अटकपूर्व जामिनासाठी रिया चक्रवर्तीची धडपड!

    दिनांक  29-Jul-2020 12:22:47
|
Reha_1  H x W:


सुशांतच्या खात्यातून काढले १५ कोटी; सुशांतच्या वडिलांचे रियावर गंभीर आरोप


मुंबई : बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला एक महिन्याहून जास्त काळ लोटला आहे. मात्र आता या प्रकरणाला एक नवीन वळण लागले आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात बिहारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


रिया चक्रवर्ती ही सुशांतची जवळची मैत्रीण मानली जात होती. मात्र रियाने सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असा आरोप सुशांतचे वडील के के सिंग यांनी केला होता. त्यावरुन आता रिया चक्रवर्ती विरूद्ध एफआयआर दाखल करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पाटणा सेंट्रल झोनचे महानिरीक्षक संजय सिंग यांनी दिली.


संजय सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, “रिया चक्रवर्तीविरोधात अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचाही उल्लेख आहे. सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे चार सदस्यांचे एक पथक मुंबईला पाठवण्यात आले आहे. हे पथक मुंबई पोलिसांकडून केस डायरी तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे घेणार आहे.”


सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपांनुसार, सुशांतला चित्रपटसृष्टी सोडून केरळात जाऊन सेंद्रिय शेती करायची होती. मात्र रिया ‘मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही’, असे कारण देऊन त्याची जबरदस्ती अडवणूक करत होती. सुशांत याला राजी नसल्याचे लक्षात येताच तिने सुशांतचे सगळे कार्ड, पैसे, दागिने, आवश्यक कागदपत्रे, लॅपटॉप आणि त्याचे मेडिकल रिपोर्ट घेऊन स्वतःच्या घरी पळ काढला. त्यानंतर तिने सुशांतचा नंबरदेखील ब्लॉक केला. तिच्या कुठल्याही गोष्टीस नकार दिल्यास ती ते रिपोर्ट्स मीडियासमोर ठेवून सुशांत वेडा असल्याचे सांगेल आणि त्यामुळे त्याला कोणी काम देणार नाही, अशी आपभिती सुशांतने त्याच्या बहिणीला सांगितली होती. सुशांतला डेंग्यू असल्याचे सांगत अनेकवेळा रिया त्याला औषधांचा ओव्हरडोस देत होती. सुशांतकडे आलेल्या प्रत्येक चित्रपटात आपल्यालाच मुख्य नायिकेची भूमिका मिळावी म्हणून, ती त्याच्यावर दबाव टाकत होती. असे न झाल्यास ती सुशांतला चित्रपट नाकारायला लावत. तिने सुशांतचा सगळा स्टाफ बदलला होता. तसेच त्याचा फोन नंबर देखील बदलला होता. सुशांतला घरी पाटण्याला जाण्यास तिने बंदी केली होती. त्यामुळे त्याचे घरचे देखील त्याला दुरावले होते, असे आरोप सुशांतच्या वडिलांनी केले आहे. त्याचबरोबर सुशांतच्या खात्यात १७ कोटी रुपये होते, त्यातून १५ कोटी रुपये त्याच्याशी संबधित नसलेल्या खात्यांमध्ये ट्रान्स्फर करण्यात आले. त्यामुळे रिया आणि तिच्या कुटुंबियांच्या खात्यांची तपासणी व्हावी असे ही त्यांनी म्हटले आहे.


मुंबई पोलिसांद्वारे देखील सुशांतच्या आत्महत्येची चौकशी करण्यात येतेय. मात्र सुशांतच्या नातेवाईकांनी या तपासावर नाराजी व्यक्त केलेली आहे. दुसरीकडे सुशांत सिंहच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी व्हावी अशी वारंवार मागणी केली जातेय.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.