मुंबई: ( Who installed 103 out of 306 hoardings on railway land ) मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या जमिनींवर एकूण ३०६ होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या जमिनीवर १७९ तर पश्चिम रेल्वेच्या जमिनीवर १२७ होर्डिंग्ज आहेत. विशेष म्हणजे, यापैकी मध्य रेल्वेच्या १७९ होर्डिंग्जपैकी ६८ आणि पश्चिम रेल्वेच्या १२७ होर्डिंग्जपैकी ३५ होर्डिंग्ज कोणी बसवले आहेत याची माहिती उपलब्ध नाही. ही धक्कादायक माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात (RTI) घेतलेल्या चौकशीतून समोर आली आहे.
अनिल गलगली यांनी मुंबई महापालिकेच्या अनुज्ञापन अधीक्षक कार्यालयाकडे शहरातील होर्डिंग्ज संदर्भातील विविध माहिती विचारली होती. त्यानुसार, अनुज्ञापन अधीक्षक कार्यालयाने मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या जमिनीवरील होर्डिंग्जची आकडेवारी उपलब्ध करून दिली.
पश्चिम रेल्वेच्या जमिनीवरील १२७ होर्डिंग्ज आहेत. यात ए वॉर्डात ३, डी वार्डात १, जी दक्षिण २, जी उत्तर १२, के पूर्व २, के पश्चिम १, पी दक्षिण १० तर आर दक्षिण ४ असे ३५ होर्डिंग्ज पश्चिम रेल्वेच्या जमिनीवर आहे ज्याचा कोणी मालक नाही तर मध्य रेल्वेच्या जमिनीवरील १७९ होर्डिंग्ज आहेत यात ई वॉर्डात 5, एफ दक्षिण वॉर्डात १०, जी उत्तर वॉर्डात २, एल वॉर्डात ९ आणि टी वॉर्डात ४२ असे ६८ होर्डिंग्ज मध्य रेल्वेच्या जमिनीवर आहे ज्याचा कोणीही मालक नाही.
अनिल गलगली यांच्या मते, घाटकोपर दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने पारदर्शकता राखणे अत्यावश्यक आहे. तसेच, पालिकेच्या नियमांचे पूर्णपणे पालन करणे आवश्यक आहे. जर ही होर्डिंग्ज अधिकृत नसतील, तर रेल्वे प्रशासनाने तत्काळ ती काढून टाकावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी. मुंबईत सक्रिय होर्डिंग्ज माफिया सक्रिय असून पालिकेच्या नवीन जाहिरात धोरणात सकारात्मक करण्यासाठी सनदी अधिकारी यांसकडून अनुज्ञापन खाते काढुन घेण्यात आले होते. कारण परवानगी न घेता अंडरस्टँडिंगने आर्थिक गैरव्यवहार केला जात आहे.