स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवणारी उद्योजिका

    दिनांक  21-May-2020 20:55:15   
|


padmaja rajguru_1 &n


ऑरानावाचा चामड्याच्या वस्तूंचा ब्रॅण्ड के. पी इंडस्ट्रीजच्या अंतर्गत लोकांपर्यंत पोहोचत आहे. या अनोख्या ब्रॅण्डची आणि तिच्या मालकिणीची ही कहाणी... कहाणी के. पी. इंडस्ट्रीजच्या पद्मजा राजगुरु यांची...


आपका वॉलेट ओरिजिनल लेदर का है या बनावट है, कैसे पहचानेंगे, मै आप को बताती हूं...!लोकल ट्रेनमधल्या त्या आवाजाकडे सगळ्याच पुरुषांचं लक्ष जायचं. प्रत्येक पुरुषाकडे पाकीट असतंच. त्यामुळे त्या आवाजाकडे सगळेचजण काळजीपूर्वक लक्ष देत. आवाजाच्या दिशेने पाहिले की सगळेच चाट पडायचे. सुटाबुटातली एक सुशिक्षित तरुणी, दिसायला मॉर्डर्न, चांगल्या घरातली. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेली. पण, ती अशी लोकल ट्रेनमध्ये पाकिटं का विकतेय, हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात असे. खरंतर ती मुलगी त्या पाकीट तयार करणार्‍या कंपनीची मालकीण होती. सोशल मीडियाचा बोलबाला नसलेल्या त्या काळात लोकांचे आपल्या उत्पादनाविषयीचे विचार समजून घेण्यासाठी सेल्सगर्लची भूमिका ती निभावत होती. हा तिच्या व्यावसायिक व्यूहनीतीचा एक भाग होता. अशातच एका प्रवाशाने तिला स्वत:चा ब्रॅण्ड बनविण्याची सूचना केली. तिने ऑरानावाचा चामड्याच्या वस्तूंचा ब्रॅण्ड बनविला. केपी इंडस्ट्रीजच्या अंतर्गत हा ब्रॅण्ड लोकांपर्यंत पोहोचत आहे. या अनोख्या ब्रॅण्डची आणि तिच्या मालकिणीची ही कहाणी... कहाणी के. पी. इंडस्ट्रीजच्या पद्मजा राजगुरु यांची...मराठवाड्यातील परभणी जिल्हा. आर्थिक
, सामाजिक आणि काही अंशी राजकीयदृष्ट्या प्रतिकूल परिस्थितीने गांजलेला असा जिल्हा. या जिल्ह्यात शिवराम राजगुरु हे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते, तर त्यांची पत्नी विमल या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका होत्या. या राजगुरु दाम्पत्यांना एकूण तीन मुले. दोन मुली आणि एक मुलगा. यातली पद्मजा ही काहीतरी वेगळंच रसायन होतं. परभणीच्या गांधी विद्यालयातून तिचं शालेय शिक्षण पूर्ण झालं, तर नांदेडच्या एमजीएम महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी तर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगया विषयातून तिने पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. शाळेत असल्यापासूनच ती हॉकी आणि कबड्डी खेळायला लागली. या खेळात पद्मजाने राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत धडक दिली. रस्सीखेच या स्पर्धेची तर ती राष्ट्रीय स्तरावर चॅम्पियनझाली. खेळाचं खरं प्रोत्साहन तिला तिच्या आईवडिलांसोबतच आजी-आजोबांनी दिलं.महाविद्यालयीन शिक्षण संपलं आणि पद्मजाचा विवाह कपिलदेव मेश्राम या उच्चशिक्षित
