बीकेसीमधील कोरोनारुग्णालयात स्वच्छतेसाठी हायटेक सामग्री

    दिनांक  26-May-2020 20:58:25
|

BKC_1  H x W: 0


मुंबई
: मुंबईतील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र म्हणून ओळख असलेल्या बीकेसी (वांद्रे-कुर्ला संकुल) मध्ये साफसफाई कामासाठी यांत्रिक झाडूचा वापर करण्यात येत आहे. या कामासाठी पुढील ५ वर्षांसाठी नवीन कंत्राटकाम देण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका कंत्राटदाराला तब्बल १२.४२ कोटी रुपये मोजणार आहे. हा खर्च 'एमएमआरडीए' प्राधिकरणाकडून वसूल करण्यात येणार आहे.


'बीकेसी'ला मुंबईतील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र म्हणून विकसित करण्यात आले आहे. या ठिकाणी जगभरातील व्यापारी संस्था भारतातील आपला कारभार चालवतात. या संकुलात प्रगत दूतावासांची आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची कार्यालये आहेत. या ठिकाणी विविध कंपन्यांच्या कार्यालयात दररोज अंदाजे ४ लाख लोक कामाला येतात. या संकुलात परदेशी नागरिकांचा वावर असतो. त्यामुळे या बीकेसी केंद्राची तुलना जगभरातील इतर व्यापारी केंद्रांशी केली जाते.


संकुलात काम करणाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली आहे. लवकरच मेट्रो रेल्वे सेवाही सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या संकुलात स्वच्छता राखणेही आवश्यक आहे. मुंबई महापालिका या संकुलात स्वच्छता सेवा पुरवते. मात्र त्यासाठी येणारा खर्च 'एमएमआरडीए' कडून वसूल केला जातो. पालिकेने यापूर्वी २०१४ पासून यांत्रिक झाडूच्या साहाय्याने साफसफाईचे काम कंत्राटदारामार्फ़त सुरू केले. मागील कंत्राट संपुष्टात आले आहे. कंत्राटदार 'ट्रक माउंटेड स्वीपिंग मशीन' द्वारे सफाई करीत असे. मात्र आता आधुनिक यंत्रणा बाजारात आली आहे. २०२० ते २०२४ या ५ वर्षांच्या कालावधीसाठी ' सेल्फ प्रोपेल्ड स्वीपिंग मशीन' च्या साहाय्याने रस्ते, पदपथ स्वच्छ करण्यात येणार आहेत. या आधुनिक मशीनद्वारे कचरा, धूळ अत्यंत चांगल्या प्रकारे साफ करण्यात येते. २.५ पीपीएम इतक्या सूक्ष्म धुलिकणांची सफाईसुद्धा या मशीनद्वारे केली जाते.


कंत्राटदार मे.लक्ष्य एंटरप्राइझेसने हे काम मिळण्यासाठी निविदेत प्रति किमी २९५२ इतके दर भरले होते ; मात्र पालिकेच्या अंदाजित दरापेक्षाही २२.१३ टक्के दर जास्त भरल्याने पालिकेने त्या कंत्राटदाराशी वाटाघाटी करून २०० रुपये कमी करण्यास भाग पाडले. त्यामुळे या कंत्राटदाराला आता पुढील ५ वर्षांसाठी ४% सादिलवारसह १२ कोटी ४२ लाख रुपये देण्यात येणार आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.