आम्ही सुसंस्कृत असतो म्हणजे काय...?

    दिनांक  07-Mar-2018   
श्रीदेवीच्या जाण्याने अनेक प्रश्न नव्याने उभे झाले आहेत. माध्यमांनी अन्‌ त्यातही इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी जे काय केले, त्याबद्दल खंतही व्यक्त करणे हादेखील भाबडेपणा झाला. प्रगल्भ, समंजसपणे ते कधी वागले आहेत? संसदेवरचा हल्ला असो, की मग मुंबईवरचा दहशतवाद्यांचा हल्ला असो. व्यावसायिक वृत्तवाहिन्या असण्याच्या सीमा त्यांनी नेहमीच ओलांडल्या आहेत. लोकशाहीचा तो चौथा स्तंभ आहे, असे म्हणतात. आता व्यावसायिक न्यायाधीशासम असू शकते का? मग वृत्तसंस्था व्यावसायिकता ओलांडून निव्वळ धंदेवाईक कशा असू शकतात? आम्ही ते स्वीकारून टाकले आहे. आम्ही आमच्या आयुष्याचे खासगीकरण करून टाकले आहे. त्यात मग शुचितेच्या अन्‌ नैतिकतेच्या कल्पना नफा-तोट्याशी जोडल्या गेल्या असतात आणि त्या खूपच वैयक्तिक असतात. त्यामुळे त्यांच्याकडून ती अपेक्षा करणे गैरच आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ‘सबसे पहले हमारेही चॅनेलपर...’ या विखारी स्पर्धाभावाने राष्ट्राला नुकसानकारक असे सारेच वृत्तवाहिन्या दाखवीत सुटल्या होत्या. त्या आधी ट्वीन टॉवरवर हल्ला झाला आणि न्यू यॉर्कच्या महापौरांनी आवाहन केले अन्‌ तिकडच्या वृत्तवाहिन्यांनी त्यासंदर्भात वृत्त प्रक्षेपित करणेच बंद केले! मुंबई हल्ल्यानंतर भरपूर चर्चा झाली, टीकाही झाली, पण भारतीय वृत्तवाहिन्यांमध्ये फरक पडलेला नाही. श्रीदेवीचे संपताच एका बड्या वृत्तवाहिनीवर, करीनाचा लेक तैमुर हा त्याच्या हरविलेल्या खेळण्यासाठी कसा रडतो आहे, हे दिवसभर दाखवीत होते. कोण हा तैमुर?
संवादमाध्यमांवर आपण टीका करतो. तो अधिकार आपल्याला आहे काय? ‘चोवीस बाय सात’ आपण समाजमाध्यमांवर खेळत असतो ते काय असते? ‘आपलं ते पडसं आणि इतरांचं ते घाणेरडं नाक!’ असा आपला एकुणात आव असतो. नैतिकतेचे सारेच निकष आम्ही इतरांसाठीच लावत असतो. ‘यथा राजा तथा प्रजा’ असे म्हणतात. तसेच, प्रजा जशी असेल तशीच मग माध्यमेही असतात. आमचा संवाद कुठल्या पातळीवर आहे? आमचे राजकारण कुठल्या स्तरावरचे आहे? समाजमाध्यमांवर आम्ही दिवसभर व्हॉटस्‌अॅप- व्हॉटस्‌अॅप खेळत असतो. तो संवादच असतो. कुठल्या पातळीवरचा असतो तो? श्रीदेवी नावाची कलावंत गेल्यावर, ती अनंतात विलीन होण्याआधीच आम्ही तिच्या संदर्भात बाष्कळ, पाणचट विनोद पेरायला लागलो होतो- ‘‘बघा, दारू