‘व्हायरल’ इन्फेक्शनचे परिणाम..!!

    18-Sep-2017   
Total Views | 23


 

‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू’ या संत तुकाराम महाराजांनी सतराव्या शतकात लिहिलेल्या ओळी. या ओळींतून तुकोबांनी शब्दांचं महत्व आणि सामर्थ्य अगदी मोजक्या परंतु नेमक्या शब्दांत मांडलं आहे. मात्र गेल्या काही दिवसांत काही महान विभूतीमत्वांनी या ओळींचा भलताच अन्वयार्थ घेतलेला दिसतो. कारण शब्दांच्या शस्त्रांचा वापर करून काही मंडळी मुळातच थोड्याथोडक्या उरलेल्या शहाण्या लोकांच्या कान आणि अंतिमतः मेंदूवर अनन्वित अत्याचार करत आहेत. ही महान विभूतीमत्व म्हणजे संगीताच्या क्षेत्रात ‘रॅप’ नावाचा नवा मुक्तीमार्ग घेऊन आलेले ‘हनीसिंग’, ‘ढिंच्याक पूजा’ आदी स्वरालंकार होत. आणि आता या नामावलीत आणखी एका नव्या ताऱ्याची भर पडली आहे, ती म्हणजे ओमप्रकाश मिश्रा ! या सर्व मंडळीनी ज्याप्रकारे शब्दांचा वापर करून त्याला ‘रॅप’ची जोड देऊन देशातील साध्याभोळ्या जनतेवर असे काही अत्याचारसत्र आरंभले आहे की, थेट स्वर्गलोकातून तुकोबांनाही व्यथित होऊन आजकालच्या काही वृत्तपत्रीय अग्रलेखांप्रमाणे आपल्या या ओळी ‘मागे’ घ्यायची इच्छा व्हावी.

 

‘रॅप किंग’ अशी उपाधी मिरवणाऱ्या व नुकत्याच मिसरूड फुटू लागलेल्या ओमप्रकाश मिश्रा या दिल्लीस्थित युवकाने ‘बोल ना आंटी आउं क्या..’ असे काहीसे शब्दरचना असणारे रॅप प्रकारातील गाणे (?) युट्युबवर काही दिवसांपूर्वी अपलोड केले. हा हा म्हणता तो व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. या गाण्याच्या ओळींपैकी पुढील ओळी जाहीरपणे सांगता येण्यासारख्या नाहीत. या गाण्याने काही दिवस सोशल मीडियावर भलताच धुमाकूळ घातला. मात्र, त्याचसोबत काही महिला, विशेषतः युवतींनी जाहीरपणे या गाण्याचे वाभाडे काढत ‘तू तुझ्या आई किंवा बहिणीवर असे गाणे बनवू शकशील का?’ असा थेट प्रश्न उपस्थित केला. काही माध्यमांनीही ओमप्रकाशच्या या गाण्यातील आक्षेपार्ह शब्दांविरोधात टीकेची झोड उठवली असता ओमप्रकाश व त्याच्या सहकाऱ्यांनी काही महिला पत्रकारांना बलात्कार करण्याची व जिवंत जाळण्याची धमकी दिल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे काही युवकांनी हे गाणे दिल्लीच्या भररस्त्यावरून गात रॅली काढल्याचेही समजते. अर्थात, दिल्ली व परिसरातील पुरुषप्रधान, वर्चस्ववादी आणि ‘राडा कल्चर’ प्रवृत्तीला साजेसंच. त्यामुळे आधीच संगीतामुळे शांत झोप लागण्याऐवजी झोप उडण्याचीच वेळ अलीकडे जास्त येत असताना त्यातच वास्तवातील आणि व्हर्चुअल विश्वातील अशा दोन्ही राडा संस्कृती अशाप्रकारे हळूहळू एक होऊ लागल्याने या ‘व्हायरल इन्फेक्शन’चे पुढचे परिणामही आता ठळकपणे समोर येऊ लागले आहेत.

 

चॉइस तुम्हारा है भाई..!

