मुंबई : 'जर केंद्रात कांग्रेसची सत्ता आली तर संघावर पुन्हा बंदी घातली जाईल', असे वादग्रस्त विधान करत देशात पुन्हा आणीबाणी लादण्याची भाषा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांचे चिरंजीव आणि कर्नाटक काँग्रेसचे मंत्री प्रियांक खरगे यांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाच्या विरोधात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
संघाची विचारसरणी समानता आणि आर्थिक समतेच्या विरोधात असल्याचे वर्णन करत ते म्हणाले की, "काँग्रेस सुरुवातीपासूनच संघाच्या तत्वांना विरोध करते आणि भविष्यातही करत राहील. काँग्रेसने यापूर्वी दोनदा संघावर बंदी घातली होती आणि त्यांना बंदी उठवल्याबद्दल पश्चात्ताप झाला. त्यामुळे भविष्यात काँग्रेसची पुन्हा सत्ता आली तर संघावर पुन्हा बंदी घातली जाईल."
खरंतर १९७५ मधील आणीबाणी भारताच्या आत्म्यावर झालेला आघात होता. मात्र त्या अंधकारमय काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे ठरली, ज्याने लोकशाहीच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व पणाला लावले. हजारो स्वयंसेवकांनी उस्फूर्तपणे अटक करवून घेतली. काहींनी भूमिगत राहून सत्याचे बीज पेरले. हा संघर्ष सत्तेसाठी नव्हता, तर संविधान, स्वातंत्र्य आणि राष्ट्रधर्म यांच्यासाठी होता. हा इतिहास आपल्या लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या शूर निष्ठावंतांचा आहे, त्यामुळे तो कधीही विसरला जाऊ शकत नाही.