गरिबाला गटारात पाडते अन्‌ श्रीमंतांना बाथटबमध्ये...,’’ अशी थेट संभावना आम्ही करत सुटलो. तिच्या पार्थिवावर तिरंगा झाकला होता. तिला ‘पद्मश्री’ हा खिताब देशानेच दिला होता. त्याचा तो मान होता. कलेच्या क्षेत्रात तिने उत्तुंग अशी कामगिरी केली होती. आम्ही मात्र, शहीदांच्या पार्थिवावर तिरंगा झाकला जातो अन्‌ आता या नटवीच्या प्रेतावरही तो झाकला म्हणून तिरंग्याची शान वाया गेल्याची खंत करीत ऊरबडवेपणा करत होतो. कुणाला शेतकर्‍यांच्या आत्महत्या आठवत होत्या. त्यावर कुणी रडत नाही अन्‌ आता एक नटी मेली (दारू पिऊन), तर तिच्यासाठी रडारड कशाला? असा सवाल आम्ही विचारत असताना आमच्या नाकाला, लिंबू कापले जावे इतकी धार चढल्याचे वाटत होते. एकदम आमच्या राष्ट्रीय अस्मितांनाच गवसणी घालण्याइतके काय झाले होते? आमचे सोवळेपण धोक्यात आल्यागत आम्ही ‘शिव... शिव...’ का करायला लागलो होतो? श्रीदेवीच्या पोस्टमार्टम अहवालात अल्कोहोलचे अंश सापडल्याचे म्हटले होते. त्यामुळे ती बाथटबमध्ये पडून दगावली, यावरून ती आमच्या शुचितापूर्ण शुभ्रअस्तनींच्या जगावर लांछन वाटू लागली होती. आमच्या नैतिकतेच्या दांभिक कल्पना आम्ही इतरांवर थोपवीत असतो. सोवळे पाळत असतो. सत्य स्वत:हून प्रकट होत असते. त्याला व्यक्त होण्यासाठी तुमच्या विटाळलेल्या चर्ममुखाची अन्‌ लबाड वाणीची गरजच नसते. ते स्वयंभू असते. आम्हाला मात्र, आम्ही सांगतो आणि मानतो तेच सत्य आहे, असेच वाटत असते. त्यामुळे नेमके काय झाले, याची वाटही न बघता आम्ही आमच्या नैतिकतेचा चाबूक हाणणे सुरू केले होते. तिला श्रद्धांजली वाहणेही आम्हाला आमचे पावित्र्य धोक्यात आणणारे वाटले. ज्याने त्याच्या आयुष्यात मद्याला हातही लावला नाही, त्यानेच तिच्यावर टीका करावी, असे म्हटले तर कितींची तोंडं उघडतील? मद्याचा शोधही लागला नव्हता असा या देशाचा मद्यपूर्व इतिहास सांगता येईल काय? बरे, तिने मद्यच घेतले होते, हे काही सिद्ध झालेले नाही. बोनी कपूरने आता केलेल्या खुलाशानुसार, बुडून मरावे इतके मद्य तर तिने खचीतच घेतले नव्हते. तरीही एका वृत्तपत्राच्या पोर्टलवर एका वाचकाने तिला चारित्र्यहीन वगैरे म्हणून टाकले होते. वरून, ‘‘मी हे कधीचेच सांगत होतो की, ती अट्‌टल दारूबाज आणि चारित्र्यहीन आहे; पण मी मुसलमान असल्याने कुणीच माझ्याकडे लक्ष दिले नाही.’’ असेही लिहून टाकले! हे सगळेच कुठल्या नैतिकतेच्या चौकटीत बसत असते?
