सध्या सुरु असलेली ऑलिम्पिक 2024 ही स्पर्धा शेवटाकडे आली. ऑलिम्पिक ही स्पर्धा जशी खेळासाठी प्रसिद्ध आहे, तशीच ओलि या शब्दापासून सुरु झालेल्या विविध क्षेत्रांमधल्या अनेक स्पर्धा आज होत आहेत. जगभरात सुरु असलेल्या अशा अनेक स्पर्धा आणि ऑलिम्पिकचा इतिहास याचा या लेखात घेतलेला आढावा...
या लेखात आपण ‘ऑलि’ या वर्णमालेतील ऑलिम्पिया, ऑलिम्पिक, ऑलि, ऑलिम्पियाड अन् ऑलिम्पिझम या शब्दांना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.‘ऑलिम्पिक’मध्ये विजय मिळवणं नाही, तर सहभाग घेणं सर्वात महत्त्वाचं आहे, आयुष्यात जिंकणं नाही, तर लढणं सर्वात महत्त्वाचं आहे. (पिएर द कुबेर्तान). ’ऑलिम्पिक 2024’ साठी भारताचे क्रीडापथक आता एकेकजण करत भारतात परतीच्या प्रवासात असेल. काही आपल्या गावी परतले असतील. कांस्य पदक मिळवणार्या स्वप्नील सुनील कुसाळे याची पुण्याजवळील म्हाळुंगे बालेवाडीत जंगी मिरवणूक जशी काढण्यात आली, तसे ‘ऑलिम्पिक’ला जाऊन आलेले सगळे आपापल्या ठिकाणी स्वागत स्वीकारत असतील व आपले ‘ऑलिम्पिक’ कथाकथन करत असतील.
मराठमोळा नेमबाज स्वप्नील कुसाळे ह्या पदक विजेत्या चमूतील, हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावची नेमबाज मनू भाकर हीने देशाला ह्या ‘ऑलिम्पिक’मध्ये पहिलं पदक मिळवून दिले. अचूक नेम साधतानाचा त्या नेमबाजांचा खेळ दूरचित्रवाणीवर आपण बघितला असेल, तर आपल्याला मनू भाकरचे भगवद्गीतेतील विचार आठवतील. तिच्या मनात स्पर्धेच्या वेळी हेच गीतेतले विचार होते. तिने ते विचार आपल्यासमोर प्रकटही केले. त्यात ती सांगते की, कृष्णाने अर्जुनाला केवळ लक्ष्यावर ध्यान देण्यास सांगितलं होतं. तेच अंतिम फेरीत माझ्या डोक्यात सुरू होते. आज भारतीय युवक युवती ह्याच गीतामृताची पाठराखण करत ह्या ‘ऑलिम्पिक’चा विचार जगापुढे मांडत परतत आहेत, त्यातील काही पदकांची कमाई करुन परतत आहेत तर पी.व्ही. सिंधू असो अथवा भारोत्तोलनात कांस्यविजेतीपेक्षा केवळ एक किलो वजनाने पदकापासून वंचित राहिलेली मणिपूरची साइखोम मीराबाई चानू असो, ह्यांच्यासारख्यांना एकही पदक मिळालं नसलं तरी ते खेळाडू, कडवी झुंज देत नाउमेद न होता पॅरिसमधील अनुभवांची शिदोरी भरुन घेत घरी येत आहेत. हेच ‘ऑलिम्पिक’चं खरं गमक भारतीयांनी जाणलं आहे. ह्याच आधुनिक ‘ऑलिम्पिक’चे जनक मानल्या जाणार्या पिएर द कुबेर्तान यांच्या प्रारंभी उल्लेख केलेल्या विधानात खेळांचंच नाही, तर जगण्याचं सूत्रही सामावलं आहे. महाभारतात भगवंतांनी पार्थाला हेच सांगितलं आहे की आयुष्यात जिंकणं नाही, तर लढणं सर्वात महत्त्वाचं आहे, आणि त्यासाठी तुला फक्त कृती करण्याचा अधिकार आहे, फळाचा कधीही नाही. ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।’ ‘ऑलिम्पिक 2024’ च्या स्पर्धेत देशाला पदक मिळवून देण्यासाठी भारतीयच नव्हे तर, पाचही खंडांतील क्रीडापटू मनापासून असेच लढले आहेत.