, सुसंस्कृत, हुशार तरुणासोबत पार पडला. ग्रामीण भागातील मुलांना मुंबईचं आकर्षण असतं. पद्मजाला लहानपणापासून वाटत होतं, मुंबईला जावं. लग्नामुळे ते स्वप्न पूर्ण झालं. लग्नानंतर ती मुंबईपासून जवळच असलेल्या डोंबिवलीमध्ये स्थायिक झाली. लग्न झाल्यानंतर मुलाचा, अवनीशचा जन्म झाला. आता कुटुंबाला, बाळाला वेळ देता यावा म्हणून तिने कुठेच नोकरी केली नाही. दरम्यान तिला काही सॉफ्टवेअर शिकण्याची इच्छा होती. मात्र, तेवढे पैसे नव्हते. तीन वर्षे ती घरीच होती. मोठ्या कष्टाने तिला एका कंपनीत रिसेप्शनिस्टची नोकरी मिळाली. याच कालावधीत तिने बार्टीया संस्थेतून डिजिटल मार्केंटिंगचा विनामूल्य असलेला सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. या अभ्यासक्रमामुळे तिला एका आयटी कंपनीत नोकरी मिळाली. पगार होता १५ हजार रुपये. अ‍ॅक्सेंचरही माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी आणि प्रख्यात कंपनी आहे. या कंपनीत नोकरी करणं हे अनेक आयटी मधल्यांचं स्वप्न असतं. पद्मजा पण तेच स्वप्न पाहत होती आणि ती संधी तिला मिळाली. अ‍ॅक्सेंचरमध्ये तिला नोकरी मिळाली. आयुष्यातलं तिचं दुसरं स्वप्न पूर्ण झालं.नोकरी मिळून दोन दिवस झाले होते. मित्रपरिवार
, नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षाव चालूच होता. एवढ्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळविणारी पद्मजा कदाचित त्यांच्यातील पहिलीच मुलगी असेल. पद्मजा एका कार्यक्रमाला गेलेली. तिथे कॅप्टन अमोल यादव वक्ते होते. मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण विमान बनवतो ही कल्पनाच अशक्यप्राय होती. पण, त्यांनी ती सत्यात उतरवली होती. त्याच कार्यक्रमात प्रमुख पाहुणे असणारे आयएएस अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या नोकरी मागणारे न बनता नोकरी देणारे बनाहे वाक्य पद्मजाच्या डोक्यात रुंजी घालू लागले. रात्रभर ती झोपली नाही. दुसर्‍या दिवशी ती ऑफिसला गेली आणि चक्क राजीनामाच देऊन आली. सहा लाख रुपयांच्या पॅकेजवर पद्मजाने क्षणार्धात पाणी सोडलं होतं. तिच्या या निर्णयाने तिचे कुटुंब, मित्रपरिवार सारे अचंबित होते. एकच व्यक्ती या निर्णयामागे ठाम होती ते म्हणजे तिचे पती, कपिल. त्यांनी पद्मजाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. आपल्या पतीच्या विश्वासाच्या जोरावर उद्योजकीय विश्वात गगनभरारी घेण्यास ती सिद्ध झाली.सॉफ्टवेअर कंपनी सुरु करण्याचा तिने पहिला विचार केला. तिने आपल्या आयटीच्या वर्तुळातील मित्रांना कंपनीमध्ये सहभागी होण्यासंबंधी विचारले
, मात्र त्यातील अनेकांच्या विविध अडचणी होत्या. त्यामुळे ते मध्येच नोकरी सोडू शकणार नव्हते. पद्मजांनी मग उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या दोन दिवसीय सत्रास हजेरी लावली. आपण चामड्यांच्या वस्तूंच्या उत्पादनाकडे वळावं, हा विचार आला. चर्मकार समाजाचा हा कौशल्य असलेला आगळा-वेगळा व्यवसाय आहे. आपणच आपला हा कौशल्याधारित व्यवसाय पुढे न्यायचा, हे मनोमन त्यांनी पक्कं केलं. यासाठी त्यांनी एका नावाजलेल्या संस्थेत बॅग्ज मेकिंगसाठी प्रवेश घेतला. हा दोन वर्षांचा डिप्लोमा होता. पण, एवढा वेळ नसल्याने व्यवस्थापनाशी बोलून त्यांनी हा अभ्यासक्रम सहा महिन्यांत पूर्ण केला. ते शिकत असतानाच त्यांनी सरावासाठी धारावी येथील एका बॅग तयार करणार्‍या लघु कारखानदाराशी संपर्क साधला. मी पगार नाही देऊ शकत, पण तुला शिकवू शकेन,” असं ते म्हणाले. त्यांना वाटले ही मॉर्डर्न दिसणारी मुलगी अशा कोंदट वातावरणात दोन दिवस पण टिकणार नाही. म्हणून त्यांनी पद्मजाला काही दिवस फक्त साफसफाई करण्याचंच काम दिलं. पद्मजाने हार मानली नाही, ते कामसुद्धा तिने आनंदाने केलं. सकाळी डोंबिवलीवरुन निघून मग अंधेरीला कोर्स आणि त्यानंतर धारावीला सरावासाठी कारखान्यात जाणं, असं तब्बल तीन महिने त्या राबल्या.पुरुषांची पाकिटं
, महिलांच्या बॅग्ज बनवण्यात त्या पारंगत झाल्या. जो उत्तम मार्केटिंग करु शकतो, तो काहीही विकू शकतो, हे त्यांना मनोमन पटलेलं. मार्केटिंग स्ट्रॅटेजीम्हणून त्या चक्क ट्रेनमध्ये पाकिटांचं मार्केटिंग करु लागल्या. लोकांना अस्सल चामड्याच्या वस्तू कशा ओळखाव्या हेदेखील सांगू लागल्या. लोकांना त्यांच्याप्रति विश्वास वाटू लागला. त्यातच एकाने सांगितले, “तुम्ही स्वत:चा ब्रॅण्ड तयार करा,” आणि ऑराहा पद्मजा यांचा ब्रॅण्ड अस्तित्वात आला. नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेडअर्थात एनएसआयसीया संस्थेच्या प्रदर्शनात त्यांनी भाग घेतला. २०१७ मध्ये फक्त १० हजार रुपयांच्या भांडवलावर के. पी. इंडस्ट्रीजआकारास आली. निव्वळ दोन वर्षांत ही कंपनी काही लाखांची उलाढाल करु लागली. समाजकल्याण खाते, लिडकॉम सारख्या शासकीय विभागांना त्यांनी उत्पादने पुरवलेली आहेत.एका मोठ्या मॉलमध्ये वस्त्रप्रावरणाचं एक भव्य दालन होतं. तिथल्या वस्तू खूप महागड्या असतील म्हणून पद्मजा जाण्यास घाबरायच्या. जेव्हा त्यांचा दुसरा पगार झाला तेव्हा चाचरत त्या शोरुममध्ये गेल्या होत्या. आपलंसुद्धा एक असं शोरुम असेल जिथे पुरुषांच्या टायपासून ते बुटापर्यंत आणि शेविंग क्रीमपासून ते परफ्युमपर्यंत सगळं मिळेल. महिलांसाठीसुद्धा कपड्यांपासून ते सौंदर्यप्रसाधनापर्यंत सगळं एकाच छताखाली मिळेल.
ऑरानावाचं शोरुम सुरु करण्याची त्यांची भविष्यकालीन योजना आहे. पद्मजा एक उत्तम ब्लॉगर्स आहेत. त्यांनी काही चित्रपटांसाठी कथालेखनदेखील केले आहे. स्वप्नं पाहतात ते सामान्य, पाहिलेली स्वप्न साकारण्यासाठी धडपडतात, ते असामान्य आणि पाहिलेली स्वप्नं साकारुन आणखी नवी स्वप्नं पाहून तीसुद्धा प्रत्यक्षात उतरवतात ते खरे लिजण्ड्सअसतात. तिसरा प्रकार हा दुर्मीळ आहे. पद्मजा राजगुरु या खर्‍या अर्थाने लिजण्ड्सआहेत.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.