मद्यप्राशन हा काही गौरवास्पद विषय नक्कीच नाही. मात्र, नसत्या ठिकाणी असा भंपक सोवळेपणाही करण्यात काही हशील नाही. तुमची संस्कृती, तुम्ही कलावंतांना किती समजून घेता, त्यांचा किती आदर करता यावर ती किती उन्नत आहे, हे ठरत असते. किमान तसे ठरावे. पाश्चात्त्य संस्कृतीच्या बाबत आपले आंबटच मत आहे. किंबहुना ती काही संस्कृतीच नाही, असे आपले मत आहे. ते तसे असण्यात काही गैर नाहीच. तसे ठरवत असताना, परंपरा म्हणजे संस्कृती नव्हे, हे आम्ही समजून घ्यायला हवे. नाहीतर ‘त्रिवार तलाक’सारखी परंपरा, प्रथा आम्ही अजूनही पाळतो आहोत. सती जाण्याचीही प्रथा या देशात होतीच. व्हॅनगॉगवर त्यांचा भाऊच नव्हे, तर त्यांचे अवघे गाव नि नंतर त्यांचा देशच प्रेम करत होता. त्यांनी त्यांचे सांस्कृतिक संचित म्हणून कलावंतांना जपले आहे. शेक्सपिअरचे घर त्यांनी सांभाळून ठेवले आहे. आम्ही राम गणेश गडकरींचे काहीच जपून ठेवलेले नाही. आम्ही आमच्या कलावंतांचीही जात पाहतो. धर्म पाहून त्यांचे महत्त्व ठरवितो. त्यात मग त्यांना अशा आमच्या सामान्य वागण्याचेही निकष लावत असतो. ‘पुलं’च्या पुण्यातल्या घरात वारंवार चोर शिरतात. आम्ही ‘पुल’ नाही जपले, आचार्य अत्रेही नाही जपले... हे सारेच ‘सरकार’नेच जपले पाहिजे असेही नाही. उलट, सरकारचे काम सरकारीच असते. जनतेचे काम रुजत असते. आम्ही आमचे कलावंत जपले पाहिजे. ती खरी सुसंस्कृतता...
ते कलावंतच आहेत, त्यांनी सामान्यांसारखे का वागावे? ते जे काय वागत असतात ते समाजविघातक असे नसते. त्यांच्या वागण्याचे संदर्भ समजून घेण्याची आमची कुवत नसते. आमची वैचारिक उन्नती तितकी झालेली नसते. ‘‘तो तमका ना, लिहितो खूपच वरचे, पण बेटा खूपच लफडेल आहे...’’ अशी संभावना करून आम्ही मोकळे होतो. आम्ही जी लांछनं लावत सुटलो असतो, त्याचे आमच्याकडे काहीच पुरावेही नसतात. सगळेच कसे ‘फॉरवर्डेड’ असते. असे करताना आम्ही चेकाळलो असतो. एखाद्या लेखकाची अशी संभावना करणारा, त्याच्या वैयक्तिक आयुष्यात ज्ञानाचा साधा स्पर्शही झाला नसताना, संधी मिळताच सारेच करत असतो. मागे, एक माजी मंत्री, ‘‘सारेच लेखक दारूडे असतात,’’ असे म्हणून गेले. त्यांनी आयुष्यात कधी घेतलीच नसेल का? अन्‌ राजकारण्यांसाठी मद्यपान हा काय दागिना ठरत असतो काय? कलावंत हे सुपर सामान्य असतात. त्यांचे सामान्यपण खूप पुढच्या काळातले असते. श्रीदेवी मद्यपान करतही असली, तरीही ती एकदम कशीकाय ताज्य ठरते? ऑस्कर सोहळ्यात तिला आवर्जून श्रद्धांजली वाहण्यात आली. कलावंत म्हणून जागतिक चित्रपटसृष्टीत तिने आपले स्थान निर्माण केले होते. ‘पहिली महानायिका’ होण्याची कुवत तिच्यात होतीच. महानायिकेच्या पदावर आरूढ असताना आपल्या कन्यांसाठी तिने चित्रपटसृष्टीचा त्याग केला. नाव, पैसा, प्रसिद्धीचा असा त्याग करणे इतके सोपे नसते. मुलींच्या संगोपनासाठी 15 वर्षे ती चित्रपटांपासून दूर राहिली. एक कलावंत म्हणून आम्ही तिला समजून घेण्याची कुवत ठेवू शकत नसू, पण किमान एक स्त्री म्हणून... किमान आई म्हणून तरी तिला समजून, तिचा आदर आम्ही करत नसू, तर सुसंस्कृत ठरतो काय..?