शहापूर : शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेच्या ढासळलेल्या स्थितीमुळे नुकत्याच चौदा वर्षाच्या बालकाच्या सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी आज दुपारी उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देत तेथील आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.
या मुलाचा मृत्यू वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे झाल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
कपिल पाटील यांनी रुग्णालयातील स्थितीची पाहणी करत आरोग्य विभागाचे मुंबई व ठाणे विभागीय संचालक डॉ. दिलीप नांदापुरकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग (ICU) तातडीने सुरू करण्याची मागणी केली.
आरोग्य विभागाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत येत्या सोमवारपर्यंत ICU सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक कामे पूर्ण केली जातील, असे आश्वासन दिले.
या भेटीदरम्यान माजी आमदार पांडुरंग बरोरा, तालुका प्रमुख भास्कर जाधव, उपशहराध्यक्ष मनोज पानसरे, नगरसेवक योगेश महाजन, राजदीप जामदार यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते.