठरू शकते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.