सावध ऐका पुढल्या हाका...

    दिनांक  09-Jan-2019   
 

इस्लामी दहशतवादाचे आतापर्यंतचे सर्वांत भीषण आणि क्रूर रूप म्हणून इसिसची ओळख आहे. सुरक्षाविषयक अभ्यासक, पत्रकार, गुप्तहेर या धोक्याबाबत गेल्या काही वर्षांपासून दक्षिण आशियाई देशांना सावध करत आहेत आणि आता हे महासंकट भारताच्या दाराशी येऊन ठेपल्याचं दिसतं.

 

तालिबान, मग अल कायदा आणि आता इसिसच्या रूपाने इस्लामी दहशतवाद रोज नव्याने अधिकाधिक उग्र स्वरूप धारण करताना दिसत आहे. इस्लामी दहशतवादाचे आतापर्यंतचे सर्वांत भीषण आणि क्रूर रूप म्हणून इसिसची ओळख आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, तितकेच प्रगत तंत्रज्ञान, सुशिक्षित माथेफिरूंची फौज, समाजमाध्यमांचा प्रभावी वापर आणि त्यासोबत कमालीच्या थंड डोक्याने रचले जाणारे विध्वंसक कट यामुळे इसिस हे सध्या सार्‍या जगापुढे एक आव्हान होऊन बसले आहे. आतापर्यंत केवळ मध्य-पूर्वेपुरत्या मर्यादित असलेल्या इसिसची पाळेमुळे दक्षिण आशिया आणि विशेषतः भारताच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचली आहेत आणि गेल्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडींतून हे सिद्धही झाले आहे. अनेक सुरक्षाविषयक अभ्यासक, पत्रकार, गुप्तहेर या धोक्याबाबत गेल्या काही वर्षांपासून दक्षिण आशियाई देशांना सावध करत आहेत आणि आता हे महासंकट भारताच्या दाराशी येऊन ठेपल्याचं दिसतं.

 

पुढील काही वर्षे भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. यंदाचे वर्ष देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचे वर्ष आहे, तसेच त्यादरम्यान व नंतर देशातील अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये (महाराष्ट्रासह) विधानसभांच्या निवडणुका आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय संबंध तसेच देशांतर्गत पायाभूत सुविधा, उद्योग, विज्ञान-तंत्रज्ञान आदी क्षेत्रांतही भारत एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. शेजारी राष्ट्र व गेल्या कित्येक वर्षांपासूनची डोकेदुखी, अर्थात पाकिस्तानशी भारताचे संबंध सध्या निर्णायक टप्प्यावर असून काश्मीर प्रश्नदेखील नव्याने उग्र रूप धारण करत आहे. अशा सर्व परिस्थितीत भारतासाठी पुढील २-३ वर्षे अत्यंत महत्त्वाची असतील. त्यात पुन्हा इसिसचे अस्तित्व अथवा त्याची कोणतीही पाळेमुळे भारताच्या आसपासही असणे, हे चिंताजनक आहे. काश्मीरमध्येही इसिस सक्रिय झाली असून २०१६ पासून काश्मीरमधील युवकांमध्ये समाजमाध्यमांद्वारे इसिसचा प्रचार-प्रसार थंडपणे केला जात असल्याचे अनेक घटनांतून उघड होत आहे. इसिसने काश्मीरबाबतचा आपला दृष्टिकोन मांडताना काश्मीरला अफगाणिस्तानमधील खोरासन प्रांताचा भाग म्हणून संबोधले होते. यावरून हा धोका किती गंभीर आहे, हे आपल्या लक्षात येईल. गेल्या एका वर्षात काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांपैकी दोन हल्ल्यांची जबाबदारीही इसिसने घेतली. या संघटनेने काश्मीरसाठी आपली एक स्वतंत्र विंगदेखील स्थापन केली असल्याचे वृत्त आहे.

 

हा झाला केवळ काश्मीरचा मुद्दा. उर्वरित भारतातही परिस्थिती काहीशी गंभीरच आहे. भारतातील काही दहशतवादी संघटना आता इसिसशी आपली बांधिलकी सांगू लागल्या आहेत. याखेरीज देशातील मुस्लीमबहुल राज्यांत युवकांमध्ये असंतोष आणि कट्टरतावाद रुजवण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील काही भागांत छापे टाकून मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आणला होता. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने भारतीय तपास यंत्रणांची ही एक मोठी व अभिमानास्पद कामगिरी होती, यात शंकाच नाही. परंतु, त्याचसोबत या सर्व कटांचे इसिस कनेक्शनदेखील यानिमित्ताने समोर आले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे आतापर्यंत केवळ समाजमाध्यमांवरून भारतात प्रसार करणारी ही संघटना भारतात प्रत्यक्ष अस्तित्व वाढविण्याचा प्रयत्न करत आहे व स्थानिक तरुण दुर्दैवाने त्याला बळीही पडत आहेत, हे वास्तव आहे. काश्मिरी तरुणांमध्ये कट्टरतावादाचे बीजारोपण आता अधिक वेगाने होऊ लागले आहे. भारतीय सैन्यदलांच्या खमकेपणामुळे व सतर्कतेमुळे परिस्थिती इतकीही हाताबाहेर गेलेली नाही, हे खरे असले तरी हा कायमस्वरूपी तोडगा असू शकत नाही, हेही तितकेच खरे. पुन्हा काश्मीर हा एक विषय आणि उर्वरित भारतातदेखील वेगाने वाढणारा, दहशतवादाला खतपाणी घालणारा कट्टरतावाद हा आणखी एक गंभीर विषय.

 

या प्रकारच्या ‘रॅडिकलायझेशन’चा सर्व स्तरांवर अभ्यास करून त्याला आटोक्यात आणण्यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. हे काही केवळ सैन्याचे किंवा गुप्तचर यंत्रणेचे किंवा सायबर क्राईम ब्रांचचे काम निश्चितच नव्हे. इसिस किंवा त्या प्रकारच्या संघटनांच्या अपप्रचाराला बळी पडणारे युवक हे काही सारेच गरीब, बेरोजगार आहेत, असे नाही. त्यातील कित्येक हे उच्चशिक्षित, चांगली नोकरी-व्यवसाय असणारे शिवाय उत्तम कौटुंबिक पार्श्वभूमी असणारे आहेत. तरीही त्यांच्यात हा माथेफिरूपणा कोठून येतो आणि या प्रकारच्या अतिरेकी हिंसेला ते प्रवृत्त कसे होतात, या प्रश्नाची उकल व्हायला हवी. मानसशास्त्र, इतिहास संशोधन, भाषा, साहित्य, माहिती-तंत्रज्ञान, राजकारण आणि सुरक्षा आदी क्षेत्रांतील व्यक्तींनी एकत्र येऊन यामध्ये संशोधन करून उपाययोजना करण्याची गरज आहे. कारण, हा धोका वाळवी किंवा विषाप्रमाणे आहे, तो पसरत जाण्यापूर्वीच आटोक्यात आणायला हवा, किंबहुना पूर्णपणे संपवायला हवा, तरच भविष्यकाळ सुरक्षित राहू शकेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/