पाऊस, बियाणे, ते कीड व्यवस्थापन...; खरीप हंगाम आढावा बैठकीत कोणते महत्वपूर्ण निर्णय? काय म्हणाले मुख्यमंत्री?
21-May-2025
Total Views | 9
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवार, १२ मे रोजी खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. या बैठकीत पाऊस, बियाणे, ते कीड व्यवस्थापनासंदर्भात विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "खरीप हंगामाच्या निमित्ताने हवामान खात्याने त्यांचे प्रेझेंटेशन दिले. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस असेल असा त्यांचा अंदाज आहे. सरासरीपेक्षा ७ टक्क्यांपासून १७ टक्क्यांपर्यंत महाराष्ट्रातील विविध विभागांमध्ये त्यांनी पाऊस सांगितला आहे. पावसाच्या दोन दिवसांमधील खंड फार असणार नाही, असादेखील अंदाज त्यांनी वर्तवला आहे. त्यामुळे एकूणच यावर्षी योग्य पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे."
बियाणे आणि खतांचा तुटवडा पडणार नाही!
"यासोबतच कृषी विभागानेदेखील त्यांचे प्रेझेंटेशन केले आहे. राज्यात आवश्यक तेवढा बियाण्यांचा पुरवठा आणि आवश्यक तेवढे खत आहे. याचा कुठलाही तुटवडा पडणार नाही. मागील वर्षांचा कल पाहता कोणते पीक कुठे कमी अधिक प्रमाणात घेण्यात येईल याचा विचार करूनच बियाण्यांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. वारंवार बोगस बियाणांचे प्रकार बाहेर येत असल्याने महाराष्ट्राने पहिल्यांदा एक प्रयोग केला आहे. केंद्र सरकारचे साथी हे एक पोर्टल असून या पोर्टलवर बियाण्यांचे रजिस्ट्रेशन करावे लागते. या बियाण्यांचे उत्पादन कुठे झाले हे आपल्याला त्यावर ट्रेस करता येते. यावर्षीपासून साथी पोर्टलवर ट्रुथफूल बियाणे आणावे लागेल, अशी विनंती केंद्र सरकारला केली असून याला केंद्राने मान्यता दिली आहे. यावर्षी जवळपास ७० हजार क्विंटल ट्रुथफूल बियाणे पोर्टलवर उपलब्ध आहे. ते ट्रेसेबल असल्याने त्यात कुणी बोगसगिरी केल्यास ती कोणामुळे झाली हे लक्षात येईल. पुढच्या वर्षी साथी पोर्टलवर १०० टक्के ट्रुथफुलचे बियाणे असेल," असेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक तालुक्यात डिजिटल शेतीशाळा!
ते पुढे म्हणाले की, "पीकांवरील कीड व्यवस्थापन योग्य प्रकारे होण्याच्या दृष्टीने काळजी घेण्यात येत आहे. यावर्षी डिजिटल शेतीशाळा आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात ही डिजिटल शेतीशाळा आयोजित करण्यात येणार असून या शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कीड व्यवस्थापनासह काही नवीन पद्धतींचे मार्गदर्शन देण्यात येणार आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.