तस्करांच्या रडारवर मगरीची पिल्ले - बोरिवलीतून मगरीच्या पिल्लांची तस्करी उघड

    दिनांक  17-Sep-2019 17:44:45   परप्रांतीय तस्कारांकडून मगरींच्या दोन पिल्लांची सुटका

  

मुंबई ( विशेष प्रतिनिधी ) - ठाणे वनविभागाच्या वनाधिकाऱ्यांनी मगरीच्या पिल्लांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सोमवारी अधिकाऱ्यांनी बोरिवली येथे बसवर छापा टाकून तीन इसमांना अटक केली. त्यांच्याकडून मगरींच्या दोन जिवंत पिल्लांना ताब्यात घेण्यात आले असून तीघांवर वन्यजीव तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मगरींच्या पिल्लांच्या तस्करीच्या घटना उघड झाल्याने कासव व देशी-विदेशी पक्ष्यांनंतर तस्करांच्या रडारवर मगरीची पिल्ले असल्याचे दिसत आहे.

 

 
 
 

मुंबईतून सातत्याने उघडकीस येणाऱ्या वन्यजीव तस्करांची घटनांमध्ये आणखी एका घटनेची भर पडली आहे. वन विभागाने बुधवारी बोरिवली मार्गाने मुंबईत प्रवेश करणाऱ्या परप्रांतीय तस्करांना ताब्यात घेतले. हैद्राबाद येथील काही इसम वन्यजीवांच्या विक्रीकरिता बसने मुंबईत येणार असल्याची गुप्त माहिती ठाणे वन विभागातील अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी बोरिवली येथे सापळा रचला होता. महामार्गावर 'एमएच १२ क्यूडब्लू ९७१७' ही बस येताच वन अधिकाऱ्यांनी त्या बसची तपासणी केली. यावेळी बसच्या डिक्कीमधून मगरीच्या दोन जिवंत पिल्लांना त्यांनी ताब्यात घेतले. सोबतच बसचा चालक मोहमद अब्दुल रहीम हफिझ (वय ३३), खुद्दुस लतीफ बेैग (वय ३८) आणि छत्रपती उर्फ शिवाजी जी बालया (वय २८) या तीघांना अटक करण्यात आली. यामधील दोन आरोपी हैद्राबादचे असून एक आरोपी कर्नाटक राज्याचा निवासी आहे.

 

अटक केलेल्या आरोपींनी गुन्हा मान्य केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र मुठे यांनी दिली. शिवाय केलेल्या चौकशीमधूनविक्रीकरिता मगरींची पिल्ले मुंबईत आणल्याचे त्यांनी मान्य केल्याचे मुठे यांनी 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना सांगितले. सदर आऱोपींवर 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आाला असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तस्करांकडून ताब्यात घेण्यात आलेली मगरींची पिल्ले 'मार्श क्रोकोडाईल' या प्रजातीची असल्याची माहिती 'डब्लूडब्लूए' या प्राणिप्रेमी संस्थेचे अध्यक्ष आदित्य पाटील यांनी दिली. तसेच या मगरींना 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत प्रथम श्रेणीत संरक्षण देण्यात आल्याने त्यांची शिकार आणि तस्करी करणे कायद्याने गुन्हा असल्याचे त्यांनी सांगितले. ही संपूर्ण कारवाई ठाण्याचे उपवनसंरक्षक डाॅ. जितेंद्र रामगावकर, सहा. वनसंरक्षक (वन्यजीव) गिरजा देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र मुठे, वनपाल पवार, परदेशी, मोरे यांच्या पथकाने केली.

 
 

या प्रकरणामधूनकासव आणि देशी-विदेशी पक्ष्यांनंतर तस्करांच्या रडारवर मगरींची पिल्ले असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.कारण, गेल्या काही महिन्यांमध्ये वन्यजीव तस्करीच्या प्रकरणांमधून मगरींची पिल्ले विविध यंत्रणांकडून ताब्यात घेण्यात आली आहेत. जुलै महिन्यामध्ये 'महसूल गुप्तचर संचालनालया'ने (डीआरआय) नवी मुंबईतील एका इसमाकडून मगरीची २० पिल्ले ताब्यात घेतली होती. शिवाय नाशिकमधूनही मगरीच्या ८ पिल्लांची तस्करांच्या तावडीतून सुटका करण्यात आली होती.

 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat