वाघ-बिबट्यांना पक्ष्यांमधील ‘बर्ड फ्लू’ची लागण कशी होते?; मुलाखत - डाॅ. शिवानी तांडेल

    13-Jan-2025
Total Views | 121
gorewada bird flu



नागपूरच्या गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात तीन वाघ आणि एका बिबट्याला ‘बर्ड फ्लू’ची लागण होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला (gorewada animal died). या घटनेचे देशात गंभीर परिणाम उमटले (gorewada animal died). पिंजराबंद अधिवासातील वन्यजीवांनाही या विषाणूची लागण होऊ शकते आणि त्यात त्यांचा मृत्यू होऊ शकतो, ही बाब महाराष्ट्रात प्रथमच घडली. पक्ष्यांमधील हा विषाणू प्राण्यांमध्ये कसा संक्रमित होतो, यामागची कारणे काय आणि त्यावरील उपाय काय अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी पक्षीतज्ज्ञ पशुवैद्यक डॉ. शिवानी तांडेल यांची मुलाखत.... (gorewada animal died)

‘बर्ड फ्लू’ हा नेमका काय प्रकार आहे?
‘बर्ड फ्लू’ म्हणजेच ‘एव्हियन फ्लू’ किंवा ‘एव्हियन इनफ्लूएन्झा’ हा आजार संसर्गजन्य आजार आहे. साधारणपणे हा विषाणू म्हणजेच व्हायरस बदके, कोंबड्या आणि स्थलांतरित पक्ष्यांमध्ये आढळतो. हा संसर्गजन्य आजार असल्याने तो स्पर्शातून किंवा हवेतूनदेखील पसरू शकतो. काही वेळा बाधित पक्ष्यांच्या विष्ठेशी संपर्क आल्यावरदेखील या आजाराची लागण होऊ शकते.

‘बर्ड फ्लू’चे नेमके किती प्रकार आहेत?
विषाणूंचे अनेक प्रकार असतात. काही विषाणू ‘डीएनए’वर आधारित असतात, तर काही विषाणू ‘आरएनए’आधारित. प्रथिनांच्या बांधणीचा सर्व आराखडा ‘डीएनए’वर रेखलेला असतो. ‘डीएनए’ पेशी केंद्रकात असते व प्रथिनांची बांधणी पेशीद्रवात होते. केंद्रकातून प्रथिनांच्या बांधणीसंबंधीची सर्व माहिती पेशीद्रवात आणण्याचे कार्य करणारा रेणू असतो, तो म्हणजे ‘आरएनए’, ‘रायबोन्युक्लिक अ‍ॅसिड’. याची रचना काहीशी ‘डीएनए’सारखीच असते. यात जो साखरेचा रेणू असतो, तो असतो रायबोज. म्हणजे डिऑक्सिरायबोजला आणखी एक ऑक्सिजनचा अणू जोडलेला असतो. ‘डीएनए’ची रचना दुपदरी असते, तर ‘आरएनए’ एकपदरी असतो व त्याचा तो एक पदर रायबोज साखर व ‘फॉस्फेट ग्रुप’ यांच्या एकाआड एक रेणूंनी बनलेला असतो. ‘आरएनए’च्या एकपदरी रचनेमध्ये दोन प्रकारची प्रथिने असतात. त्यांची संख्या अनुक्रमे 16 आणि नऊ असते. यांमध्ये पर्म्युटेशन कॉम्बिनेशन होऊन विषाणूंचे साधारण 144 उपप्रकार निर्माण होऊ शकतात. ‘एव्हियन इनफ्लूएन्झा’ हा ‘आरएनए’ विषाणू आहे. त्यामुळे या विषाणूंचेदेखील अनेक उपप्रकार असतात.

