बाजीराव पेशवे यांच्या युद्धनिती अंगिकारल्यास देशाच्या सीमा भविष्यातही सुरक्षित : अमित शहा एनडीएमध्ये श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूप पुतळ्याचे अनावरण

    04-Jul-2025
Total Views |

पुणे, "छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराजाची स्थापना केली त्यातून स्वराज्याचे संस्कार पेरले. ही ज्योत छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, धनाजी, संताजी, तानाजी यांनी तेवत ठेवली. हीच परंपरा पुढे चालवत थोरले बाजीराव पेशवे यांनी स्वराज्याची मशाल पेटती ठेवली. युद्ध कौशल्याच्या माध्यमातून स्वराज्याची सीमा विस्तारण्याचे मोठे कार्य पेशवे यांनी केले आहे. मातृभूमी, धर्मभूमी आणि स्वराज्यासाठी सातत्याने युद्ध करणारे ते एकमेव अजेय आणि पराक्रमी योद्धा आहेत, असे गौरवोद्गार केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काढले.

खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे साडेतेरा फुट उंचीचा भव्य अश्वारूढ पुतळा थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्यावतीने उभारण्यात आला असून या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे, थोरले बाजीराव पेशवे यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा, एनडीएचे कमांडंट व्हाईस ॲडमिरल गुरचरण सिंह, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, सचिव कुंदनकुमार साठे, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण मंचावर उपस्थित होते.

श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यास मोलाचे सहकार्य करणारे सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे, शिल्पकार विपुल खटावकर, वास्तुविशारद अभिषेक भोईर यांचा या वेळी अमित शहा यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

अमित शहा पुढे म्हणाले की," युद्ध नियम कालबाह्य नसतात. व्यूहरचना, त्वरा, समर्पण भाव, देशभक्ती, बलिदानाची वृत्ती योद्ध्याला नेहमीच प्रेरित करते आणि यश देते. या सर्वांचा संगम असलेले श्रीमंत बाजीराव पेशवे हे एकमेव लढवय्ये होत. त्यामुळे अवघ्या १९व्या वर्षी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर पुढील २० वर्षात ४१ लढाया लढूनही पेशवे एकही लढाई हरले नाहीत. संरक्षण दलांच्या तिन्ही विभागांचे प्रशिक्षण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत दिले जाते. या संस्थेतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा कायम प्रेरणा देईल. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या युद्धनितीच्या कौशल्यातून देशाच्या सीमा भविष्याही सुरक्षित राहतील. मला निराशा आली तर छत्रपती शिवाजी, श्रीमंत बाजीराव पेशवे या वीर योद्ध्यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आठवतो आणि माझी निराशा नाहीशी होते."

"देशासाठी समर्पण, बलिदान देणाऱ्या अनेक योद्ध्यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने जगासमोर मांडला गेला तसेच पुसला गेला. विकास आणि विरासत या पंतप्रधान मोदी यांच्या सूत्रातून प्रेरणादायी व्यक्तीमत्वांचा, वीर योद्ध्यांचा खरा इतिहास जगासमोर यावा यासाठी हा इतिहास भावानुवादीत होणे आवश्यक आहे." त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही अमित शहा यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले किं," देशातील नामांकित प्रबोधिनीत थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे, ही आनंदाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी विजीगिषु वृत्तीने स्वराज्याची ज्योत सामान्य मराठी माणसाच्या रक्तात फुलविली ती अखंडित ठेवत तिचा विस्तार करण्याचे महान कार्य श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी केले. सर्व दिशांना हिंदवी स्वराज्य स्थापन करीत असताना त्यांनी वेगाची रणनिती अवलंबिली. इंग्रज आणि मुघलांकडून अनेक महानायकांचा इतिहास पुसला गेला आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या भव्य पुतळा उभारणीतून मराठ्यांचा उज्ज्वल इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचेल."

विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले की, "राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत उभारलेल्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याने पराक्रमाची पूजा बांधण्याचा अनुशेष भरून निघाला आहे. हा केवळ पुतळा नसून हे पराक्रमाचे स्मारक आहे. वीर सेनानींच्या पराक्रमाच्या गाथांचे विविध भाषांत अनुवाद व्हावेत ज्यायोगे विस्मृतीत गेलेल्या इतिहासाला उजाळा मिळेल.

प्रास्ताविकात प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण गोखले म्हणाले, वीर योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार असून देशासाठी आयुष्य समर्पित करण्याची भावना वाढीस लागणार आहे. सेवा परमो धर्म या भावनेतून कार्य करणाऱ्या देशाच्या सेनेला पेशवे यांच्या युद्धनितीची शिकवण मिळणार आहे. मोहन शेटे आणि कुंदनकुमार साठे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

बाजीराव पेशवे वंशजांमध्ये निमंत्रणावरून वाद


कार्यक्रमासाठी उशिरा आमंत्रण दिले आणि व्यासपीठावर जागा देणार नसल्याचे आयोजकांनी सांगितले. हा पेशव्यांच्या वंशजांचा अपमान असल्याने कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याची भूमिका राणी मस्तानी यांचे वंशञज नवाब शादाब अली बहादुर पेशवा, नवाब ऑफ बांदा यांनी घेतली आहे.पेशव्यांच्या पुण्यातील वंशजांना व्यासपीठावर जागा आहे, मात्र आपल्याला खाली बसविण्यात येणार असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. पेशव्यांचे सध्याचे पुण्यातील वंशज रघुनाथ राव हे वाराणसी येथून भासकुटे परिवाराकडून दत्तक घेतले आहेत. बाजीराव पेशव्यांचे खरे वंशज आम्हीच आहोत. पेशव्यांचा गौरवशाली इतिहास आहे. या गौरवजञाली इतिहासाकडे थोरले बाजीराव पेशवा प्रतिष्ठान समितीने दुर्लक्ष केले आहे. दत्तक वंशजाना मात्र मानाचे स्थान दिले आहे. या माध्यमातून ऐतिहासिक सत्य दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, असें नवाब जदाब अली बहादूर पेशवा यांनी सांगितले.