‘सेना’ विरुद्ध ‘शिवसेना’!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2020
Total Views |

shivsena_1  H x


- वडाळ्यामध्ये माजी सैनिकाला शिवसेनेच्या नगरसेवकाकडून दमदाटी

- गर्दुल्ल्यांचा अड्डा उद्ध्वस्त केल्याच्या रागातून सेना नगरसेवक संतापला?


मुंबई (सोमेश कोलगे ) :
निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना कांदिवलीमध्ये शिवसैनिकांनी मारहाण केल्याची घटना सर्वत्र चर्चेत असतानाच वडाळ्यातही शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी एका माजी सैनिकाला दमदाटी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, त्यानंतर एका रात्री एका अज्ञाताने संबंधित माजी सैनिकाच्या घरात घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचेही सीसीटीव्हीतून समोर आले आहे. माजी सैनिकाने गर्दुल्ल्यांचा अड्डा झालेले एक अवैध बांधकाम महापालिकेला तोडायला लावले, या संतापातून सेना नगरसेवक त्यांना जाब विचारायला गेले असल्याची माहिती आहे. तसेच अज्ञात हल्लेखोराला अमेय घोले यांनीच पाठविल्याचा आरोप माजी सैनिकाने केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल करून घेतला नाही म्हणून माजी सैनिकाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

माझी मानहानी करण्याचा प्रयत्न

आजूबाजूच्या वस्तीतील नागरिक त्या जागेचा वापर पार्किंगसह अन्य काही कारणासाठी करत होते. त्या ठिकाणी खासगी सुरक्षारक्षक होते. मी केवळ त्याविषयी विचारणा केली. मी अशा प्रवृत्तीचा माणूस नाही. त्यांनी माझी मानहानी करण्याचा प्रयत्न केला म्हणून मी देखील न्यायालयात दावा दाखल केला आहे.
- अमेय घोले, नगरसेवक, शिवसेना, मुंबई महापालिका.


ही घटना दि. १३डिसेंबर रोजी घडल्याची माहिती मिळाली आहे. सुजित गजानन आपटे असे संबंधित माजी सैनिकाचे नाव असून त्यांचे वकील धृतिमान जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपटे यांच्या घराजवळ एक अवैध बांधकाम करण्यात आले होते, ज्यात बसून अनेक गर्दुल्ले सर्रासपणे अमली पदार्थाचे सेवन करीत असत. सुजित आपटे यांनी त्याविरोधात मुंबई महापालिकेकडे तक्रार दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाच्या संदर्भाने महापालिकेकडून संबंधित वास्तू उद्ध्वस्त करण्यात आली. आपटे यांच्या घराजवळ अमली पदार्थांचे सेवन करणार्‍या गर्दुल्यांपैकी काहीजण जमले होते. त्यानंतर शिवसेना नगरसेवक अमेय घोले हेदेखील संतापून सुजित आपटे यांच्या घरी आले. सुजित आपटे यांच्या म्हणण्यानुसार अमेय घोले यांनी त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्यासोबत महापालिकेचे एक कर्मचारीदेखील होते. त्यांनतर १८ डिसेंबर रोजीच्या रात्री तोंडाला कापड बांधून एक अज्ञात इसम माजी सैनिक आपटे यांच्या घरी आला व त्याने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आजूबाजूच्या रहिवाशांनी याठिकाणी धडक देताच तो पळून गेला व कोणताही गैरप्रकार होऊ शकलेला नाही. ही सगळे दृश्ये सोसायटीच्या कॅमेर्‍यात कैद झाली आहेत, असे आपटेंनी म्हटले आहे.


याविषयी सुजित आपटे यांनी पोलिसात तक्रार दिली. परंतु, सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, त्याच्यातून शिवसेना नगरसेवकाचे नाव वगळण्यात आले आहे. आता आपटे यांनी झाल्या प्रकाराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून वकील धृतिमान जोशी हे आपटेंची बाजू मांडत आहेत. याप्रकरणी नगरसेवक अमेय घोले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तो होऊ शकला नाही.

@@AUTHORINFO_V1@@