प्रारंभी आपण ज्यांचे सुविचार जाणून घेतले त्या कुबेर्तान यांच्या प्रयत्नांतूनच 23 जून 1894 रोजी आयओसी म्हणजेच ’आंतरराष्ट्रीय ‘ऑलिम्पिक’ समिती’ची स्थापना झाली, हे अनेकजण जाणतात. पण त्या आधीच प्रत्यक्षात प्राचीन ग्रीसमध्ये, इसवीसन पूर्व आठव्या शतकात, म्हणजे सुमारे 2 हजार 700 वर्षांपूर्वी या क्रीडास्पर्धांची सुरुवात झाली होती. त्यानुसार ग्रीकांसाठी ‘ऑलिम्पिक’ हा एक धार्मिक उत्सवही होता. ग्रीक संस्कृतीत यूस हा देवांचा राजा मानला जायचा. त्याच्या सन्मानार्थ ‘ऑलिम्पिया’ ह्या ठिकाणी या खेळांचं आयोजन केलं जायचं. कालांतराने हे खेळ मागे पडत गेले आणि काहींना त्यांचा साफ विसर पडला होता. ते विस्मृतीत गेलेले ‘ऑलिम्पिक’ पुन्हा नवीन पद्धतीत चालू करणार्या पिएर द कुबेर्तान ह्या फ्रेंच जहागीरदाराला तेव्हा त्यासाठी प्रेरणा मिळाली होती ती , इंग्लंडमधल्या ’वेनलॉक ऑलिम्पिक गेम्स’मधून. ‘मच वेनलॉक’ गावी जन्मलेले डॉ. विल्यम पेनी ब्रुक्स यांनी आपल्या परिसरातील तरुणांना शिस्त लागावी, त्यांची तब्येत सुधारावी अशा उद्देशानं 1850 साली वेनलॉक ऑलिम्पिक गेम्सची सुरुवात केली होती. या वेनलॉक क्रीडा स्पर्धांमधूनच पिएर द कुबेर्तान यांना आधुनिक ‘ऑलिम्पिक’ खेळांच्या आयोजनाची प्रेरणा मिळाली. कुबेर्तान हे शिक्षणतज्ज्ञ होते. ते श्रीमंतही होते. कुबेर्तान इंग्लंडमधल्या शाळांच्या कामाच्या पद्धतीवर संशोधन करण्यासाठी गेले असताना, त्यांना तिथे खेळावर कसा भर दिला जातो, खेळातून मूल्यशिक्षण देता येतं, आणि समाजाविषयी जागरुकता कशी निर्माण करता येते, याची जाणीव झाली.
कुबेर्तान यांचे फ्रान्समधल्या शाळांमध्ये क्रीडासंस्कृती रुजवण्याचे प्रयत्न म्हणावे तसे यशस्वी झाले नाहीत. पण त्या सगळ्यांतून त्यांना प्राचीन ‘ऑलिम्पिक’चं पुनरुज्जीवन करण्याची प्रेरणा मिळाली. कुबेर्तान यांच्या प्रयत्नांतून फ्रान्समध्ये 23 जून 1894 ‘ रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’ची स्थापना झाली. दोनच वर्षांत ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये, पहिल्या आधुनिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन देखील करण्यात आलं. आज पॅरिसमधील ऑलिम्पिक 2024ची ही 33वी आवृत्ती आपण बघत आहोत.
आजपर्यंतच्या ऑलिम्पिक स्पर्धेतून ऑलिम्पिझम हे ऑलिम्पिकचे स्वतंत्र तंत्रविज्ञान तयार करण्यात आज कुबेर्तान यशस्वी झालेला दिसतोय. त्या ऑलिम्पिझम या संकल्पनेला सगळ्यांनीच जाणून घेणं गरजेचं आहे. 1890च्या दशकात कुबेर्तान आधुनिक ऑलिम्पिक खेळांची योजना आखत असताना, ऑलिम्पिकची कल्पना अधिक स्पष्टपणे परिभाषित केली. ऑलिम्पिक चार्टरमध्ये ते जीवनाचे तत्वज्ञान, शरीर, इच्छा आणि मन या गुणांचा समतोलपणे उत्थान आणि संयोजन म्हणून व्यक्त केले आहे. खेळात संस्कृती आणि शिक्षण यांचे मिश्रण करून, प्रयत्नांचा आनंद, चांगल्या उदाहरणाचे शैक्षणिक मूल्य, सामाजिक जबाबदारी आणि सार्वत्रिक मूलभूत नैतिक तत्त्वांचा आदर यावर आधारित जीवनाचा मार्ग तयार करण्याचा प्रयत्न ऑलिम्पिझम करतो. उत्कृष्टता, मैत्र, आदर, भेदभाव न करणे, शाश्वतता, मानवतावाद, सार्वत्रिकता, एकता ही अशी अनेक जीवनमूल्य सकारात्मक सामाजिक बदल घडवण्यासाठी ऑलिम्पिझम आपल्याला शिकवत.
ऑलिम्पिझम ज्यांच्यात रुजलेल असतं, असे ऑलिम्पिकपटू समाजकार्याला वाहून घेत असतात. समाजाच्या भल्यासाठी खेळातील सामर्थ्य आणि तटस्थता वापरण्याची ऑलिम्पिकपटूंची विशेष क्षमता असते, जिथे गरज असेल तिथे सामाजिक एकसंधता वाढवण्यासाठी त्यांची अद्वितीय क्षमता ते वापरतात. ऑलिम्पिकपटू अर्थात ऑलिम्पियन हे उत्कृष्टता, संघकार्य आणि शिस्तीची मूल्येदेखील व्यक्त करतात - ते सर्व जातीय, धार्मिक आणि सामाजिक विभाजनांमध्ये समुदायांना एकत्र आणण्यात मदत करण्यासाठी आदर्श म्हणून काम करू शकतात. जगभरात लाखो आजी-माजी ऑलिम्पियन आहेत. या सर्वांना पाठिंबा देणे, सर्व ऑलिम्पियन्सच्या फायद्यासाठी त्यांच्या आयुष्याच्या सर्व टप्प्यांवर कार्य करणे, हे ध्येय असणारी एक जागतिक संघटनाही अस्तित्वात आहे. पाचही खंडांमध्ये 108 राष्ट्रीय ऑलिम्पियन असोसिएशन पसरलेल्या आहेत. ते ऑलिम्पियन साठी कार्यक्रम आयोजित करतात. भारतीय मुष्टियुद्धपटू मेरी कॉम हिने नोव्हेंबर 2019 मध्ये जागतिक ऑलिम्पियन असोसिएशनचे आभार मानले, कारण ह्या संस्थेने तिला ’ओएलआय’नंतर नाममात्र अक्षरे वापरण्याची परवानगी दिली. ’ऑलि’ हे ऑलिंपियन म्हणून समाजातील खेळाडूंची चालू असलेली भूमिका, ऑलिम्पिक मूल्यांचे जगणे आणि संवर्धन करते. मेरी कॉमने ट्विटरवर ते मान्यता प्रमाणपत्र शेअर केले होते आणि त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार मानले होते. भारताची पहिली ‘ऑलि’ ठरली असल्याने, ती आता मेरी कॉम, ऑलि अशी नावानिशी ओळखली जात आहे.
विद्यावाचस्पती, एमडीसारखीच ही उपाधी मान्यता पावलेली आहे. बिझनेसकार्ड, सीव्ही, सोशल मीडियावर अधिकृतरीत्या ऑलि ही उपाधी जोडू शकता. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर, नीरज चोप्रा आणि अन्य भारतीयांनी अद्वितीय कामगिरी करणे, तसेच विजय अमृतराज आणि लिएंडर पेस यांचा आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणे, हे भारत आणि भारतीय खेळांसाठी अभिमानाचे क्षण आपण नुकतेच अनुभवले. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत, भारतीय नेमबाज मनू भाकर हीच्या ऑलिम्पिक पदकाच्या वार्ता सगळ्यांचा तोंडी असताना, आणि तिचे अभिनंदन होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सगळ्या भारतीयांकडून अजून काही युवकांचे अभिनंदन केले जात होते. ते युवक ऑलि ह्या वर्णमालेतील ऑलिम्पिकचे नव्हे, तर ऑलिम्पियाडचे होते. पॅरिसमध्ये सुरू झालेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना, जागतिक पातळीवर तिरंगा फडकवण्यासाठी देशातील नागरिक विविध माध्यमांतून प्रोत्साहन देत आहेतच आणि असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या ‘मन की बात’ या 112 व्या कार्यक्रमात केलं आहे. पंतप्रधानांनी त्याच संबोधनात आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्याकडून अनुभव जाणून घेतले, तसेच त्यांचं कौतुक आणि अभिनंदन केलं. ह्या ऑलिम्पियाडमधील इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड तयार करण्याची कल्पना 1958 मध्ये स्थापन झालेल्या इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडपासून प्रेरणा घेऊन पूर्व ब्लॉक देशांमध्ये आली.
पहिला इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड म्हणजेच खहिज वॉर्सा, पोलंड येथे 1967 मध्ये आयोजित करण्यात आला होता. जुलै 2024 मध्ये 54 व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचा निकाल जाहीर झाला होता. त्यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण आणि 3 रौप्यपदकं पटकावली. इराणमधल्या इस्फहान इथं 21 ते 29 जुलै या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत रायपूरच्या रिदम केडिया आणि इंदूरच्या वेद लाहोटीनं सुवर्णपदक; तर नागपूरच्या आकर्षक राज सहाय, नोएडाच्या भव्य तरवारींनी कोटामधल्या जय वीर सिंगनं रौप्यपदक पटकावलं. आंतरराष्ट्रीय गणित आणि भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये पदकांची लयलूट केल्यानंतर, भारतीय विद्यार्थ्यांच्या संघाने सौदी अरेबियातील रियाध शहरात रंगलेल्या 56 व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावले आहे. यंदा या स्पर्धेत 94 देशांतील 327 विद्यार्थी सहभागी झाले होते. देशनिहाय पदकतालिकेत यंदा भारत अकराव्या स्थानी आहे. जळगावच्या देवेश पंकज भैया यानं सुवर्ण, मुंबईच्या अवनिश बन्सलनं रौप्य, कश्यप खंडेलवाल यानं कांस्यपदक पटकावलं.
ऑलिम्पिकला प्रेरणा देण्यात फ्रान्समधील शालेय क्रीडा स्पर्धांचा उल्लेख आपण प्रारंभी पाहिला, त्याच युवकांमधून अनेक ऑलिम्पिकपटू घडताना आपण आज बघत आहोत. पण असे युवक फक्त क्रीडाक्षेत्रातच कीर्तिवंत होतात असे नाही, तर शैक्षणिक क्षेत्रातही यशवंत होताना दिसतात. ऑलिम्पियाड त्यासाठी विद्यार्थ्यांच्या मदतीला येते. ऑलिम्पियाड ही एक प्रकारची स्पर्धात्मक परीक्षा असते की जी, उत्कृष्ट क्षमता, प्रतिभा, योग्यता आणि बुद्ध्यांक (IQ) असलेल्या अपवादात्मक विद्यार्थी शोधण्यासाठी सर्व शाळांमध्ये आयोजित केली जाते.
’ऑलिम्पियाड’ हा ग्रीक शब्द असून त्याचा अर्थ चार वर्षांचा कालावधी असा होतो. हा शब्द सुरुवातीला ऑलिम्पिकसाठी वापरला जात होता. ऑलिम्पियाड परीक्षांचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांनी त्यांची शैक्षणिक शक्ती ओळखणे हा आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे. राष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पियाड आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडसाठी उमेदवारांची तयारी आणि निवड करण्यासाठी असतात. ऑलिम्पियाड परीक्षांमुळे अशा विद्यार्थ्यांना त्यांची बुद्धिमत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते. जगभरातील विविध ऑलिम्पियाडची यादी बघितली तर थक्क व्हायला होते. आंतरराष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाडची यादी पुढीलप्रमाणे आहे - आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड, आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड, आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड, आंतरराष्ट्रीय भूगोल ऑलिम्पियाड, आंतरराष्ट्रीय कनिष्ठ विज्ञान ