रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ : उरल्यासुरल्या ‘स्वाभिमाना’चा पालापाचोळा

    दिनांक  23-May-2019   राणे कुटुंबीयांच्या गेल्या पाच वर्षांतील या चौथ्या आणि अतिशय दारुण पराभवाने राणे कुटुंबाची कोकणातील सद्दी आता संपली असल्याचं स्पष्ट केलं. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी पुन्हा एकदा विनायक राऊत आणि निलेश राणे या आजी-माजी खासदारांमध्ये मुख्य लढत होती. काँग्रेसने देशातील इतर अनेक मतदारसंघांप्रमाणे इथेही उमेदवार निवडीत घोळ घालून नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी देत स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली होतीच. त्यामुळे प्रामुख्याने सेनेचे राऊत आणि महाराष्ट्र स्वाभिमानचे निलेश राणे यांच्याभोवतीच फिरलेली ही निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक खा. नारायण राणे यांनी भलतीच प्रतिष्ठेची केली होती. परंतु, कोकणात शिवसेनेचे गेल्या तीन दशकांत उभे राहिलेले मजबूत नेटवर्क, युती झाल्यामुळे भाजपची लाभलेली साथ आणि राणे यांच्या गेल्या पंधरा वर्षांतील राजकीय प्रवासामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर उभे राहिलेले प्रश्नचिन्ह यामुळे विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा दणदणीत विजय नोंदवत लोकसभेत दिमाखात एंट्री केली आहे.

 

२००९ मध्ये सुरेश प्रभूंसारख्या दिग्गज नेत्याचा ५० हजार मतांनी पराभव करून नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे खासदार बनले. परंतु, २०१४ मध्ये सेनेच्या विनायक राऊत यांनी निलेश यांचा दीड लाख मतांनी पराभव केला. पुढे विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा कुडाळमधून, त्यानंतर वांद्रे (पूर्व) विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही पराभव झाला. पुढे राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नवा पक्ष स्थापन करणं, त्यात पुन्हा भाजपकडून राज्यसभेची खासदारकी घेणं वगैरे इतिहास आपल्याला ठाऊक आहेच. दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण, कोकण रेल्वे दुपदरीकरण, इतर अनेक विकासात्मक प्रकल्पांमुळे कोकणात शिवसेनेला पाठबळ मिळालं. त्यात नाणार प्रकल्प रद्द झाल्याचाही थोडाफार फायदा झाला. सोबतीला शिवसेनेचं दोन्ही जिल्ह्यांतील संघटनात्मक जाळं होतंच. स्वाभाविकच राणे कुटुंब की शिवसेना-भाजप युती, या प्रश्नावर कोकणवासीयांनी सेनेलाच निवडलं. त्यामुळे हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही ही निवडणूक जिंकून आपलं राजकीय वजन शाबूत ठेवण्यात नारायण राणे अॅण्ड कंपनीला अखेर अपयशच मिळालं आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat