यवतमाळमध्ये एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात!

    दिनांक  19-May-2020 10:04:23
|

accident_1  H xअपघातात चार स्थलांतरित मजुरांचा मृत्यू; २२ जण जखमी


यवतमाळ : लॉकडाऊनच्या घरची वाट धरणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या अपघाताच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाही. सोलापूरहून कामगारांना झारखंडला घेऊन जाणाऱ्या एसटी बसची टिप्परला धडक बसून यवतमाळमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये बसमधील चौघा मजुरांचा जागीच मृत्यू झाला.


मजुरांना आपल्या मूळगावी घेऊन जाणाऱ्या एसटी बसने टिप्परला मागून धडक दिली. यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णीजवळील कोळवन गावाजवळ हा अपघात झाला. सोलापूरहून निघालेले मजूर एसटी बसने झारखंड राज्यात जात होते.


ही धडक इतकी भीषण होती, की बसमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर २२ जण जखमी आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उपचारासाठी आर्णी आणि यवतमाळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की बसचा पुढील भाग चक्काचूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.