गोष्ट एका हत्याकांडाची...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2019   
Total Views |


 


मोठ्या संख्येने बिश्नोई लोक तिथे जमू लागले आणि झाडांना मिठ्या मारू लागले. अभयसिंगाचा सरदार कोणालाही दयामाया दाखवायला तयार नव्हता. एकामागून एक माणसं आणि माणसांमागून झाडं कापली जात होती. या हत्याकांडाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि आजूबाजूच्या सुमारे ८० गावांमधून हजारोंच्या संख्येने बिश्नोई तिथे गोळा झाले. एकूण ३६३ बिश्नोईंची कत्तल झाली.


गुरू जंभेश्वरांच्या शिकवणीने मारवाड प्रांतातल्या माणसांचा निसर्गातला हस्तक्षेप कमी झाला. प्रत्येक झाड आणि प्रत्येक प्राणी यांची बिश्नोई लोक काळजी घेऊ लागले. वैराण झालेली ती भूमी पुढील काही दशकांमध्ये पुन्हा हिरवी झाली. बिश्नोईंची निसर्गावरची श्रद्धा फळाला आली होती. पण, त्यांच्या निष्ठेची खरी परीक्षा पुढेच होती. राजस्थानमधील मारवाड, म्हणजेच अलीकडचा जोधपूर प्रांत हा एकेकाळी आत्ताच्यासारखा ओसाड वाळवंटी नव्हता. इथे खेजरी, बेर, सांगरी, यांचे मोठाले वृक्ष होते. 'खेजरीचं झाड' (Prosopis cineraria) हा तर इथला कल्पवृक्ष ! आज ते झाड हे तर राजस्थानचा 'राज्यवृक्ष' म्हणून ओळखले जाते. राजस्थानच्या रणरणत्या उन्हात खेजरीचे वृक्ष माणसांना आणि प्राण्यांना सावली देतात. खेजरीची पानं गुरं, मेंढ्या, उंट यांचं आवडतं आणि पौष्टिक खाद्य. खेजरीच्या शेंगांची आमटी हा तेथील लोकांचा आवडता 'मेन्यू.' नीलगायी, काळवीट, हरीण अशा जंगली प्राण्यांचा अधिवास एकेकाळी या मारवाड प्रांतात होता. भिल्ल आदिवासी जमात इथे वास्तव्य करत होती. साधारणतः तीन हजार वर्षांपूर्वी रजपूत आणि जाट यांनी मारवाडवर आक्रमण केलं. भिल्लांनी त्यांना थोपवण्याचा प्रयत्न केला, पण शस्त्रधारी आक्रमकांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. भिल्लांनी अरवली पर्वताच्या टेकड्यांमध्ये आश्रय घेतला आणि मारवाड प्रांतावर रजपूत आणि जाटांचं वर्चस्व प्रस्थापित झालं. हे रजपूत आणि जाट गुरं-मेंढ्यांचे भलेमोठे तांडे घेऊन आलेले. पुढची काही शतकं तिथे अतिप्रमाणात गुरेचराई आणि वृक्षतोड झाली. निसर्ग पार उद्ध्वस्त झाला.

 

. स. १४५१ साली मारवाडच्या एका रजपूत कुटुंबात जांभोजी नावाच्या एका मुलाचा जन्म झाला. लहानपणापासून गुरं, मेंढ्या चरायला घेऊन जाणं हा त्याचा आवडता छंद. तो जेव्हा २५ वर्षांचा झाला, तेव्हा मारवाड प्रांतावर भयानक दुष्काळ पडला. पावसाचा एक थेंबही पडला नाही. हा दुष्काळ एका वर्षापुरता नव्हता, तर सलग आठ वर्ष राहिला. लोकांकडचं साठवून ठेवलेलं धान्य संपलं. गुरं तहान-भुकेने मरायला लागली, सगळी झाडं सुकून गेली. माणसं भुकेने तडफडायला लागली. मारवाड प्रांत वैराण झाला. जांभोजी हे सर्व डोळ्यांनी पाहत होता. एकेकाळी पाहिलेलं आणि अनुभवलेलं निसर्गवैभव असं बेचिराख झालेलं बघून जांभोजीचं मन हेलावलं. इ. स. १४८५ साली, म्हणजेच वयाच्या ३४व्या वर्षी जांभोजीने दृढनिश्चय केला आणि उजाड झालेला निसर्ग पुनर्प्रस्थापित करण्याची शिकवण तो लोकांना देऊ लागला. दुष्काळाने पोळलेल्या तिथल्या लोकांना जांभोजीची शिकवण मौलिक वाटू लागली. आयुष्याची पुढची तब्बल ५० वर्षं जांभोजीने निसर्गरक्षणाची शिकवण देण्यात घालवली. लोक त्याला आदराने 'गुरू जंभेश्वर' म्हणू लागले. गुरू जंभेश्वरांच्या अनुयायांचा एक नवा पंथ उदयाला आला - 'बिश्नोई.' 'बिश्नोई' या शब्दाच्या दोन व्युत्पत्ती सापडतात. भगवान विष्णूचे उपासक ते 'बिश्नोई' अशी एक व्युत्पत्ती आणि गुरू जंभेश्वरांनी जी २९ तत्त्वं सांगितली आहेत, त्यांचं पालन करणारे ते 'बिश्नोई' (२९ = वीस + नऊ, म्हणजेच राजस्थानी भाषेत 'बिश' + 'नोई') अशीही एक व्युत्पत्ती आढळते. सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करा, झाडं तोडू नका, पशुहत्या करू नका, मांसाहार करू नका, इ. २९ तत्त्वे बिश्नोई पंथाची मूलतत्त्वे बनली. गुरू जंभेश्वरांच्या शिकवणीने मारवाड प्रांतातल्या माणसांचा निसर्गातला हस्तक्षेप कमी झाला. प्रत्येक झाड आणि प्रत्येक प्राणी यांची बिश्नोई समाजातले लोक काळजी घेऊ लागले. वैराण झालेली ती भूमी पुढील काही दशकांमध्ये पुन्हा हिरवी झाली. तिथे वृक्षसंपदा वाढली. गुरं, मेंढ्या, हरिण तिथे चरायला लागली. शेती चांगली पिकू लागली आणि बिश्नोई समाज समृद्ध झाला. बिश्नोईंची निसर्गावरची श्रद्धा फळाला आली होती. पण, त्यांच्या निष्ठेची खरी परीक्षा पुढेच होती.

