धुळ्यातील राक्षसी क्रौर्याचा बोध...

    03-Jul-2018
Total Views | 24



 
 
संशय माणसाला चिंतेत टाकून चितेसारखा जाळतो असे म्हणतात. संशय मग तो नवरा-बायकोमधील असो, भावाभावांमधील असो, कार्यालयातील सहकार्‍यांबद्दल असो किंवा राजकारणातील डावपेचांतर्गतचा असो, त्यामुळे माणसामध्ये विकृती निर्माण होते. याचे परिणाम हाणामारी, हातघाईवर येणे, आदळआपट करणे, प्रसंगी समोरच्याची बदनामी करणे आणि याचा अखेर अनेकदा हत्यांमध्ये व हिंसाचारातही होतो, हे पुन्हा एकदा धुळ्यातील घटनेने सिद्ध झाले आहे. सारे झाल्यानंतर मग ‘संशय का मनी आला?’ असे म्हणण्याची वेळ येते. पण, तोवर सारा गेम खल्लास झालेला असतो, होत्याचे नव्हते झालेले असते, काळ आपला वेळ साधून गेलेला असतो आणि व्यक्तीच्या हाती, हात चोळत बसण्याशिवाय दुसरे काहीही उरलेले नसते.
 
 
धुळ्यात काल लहान मुले चोरण्यासाठी आल्याच्या संशयावरून गावकर्‍यांनी पाच जणांची दगड-विटांनी ठेचून हत्या करून टाकली. साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरातील राईनपाडा गावात घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. पण, या अटकेतून काही साध्य होणार नाही. त्यातून पाच जणांचे गेलेले प्राण परत येणार नाहीत. किडनी काढण्यासाठी लहान मुले पळविणारी टोळी गावात आल्याच्या अफवेचे भूत डोक्यात संचारलेल्या ग्रामस्थांनी आठवडी बाजारातच या पाचही जणांना जबर मारहाण करून, त्यांचे या जगातील अस्तित्व खल्लास केले. विशेष म्हणजे हे मृतक भटक्या विमुक्त समाजातील नाथपंथी होते.
 
 
क्रौर्याची परिसीमा गाठलेल्या या घटनेत आरोपींनी, पोलिसांनी हस्तक्षेप करण्यापूर्वीच पाचही जणांना इतकी बेदम मारहाण केली, की रक्तबंबाळ झाल्याने मरणासन्न अवस्थेला पोहोचले. जमाव तर इतका हाताबाहेर गेला होता की त्यांनी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही सोडले नाही! जमावाच्या मारहाणीत दोन पोलिसही गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर हिंस्र झालेला समाज पांगला आणि खरे आरोपी कोण हे सांगायलाच कोणी पुढे आले नाही. पण, या प्रकरणी लोकांनी घेतलेल्या व्हिडीओ बघून 10 जणांना अटक करण्याता पोलिसांना यश आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात नाथपंथी डवरी समाज मोठ्या प्रमाणात राहतो. मंगळवेढा तालुक्यात 20 गावांमधून 15 ते 16 हजार नाथपंथी डवरी, गोसावी समाजाचे लोक राहतात. या समाजाची पहिली पिढी अजूनही भिक्षा मागून जगते. दुसर्‍या पिढीला थोडीफार शैक्षणिक गती आहे. विविध गावांत राहात असले तरी त्यांना अद्याप रेशनकार्ड नाही. पोटापाण्यासाठी कुटुंबासह या समाजातील लोकांना रानोमाळ भटकावे लागते.
 
 
मंगलप्रसंग व काही कारणानेच ही मंडळी मूळ गावी परततात. भिक्षुकीचा व्यवसाय असल्याने ज्या गावात ही मंडळी जातात, तेथे त्यांच्याकडे संशयाने बघितले जाते. तो खरा की खोटा हा भाग नंतरचा, पण प्रारंभी त्यांना टक्केटोणपे खाल्ल्याशिवाय दोन वेळच्या जेवणाचीही सोय होत नाही. पर्यायाने त्यांना सतत भीतीच्या सावटाखालीच वावरावे लागते. कुठून कोणते बालंट अंगावर येईल, याचा नेम नसतो. बरेचदा तर स्थानिक लोक यांना या ना कारणाने वेठीस धरतात आणि प्रकरणे पोलिसांपर्यंत येऊन पोहोचतात. रानोमाळ भटकत असल्याने नाथपंथीयांची स्वतःची घरे नाहीत. त्यांच्या उत्पन्नाचेही साधन नसल्याने विपन्नावस्थेतच त्यांना जीवन जगावे लागते. शेतीही नसल्याने नित्याचे उत्पन्नाचे साधनही त्यांच्याजवळ नाही. अशाच या मागास समजल्या जाणार्‍या समाजाबद्दल अनेक प्रवादही आहेत. ही मंडळी मुले चोरते, किडनी चोरून त्याचा व्यवसाय करते, चोर्‍यामार्‍या हा त्यांचा नित्याचाच व्यवसाय असल्याचाही त्यांच्यावर ठपका असतो आणि यातूनच त्यांच्याबद्दलच्या गैरसमजातून हाणामारीचे आणि त्यांना या जीवनातून संपविण्याचे प्रकार घडत असतात. धुळ्याच्या घटनेत पाच जणांचे प्राण गेले, मात्र अशा दुर्घटना या समाजासाठी नव्या नाहीत. 2016 मध्ये नागपुरात चोरीच्या संशयावरून कळमना परिसरात जमावानेच पाच बहुरुपींची सामूहिक हत्या करून टाकली होती. या घटनेतील आरोपींना अद्याप योग्य ती शिक्षा झालेली नाही. संशयावरून घडलेले हे पहिलेच हत्यासत्र नाही. अशा अनेक घटना रोजच्या दैनंदिन जीवनात वाचायला मिळतात. अनेकदा अघोरी विद्येच्या आहारी गेल्यामुळे नरबळीसारखे प्रकार घडतात, घरातल्या लहान मुलाची अथवा मुलीची हत्या केली जाते, तर कधी संशयावरून कुटुंबातील सदस्यांनाही कायमचे संपविले जाते. उत्तर दिल्लीत बुराडी परिसरात एकाच घरात 11 मृतदेह आढळल्याने राजधानी दिल्ली हादरली.
 
 
दिवसभर, हा आत्महत्येचा प्रकार की हत्येचा यावर काथ्याकूट सुरू असताना, या घरातून हे कुटुंब एका अघोरी विद्येचे साधक असल्याचे पुरावे मिळाले. मराठवाड्यात मुले पळविणारी टोळी असल्याच्या अफवांचे पीकच आले असून, गेल्या महिनाभरापासून व्हॉटस्‌अॅपच्या माध्यमातून अशा अफवा जाणीवपूर्वक पसरविल्या जात आहेत. नांदेड, परभणी, बीड, हिंगोली, लातूर येथेही मुले पळविणारे समजून मारहाणीच्या 20-25 घटना घडल्या आहेत. औरंगाबादेत तर मुले पळविण्याच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत दोनपैकी एका बहुरुप्याचा मृत्यू झाला. वैजापूर तालुक्यात अशाच घटनेत दोघा बहुरुपींचा मृत्यू झाला. या सार्‍या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात प्रशासनाला अपयश आलेले आहे. गेल्या काही दिवसांत संशयावरून मारहाण करण्याच्या अनेक घटनांची नोंद झाली आहे. नांदेडला संशयावरून पाच भंगार विक्रेत्यांना झालेली मारहाण या विषयाचे गांभीर्य वाढवणारी आहे. परभणीत पाच जणांना, सोनपेठेत एकाला तर गंगाखेड येथे तिघांना मुले पळविणारे समजून मारहाण झाल्याची घटना घडली आहे.
 
 
बीडमध्ये अशीच घटना उघडकीस आली आहे. माजलगाव, गेवराई, परळी येथे प्रत्येकी एकाला मारहाण झाली असून, बहुरुप्यांना झालेल्या या प्रकरणात 10 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मूलतः या सार्‍या घटनांना व्हाटस्‌अॅप ही सोशल नेटवर्किंग साईट जबाबदार असल्याची बाब पुढे आली आहे. कुणीतरी व्हॉटस्‌अॅपवर पोस्ट करतो काय आणि त्या पोस्टची शहानिशा न करता गावातील तरुणाईला बहुरुप्यांविरुद्ध भडकवले जाते काय, हे सारेच अगम्य असे आहे. सारा शिकलेला समाज एकाच वेळी बेभान होत असेल आणि तो प्रत्येकच गावात आपले राक्षसी रूप दाखवत असेल, तर यामागे केवळ अफवा पसरवणे हे छोटेसे कटकारस्थान नसून, त्यामागे बहुरूपी समाजाला या संस्कृतीपासून तोडण्याचा मोठा कट तर नाही ना, अशी शंका घ्यायला वाव आहे. या समाजाचा कुणीही वाली नाही, त्यांचा जनसंपर्क नसल्याने कुठली अनुचित घटना घडली तर तो कुणाकडेही दाद मागण्यासाठी धाव घेऊ शकत नाही. अल्पसंख्यक असल्याने त्यांचे उपद्रवमूल्य शून्य आहे. राजकारण्यांनी त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा एकही मुद्दा त्यांच्या बंदुकीत ठासून भरलेला नाही. त्यामुळे या असहाय समाजातील लोकांवर वारंवार संशयातून हल्ले होण्याचे प्रकार घडत आहेत. काश्मीर खोर्‍यात तेथील नव्या राजवटीत पोलिस अधिकार्‍यांनी व्हाटस्‌अॅपच्या सर्व अॅडमिन्सना त्यांचा ग्रुप पोलिसांकडे नोंद करण्याचे आवाहन केले आहे. यातून समाजात दुही माजविणार्‍या लोकांविरुद्ध कारवाई करणे सोपे होणार आहे. तसलाच प्रकार राज्यातही केल्यास अनेक जण अडचणीत येतील हे जरी खरे असले, तरी प्रशासनाची त्यामुळे निश्चितच मोठी सोय होणार आहे. धुळ्यातील जमावाच्या राक्षसी क्रौर्यातून तूर्तास एवढा बोध पुरेसा असावा...
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121