सत्तास्वार्थे संघटन गळे...

    21-Feb-2025
Total Views | 91

Uddhav Thackeray UBT
 
सत्तेसाठी नेत्यांना संघटनेचे पाठबळ आवश्यक असते. ज्या पक्षात कार्यकर्त्यांना महत्त्व दिले जाते आणि त्यांचा मान राखला जातो, त्या पक्षाचाच पाया जनतेत कायम राहतो. सर्वोच्च नेत्याचा जनमानसात पाया असेल, तर असा पक्ष व्यक्तिकेंद्रित असला, तरी चालतो. पण, या नेत्याला लोकांचा पाठिंबा नसेल, तर त्याचे अस्तित्त्व त्या नेत्याबरोबरच संपते. उबाठा सेनेची सध्याची गत ही जनतेत पाया असलेल्या नेत्यांचे खच्चीकरण करण्याच्या धोरणामुळेच झाली आहे.
 
उबाठा सेनेची पिचकी तुतारी असलेल्या खासदार संजय राऊत यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद डावलण्याचा दोष शरद पवार यांच्यावर ढकलून आपले नेते उद्धव ठाकरे यांना वाचविण्याचा निष्फळ आणि केविलवाणा प्रयत्न केला असला, तरी त्यांच्या या वक्तव्यावर कोणताही शिवसैनिक विश्वास ठेवणार नाही. कारण, शिंदे यांचे महत्त्व डावलण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी ते शिवसेनेत असल्यापासूनच केला होता. किंबहुना, शिवसेनेच्या फुटीमागे पक्षातील जनसामान्यांमध्ये पाया असलेल्या लोकनेत्यांची लोकप्रियता कमी करण्याचे धोरणही एक महत्त्वाचा मुद्दा होता.
 
पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्वत: मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबर असलेली निवडणुकपूर्व युती तोडली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना हे पद देऊ केले होते. पण, महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी शिंदेंचे नेतृत्त्व मानण्यास नकार दिल्यानेच उद्धव ठाकरे यांना हे पद स्वीकारावे लागले, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्याद्वारे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा मोह नव्हता, असे दाखविण्याचा प्रयत्न केला असला, तरी तो किती बेगडी आणि खोटा आहे, हे एव्हाना सार्‍या जनतेला कळून चुकले आहे. शिवाय या पदाच्या बदल्यात शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला बांधण्यात आले होते. ही गोष्ट कोणत्याही शिवसैनिकाला न पटणारी होती. आपण शिवसेनेला काँग्रेसपासून दूर करण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळेच हा पक्ष फुटला, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. त्यावर सारवासारव करताना राऊत यांनी सारा दोष पवार यांच्यावर ढकलण्याचा आणि उद्धव ठाकरे यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असला, तरी तो पूर्णपणे निराधार आहे, हे सर्वजण जाणतात.
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इतकाच मान आणि आदर आपल्याला शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी दिला पाहिजे, अशी उद्धव ठाकरे यांची पहिल्यापासून अपेक्षा होती. पण, बाळासाहेबांनी आपल्या कर्तृत्त्वामुळे हा मान आणि आदर कमावला होता. उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या वडिलांसारखे ओजस्वी वक्तृत्त्व, करारी नेतृत्त्व आणि अस्सल हिंदुत्त्वावरील निष्ठा नव्हती. आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचे साधन म्हणून ते शिवसेनेकडे पाहात होते. बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून वारसाहक्काने त्यांना पक्षावरील पकडीप्रमाणेच मान-सन्मानही हवा होता. पण, मान-सन्मान हा वारसाहक्काने मिळत नसतो, तर तो स्वत: कमवावा लागतो, हे त्यांना ठाऊक नव्हते आणि नाही. त्यामुळे त्यांचा वैयक्तिक अहंकार पराकोटीला गेला. ज्या शिवसेना नेत्यांचा जनतेत आणि कार्यकर्त्यांमध्ये पाया होता, अशा सर्वांचे पंख छाटण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. त्यामुळेच राज ठाकरेंपासून एकनाथ शिंदेंपर्यंतचे शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते त्यांना सोडून गेले. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळेच त्यांनी भाजपशी असलेली युती तोडली आणि नंतर पक्षात एकाधिकारशाही आणण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली गेली. ही गोष्ट कोणत्याच शिवसैनिकाला आणि शिवसेनेच्या नेत्यांना मान्य नव्हती.
 