 

तसंही आजकाल आपल्याला या व्हायरल इन्फेक्शनची सवय होऊ लागलेली आहे. किंबहुना ते आपल्याला आवडू लागलंय असं मानायलाही वाव आहे. कारण आपण या असल्या टुकार मंडळींना ऐकतो, त्यांचे व्हिडिओ डाऊनलोड करून पाहतो, त्यांना रातोरात स्टार वगैरे बनवतो. त्यांना लाखोंचे ‘व्ह्यूज’ मिळतात, माध्यमे त्यांच्यावर बातम्या करू लागतात. हे सगळं आपल्याला या इन्फेक्शनची सवय होऊ लागल्याचंच लक्षण. हा सगळा नंगानाच पाहून काव्य, कवीची प्रतिभा, त्याला संगीतकाराच्या प्रतिभेची आणि गायकाच्या स्वरांची जोड देऊन एखादी कलाकृती निर्माण करणं, आणि त्या कामी कितीतरी लोकांनी आयुष्यंच्या आयुष्यं खर्ची घालणं वगैरे मूर्खपणाच वाटू लागावा. ‘चार बोतल वोडका, काम मेरा रोज का’ या ओळी ऐकून एखाद्या खऱ्या कवीच्या आयुष्यातील रसच निघून जावा. म्हणजे, एखाद्याचं खरंच तसं काही असल्यास कुणाची हरकत नाही, पण ती काय गाणं रचून जाहीरपणे बोंबलायची बाब आहे काय? ‘सेल्फी मैने लेली आज’ या ओळी ऐकून तर चुकून एखादा सेल्फी वगैरे काढण्याची इच्छाच आयुष्यातून निघून जावी. उद्या कदाचित चहा प्यायला, इडली-सांबर खाल्ला यावरही गाणी निघतील. मराठीतही ही कसर ‘शांताबाई’ इ. मुळे भरून निघालेली आहेच.

 

हे ढिंच्याक, ओमप्रकाश वगैरे आज येतील उद्या विस्मृतीत जातील. परवा आणखी नवे कोणी ‘रॅप किंग’ उभे राहतील. पण, दुसरीकडे वर्षानुवर्षांच्या कष्टातून, अनेकांच्या प्रतिभेतून निर्माण झालेला, जीवनाचे विभिन्न आयाम उलगडून दाखवणारा, त्यावर भाष्य करणारा सच्च्या कलेचा समृद्ध वारसा मात्र तसाच शाश्वत आणि चिरंतन राहील. त्यामुळे रॅपची झिंग चढवून घेण्याच्या नावाखाली भलत्यांनाच डोक्यावर चढवून स्वतःचं डोकं जड करून घ्यायचं की सच्च्या, समृद्ध कलेचा आनंद घेत स्वतःही समृद्ध व्हायचं हे शेवटी आपल्यालाच ठरवावं लागणार आहे.. 

 

 -निमेश वहाळकर 

निमेश वहाळकर

सध्या मुंबई तरूण भारत मंत्रालय प्रतिनिधी म्हणून कार्यरत. मूळचे कोकणातील चिपळूण येथील रहिवासी. सर परशुरामभाऊ कॉलेज पुणे येथून पदवी (राज्यशास्त्र) तर रानडे इन्स्टिट्यूट (सा.फु. पुणे विद्या.) येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 

अग्रलेख
जरुर वाचा
राज्यात बंदरक्षेत्रात १२० कोटींची विदेशी गुंतवणूक

राज्यात बंदरक्षेत्रात १२० कोटींची विदेशी गुंतवणूक

राज्यातील पहिल्या सहा जिल्ह्यांमध्ये आयटीआय संस्थाचे आधुनिकीकरण दरवर्षी ५०००-७००० तरुणांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग,बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन,एम.डी रुरल ग्रुप यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. नेदरलँड्स, डेन्मार्क आणि पोलंडमधील विदेशी पतसंस्था सामंजस्य करारातंर्गत १२० कोटी रूपयांची गुंतवणुक करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, बारामती, सिंधुदुर्ग, नागपूर आणि नाशिक मधील सहा निवडक आयटीआय..

स्वतःला शंकराचार्य म्हणवणाऱ्या अविमुक्तेश्वरानंदांपासून सावधान! स्वामी गोविंदानंद सरस्वती यांचे गंभीर आरोप

स्वतःला शंकराचार्य म्हणवणाऱ्या अविमुक्तेश्वरानंदांपासून सावधान! स्वामी गोविंदानंद सरस्वती यांचे गंभीर आरोप

"स्वतःला शंकराचार्य म्हणवणाऱ्या अविमुक्तेश्वरानंद सारख्या खोट्या साधूबाबा पासून सावध राहा. महाराष्ट्राची संस्कृती, राज्यातील विविध संप्रदाय आणि धर्माचा नाश करण्याच्या उद्देशाने हा संन्यासी बनून फिरतो आहे", असा गंभीर आरोप स्वामी श्री गोविंदानंद सरस्वती यांनी मंगळवारी केला. स्वामी श्री गोविंदानंद सरस्वती हे पूज्यपाद बद्री ज्योतिर्मठ, द्वारका शारदा पीठ जगद्गुरू शंकराचार्य ब्रह्मलीन स्वामी स्वरूपानंद सरस्वती जी महाराज यांचे दण्डी संन्यास दीक्षित शिष्य आहेत. प्रेस क्लब, मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121