अमेरिकेतही गाजतेय बायडन यांची पावसातील सभा

    दिनांक  30-Oct-2020 15:10:35
|
Jo dd_1  H x W:
 
 
वॉशिंग्टन:
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रत्यक्ष मतदानाला चार दिवस राहिले आहेत. त्यामुळे आता प्रचाराच्या रणधुमाळीत दोन्ही उमेदवारांनी जोर लावला आहे. अमेरिकेत सध्या बायडन यांच्या पावसातील सभेची जोरदार चर्चा सुरू आहे. डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन फ्लोरिडा येथील सभेत भाषण करत असताना अचानक पाऊस सुरु झाला. मात्र, बायडन यांनी आपले भाषण सुरूच ठेवले.
अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि माजी उपाध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांच्यात या निवडणुकीत चुरशीची लढत होणार आहे.नुकत्याच दोन्ही नेत्यांच्या फ्लोरिडामध्ये सभा झाल्या. रिपब्लिकन पक्षाचं सरकार पुन्हा आणण्यासाठी फ्लोरिडा राज्य महत्त्वाचं आहे. त्यामुळे ट्रम्प यांना धक्का देण्यासाठी बायडन यांनी फ्लोरिडात विशेष जोर लावला आहे. फ्लोरिडामधील सभेत भर पावसात सभेत भाषण करणाऱ्या ७७ वर्षांच्या बायडन यांनी अमेरिकन नागरिकांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे. अमेरिकेत सध्या पोस्टल आणि ई-मेलद्वारे मतदान सुरू आहे. तर, दुसरीकडे तीन नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. यंदाची निवडणूक अटीतटीची होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही सर्वेक्षणात बायडन आघाडीवर असल्याचे सांगत येत आहे.बायडन सभेत भाषण करत असताना पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली. मात्र, बायडन यांनी सभेत भाषण सुरूच ठेवले. त्यांची ही सभा 'रॅली ड्राइव्ह इन' होती. या सभेला हजर असणारे कारमध्ये बसून भाषण ऐकत होते. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली होती. हा सभेचा व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना पावसात केस ओले होण्याची भीती वाटते. पण बायडन यांना तशी भीती वाटत नाही, अशा प्रकारची ट्विट्स बायडन यांच्या भाषणानंतर पाहायला मिळत आहेत. अनेकांना बायडन यांच्या भाषणानंतर माजी अध्यक्ष बराक ओबामांच्या १२ वर्षांपूर्वीच्या भाषणाची आठवण झाली आहे. बायडन यांनीदेखील त्यांच्या ट्विटर हॅडलवरून सभेतील फोटो ट्विट केला आहे. 'हे वादळ जाईल आणि नवा दिवस येईल,' असं शीर्षक त्यांनी फोटोला दिलं आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.