जिवाला जीव देणारे कार्यकर्ते हे शिवसेनेचे बलस्थान. बाळासाहेब ठाकरे हे चांगले ओळखून असल्याने त्यांनी नेहमीच कार्यकर्त्यांचा मान राखला आणि त्यातूनच आनंद दिघे, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, नारायण राणे यांसारखे कट्टर नेते उभे राहिले. पण, पक्षबांधणीसाठी कसलेही कष्ट न घेतलेल्या आणि जनतेत पाया नसलेल्या उद्धव ठाकरे यांना या नेत्यांचा जनसामान्यांमधील पाठिंबा आणि लोकप्रियतेची भीती वाटत होती. त्यामुळेच वैयक्तिक अहंकारापोटी उद्धव ठाकरे यांनी या सर्वांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे यांना दिलेल्या सुरक्षेत कपात करण्यात आली. त्यांच्या हाती असलेल्या खात्यात आदित्य ठाकरे आणि ठाकरे परिवाराचा हस्तक्षेप वाढत गेला. काँग्रेसच्या तालावर नाचण्यास शिंदे आणि बहुसंख्य नेते तयार नव्हते. हीच बहुसंख्य शिवसैनिकांची भावना असल्यामुळेच आज बहुसंख्य शिवसेना नेते आणि कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी आहेत. त्यामुळे राऊत यांचा दावा पोकळ आणि बिनबुडाचा ठरतो.
भारतात यशस्वी झालेले सर्व पक्ष हे कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावरच यशस्वी झाले आहेत. भाजप असो, तृणमूल काँग्रेस पक्ष असो की कम्युनिस्ट पक्ष, हे सर्व पक्ष संघटनात्मकदृष्ट्या भक्कम पायावर उभे आहेत. भाजपशी वैचारिक मतभेद असले, तरी एक केडर आधारित पक्ष हीच त्याची ओळख आहे. भाजपचे नेतेही संघटनेचे महत्त्व जाणतात. त्यामुळे शक्य झाल्यावर त्या पक्षाने आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना सरकारी पदांवर बसविले आहे. ताजे उदाहरण दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचे आहे. ‘अभाविप’च्या आणि नंतर भाजपच्या कार्यकर्त्या म्हणून त्या गेली तीन दशके कार्यरत होत्या.
 
आता संधी मिळाल्यावर भाजप नेतृत्त्वाने त्यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर बसविले. कार्यकर्त्यांना उच्च पदावर बसविल्याची भाजपची यादी बरीच मोठी आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सारे नेते मूळचे पक्षाचे कार्यकर्तेच आहेत. संघटनेच्या मदतीशिवाय लोकांपर्यंत आपले विचार आणि धोरणे पोहोचविता येत नाहीत. त्यासाठी निष्ठावान कार्यकर्ते लागतात. शिवसेनेकडेही असे हजारो कार्यकर्ते होते आणि आहेत. पण, त्यांना योग्य तो मान आणि महत्त्व न देता आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांचा वापर केल्यानेच उद्धव ठाकरे यांच्यावर आजची वेळ आली आहे. पक्ष-संघटना म्हटले की नेते आणि कार्यकर्ते यांना सारखीच मेहनत घ्यावी लागते. एखादा पक्ष उभा करण्यासाठी सारे जीवनही वेचावे लागते. त्यासाठी कष्ट न करण्याची तयारी असलेल्या नेत्यांचे पक्ष अल्पकाळातच लयाला जातात, याची असंख्य उदाहरणे आहेत. उद्धव ठाकरे यांची पक्षासाठी कष्ट घेण्याची तयारी नव्हती. तसेच, पक्षासाठी काम करणार्‍यांचेच पाय खेचण्याच्या त्यांच्या वृत्तीने हा पक्ष कोसळला. जे पायाच्या दगडांनाच उखडण्याचा प्रयत्न करतात, त्यांची इमारत कोसळल्यास नवल ते काय!
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121