ठाणे : (World Menstrual Hygiene Day) मासिक पाळीसारख्या संवेदनशील परंतु, अद्यापही समाजात दुर्लक्षित व संकोचाने हाताळल्या जाणार्या विषयावर मनमोकळेपणाने आणि आत्मविश्वासाने संवाद घडवून आणण्यासाठी ’सेवा सहयोग फाऊंडेशन’ आणि 'महानगर गॅस लिमिटेड'च्या संयुक्त विद्यमाने किशोरी विकास प्रकल्प आयोजित बुधवार, दि. २८ मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त ‘ती’च्यावर बोलू काही...’ या विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे उत्साहात पार पडला.
या सोहळ्याला विधान परिषद सदस्या चित्रा वाघ, महानगर गॅस लिमिटेडच्या प्रमुख व्यवस्थापिका आसावरी पलशेटकर तसेच सीएसआर - सहाय्यक व्यवस्थापिका प्रियांका दळवी, अभिनेत्री गिरिजा ओक व दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. ’सेवा सहयोग फाऊंडेशन’चे संचालक किशोर मोघे, डॉ. भावना मिस्त्री, वर्षा परब व किशोरी प्रकल्प प्रमुख आरती नेमाने हेही उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यानंतर स्त्रियांच्या जडणघडणीतील स्थित्यंतरांमुळे निर्माण होणार्या भावविश्वाचे पदर उलगडणारे सुंदर नृत्याविष्कार सादर करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांनी आपल्या भाषणातून मासिक पाळी विषयावर आपले वैयक्तिक अनुभव, समज-गैरसमज, तसेच समाजातील वास्तव प्रभावीपणे मांडले. विजेत्यांच्या भाषणानंतर उपस्थित प्रमुख मान्यवरांनी मासिक पाळीविषयी बोलताना किशोरींच्या मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक विकासाबाबत मार्गदर्शनपर विचार मांडले.
‘ती’ म्हणजे केवळ सर्वनाम नाही : चित्रा वाघ
‘ती’ म्हणजे केवळ सर्वनाम नाही, ती म्हणजे एक अनुभव, एक वेदना आणि सगळ्यात महत्त्वाचे ती म्हणजे एक व्यक्ती आहे आणि तिच्या आयुष्यात येणारी जी स्थित्यंतरे आहेत, त्यावर खुलेपणाने बोलणे गरजेचे आहे. ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’ने या विषयावर केवळ मुलींनाच नव्हे, तर मुलांनाही बोलते केले, त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक. तसेच ‘महानगर गॅस लि.’नेही या उपक्रमातून हा संवेदनशील विषय हाती घेतल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन आणि कौतुक. महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून जर शक्य असल्यास या स्पर्धकांना राज्यातील विविध शाळांत मासिक पाळीविषयी जनजागृती करण्यासाठी पाठवता आले, तर खर्या अर्थाने सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होईल. बर्याच गावाखेड्यांमध्ये मेडिकल स्टोअर्स नसतात. त्यामुळे ग्रा.पं.च्या कार्यालयात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध होतील, अशी तजविज करण्यासंदर्भातील प्रस्ताव ग्रामपंचायतींना पाठवून असा उपक्रम निश्चितपणे सुरू करता येईल, असे विधान परिषद सदस्या चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.
राज्यातील गावाखेड्यांमधील महिलांना गावातच मोफत सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपातळीवर ‘महिला व बालकल्याण समिती’अंतर्गत पंचायतींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
स्पर्धेचा निकाल जाहीर करताना तिन्ही वयोगटांतील पुढील विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले:
गट क्रमांक १
प्रथम - वैदेही लक्ष्मण पाटील ( महाड विभाग )
द्वितीय - सोनाली पासी ( नवी मुंबई )
तृतीय - सुजल शेळके ( ठाणे )
उत्तेजनार्थ - रुचिता शेषनाथ झा ( पालघर विभाग )
गट क्र २
प्रथम - समृद्धी मोराणकर ( नाशिक)
द्वितीय - स्नेहा शिंदे ( पनवेल)
तृतीय - श्रावण कदम ( कर्जत )
उत्तेजनार्थ - वर्षाली ठाकूर ( कल्याण )
गट क्र ३
प्रथम - तन्वी महेंद्र मेस्त्री ( ठाणे )
द्वितीय - प्रेमनाथ शाम पाटील ( कल्याण )
तृतीय - यश रवींद्र पाटील ( कल्याण )
उत्तेजनार्थ - प्राची प्रदीप राव ( रत्नागिरी )
किशोरी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून सेवा सहयोग फाऊंडेशन व महानगर गॅस लि. यांनी पाळीबाबत खुलेपणाने बोलणे, त्याच्या स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहणे आणि सामाजिक परिवर्तनाच्यादृष्टीने उचलेले एक सकारात्मक पाऊल आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\