 

ते साल होतं इ. स. १७३०. जोधपूरमध्ये त्यावेळी अभय सिंग नावाचा राजा राजपदावर होता. या अभय सिंगाला आपल्यासाठी मोठा राजवाडा बांधायचं मनात आलं. त्यासाठी भरपूर चुना लागणार होता आणि चुनखडीपासून चुना मिळवण्यासाठी भरपूर इंधन, म्हणजेच लाकूड लागणार होतं. अभयसिंगाने आपल्या सरदाराला झाडं तोडून आणण्यासाठी जोधपूरपासून १६ मैल लांब असणाऱ्या खेजर्ली या गावात पाठवलं. खेजर्ली हे बिश्नोईंची वस्ती असलेलं, वृक्षसंपदेने नटलेलं गाव होतं. अभयसिंगाच्या आज्ञेप्रमाणे कामगार झाडं तोडून न्यायला या गावात आले. तिथल्या स्थानिक बिश्नोईंनी झाडं तोडायला पूर्ण विरोध केला. कामगारांनी हे वृत्त सरदार गिरीधर भंडारीला कळवलं. सरदार गिरीधर भंडारी स्वतः तात्काळ घोड्यावर बसून त्या गावात आला आणि कोणाच्याही विरोधाला न जुमानता त्याने कामगारांना झाडं तोडण्याची आज्ञा केली. सगळं गाव तिथे जमा झालं. एकही झाड तोडू न देण्यावर गावकरी ठाम होते. मात्र, सरदार ऐकायला तयार नव्हता. अखेर त्या गावकऱ्यांमधली अमृतादेवी नावाची एक शूर स्त्री आपल्या तीन मुलींना घेऊन पुढे आली. त्या चौघींनी चार झाडांना मिठी मारली आणि “आधी आम्हाला कापा, आणि मग झाडं कापा,” असं सरदाराला ठणकावून सांगितलं. निर्दयी सरदाराने त्या चौघींवर कुऱ्हाड चालवण्याची आज्ञा केली. अखेर त्या चौघींचे कुऱ्हाडीने तुकडे तुकडे करण्यात आले. हे हत्याकांड पाहून बिश्नोईंना चेव चढला. मोठ्या संख्येने बिश्नोई लोक तिथे जमू लागले आणि झाडांना मिठ्या मारू लागले. अभयसिंगाचा सरदार कोणालाही दयामाया दाखवायला तयार नव्हता. एकामागून एक माणसं आणि माणसांमागून झाडं कापली जात होती. या हत्याकांडाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि आजूबाजूच्या सुमारे ८० गावांमधून हजारोंच्या संख्येने बिश्नोई तिथे गोळा झाले. एकूण ३६३ बिश्नोईंची कत्तल झाली.

 

अखेर ही खबर महाराजा अभय सिंगापर्यंत पोहोचली. अभय सिंग तातडीने घटनास्थळी पोहोचला आणि झाला प्रकार पाहून त्याला अत्यंत दु:ख झाले. त्याने बिश्नोईंची माफी मागितली आणि यापुढे बिश्नोईंची वस्ती असणाऱ्या भागातलं एकही झाड तोडलं जाणार नाही तसेच एकही प्राणी मारला जाणार नाही, असं वचन त्याने दिलं. थारच्या वाळवंटात आज खेजर्ली हे गाव आपलं सांस्कृतिक वेगळेपण टिकवून आहे. ३६३ बिश्नोई शहिदांच्या स्मरणार्थ ३६३ खेजरीची झाडं इथे लावली गेली आहेत. अमृतादेवी या शूर स्त्रीचं स्मारक इथे पाहायला मिळतं. ज्या ठिकाणी हे हत्याकांड घडलं त्या ठिकाणी दरवर्षी भाद्रपद महिन्यात मोठा उत्सव साजरा केला जातो. बिश्नोईंच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन १९७३ साली उत्तराखंडमध्ये 'चिपको आंदोलन' झालं, जे जगभर गाजलं. 'चिपको आंदोलना'तही आदिवासी महिला झाडांना कवटाळून उभ्या राहिल्या आणि झाडं तोडायला आलेल्या कंत्राटदाराला आल्या पावली परत पाठवलं. सुदैवाने 'चिपको आंदोलना'त हत्याकांड झालं नाही. तो एक यशस्वी सत्याग्रह ठरला. धन्य ती अमृतादेवी! धन्य ते बिश्नोई!

 

(संदर्भ : Ecological Journeys - डॉ. माधव गाडगीळ)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@