‘बर्ड फ्लू’ची मानवी लागण कशी होते?
वर सांगितल्याप्रमाणे हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे त्याची लागण हवेतून किंवा स्पर्शातून होऊ शकते. पाळलेल्या पक्ष्याला जर या विषाणूची लागण झालेली असल्यास किंवा कुक्कुटपालन व्यवसायाशी तुम्ही संबंधित असल्यास या माध्यमातून या विषाणूची लागण होऊ शकते. काही वेळा या विषाणूची लागण होण्यासाठी इंटरमीडिएट होस्टदेखील कारणीभूत ठरतो. म्हणजे मूळ स्रोतापासून इंटरमीडिएट होस्टला विषाणूची लागण होते आणि त्या होस्टमुळे व्यक्तीला लागण होऊ शकते. लागण झाल्यावर डोळे लाल होणे, सर्दी-खोकल्याचा उमाळा येणे, ताप येणे, डोके दुखणे, श्वास घेण्यास अडचण येणे अशा पद्धतीची लक्षणे दिसू शकतात. पक्ष्यांमध्ये या विषाणूमुळे त्यांच्या सायनसवर सूज चढते. मानवी सायनसवर सूज आल्यावर आपले डोके दुखत, तेव्हा आपण डोके दाबतो. मात्र, पक्ष्यांच्या सायनसला सूज चढल्यावर ते डोके दाबू शकत नसल्यामुळे ते डोळे मिटून राहतात. यामध्ये रोगजनकाची स्थिती कमी स्तरावरील असल्यास सामान्य लक्षणे दिसतात. मात्र, रोगजनकाची स्थिती उच्च स्तरावरील असल्यास ती रोगप्रतिकार शक्तीवर आघात करून परिस्थिती मृत्यूपर्यंतदेखील जाते किंवा लागण मोठ्या प्रमाणावर होण्यास सुरुवात होते.
 
 
या विषाणूवर काही लस उपलब्ध आहेत का?
या विषाणूवरील मानवी लस उपलब्ध नाही. पक्ष्यांवरील काही लसी उपलब्ध आहेत. मात्र, या विषाणूच्या सगळ्याच उपप्रकारांवर त्या परिणामकारक नाहीत. या विषाणूच्या कोणत्या उपप्रकाराची लागण ही वन्यजीवांना होते, याविषयीची माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्यासाठीदेखील लस उपलब्ध नाही.
 
जंगलातील किंवा पिंजराबंद अधिवासातील वन्यजीवांना या रोगाची लागण कोणत्या माध्यमातून होते?
पिंजराबंद अधिवासातील वन्यजीवांना या विषाणूची लागण देण्यात येणार्‍या खाद्यातून आणि मानवी वावरामुळे होऊ शकते, तर नैसर्गिक अधिवासातील प्राण्यांना ही लागण पक्ष्यांच्या माध्यमातून किंवा हवेद्वारे होऊ शकते. प्राण्यांच्या शरीरातील रिसेप्टर हे विषाणूच्या संक्रमणास कारक असतात. कारण, रिसेप्टरने विषाणूच्या प्रथिनांना सामावून घेतल्याने संक्रमण होते. गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात ‘बर्ड फ्लू’मुळे वाघ आणि बिबट या मार्जार कुळातील प्राण्यांचा मृत्यू झाला. असे का झाले, तर मांर्जार आणि वराह कुळातील प्राण्यांचे रिसेप्टर हे ‘बर्ड फ्लू’च्या विषाणूच्या प्रथिनांना अधिक समक्षतेने सामावून घेतात. त्यामुळे या दोन कुळातील प्राण्यांना या विषाणूचे संक्रमण अधिक वेगाने होते. रोगप्रतिकारक शक्तीवरदेखील रिसेप्टरची विषाणूंमधील प्रथिने सामावून घेण्याची सक्षमता अवलंबून असते.
 
कोणत्या प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे?
आपले पाळीव पक्षी किंवा प्राण्यांमधील लक्षणे ओळखणे आवश्यक आहेत. मृत पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे, रोग आलेल्या भागातील कुक्कुट पक्षी, अंडी, खाद्य व पक्षी खत यांची इतरत्र वाहतूक न करणे. माणसानेदेखील नियमित सॅनिटायझरचा वापर करणे, साबणाने हात धुणे, परिसर स्वच्छता, आजारी पक्ष्यांचा संपर्क टाळणे, तलावाजवळ स्थलांतरित पक्षी येत असतील व ते जर मृत्युमुखी पडलेले आढळले तर ते तत्काळ पशुसंवर्धन विभागाला कळवायला हवे. या सोबत स्वतःचेही आरोग्य आणि प्रतिकारशक्ती अबाधित ठेवली, तर ‘बर्ड फ्लू’बाबत चिंता करण्याचे कारण नाही.

मुलाखत - अक्षय मांडवकर
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121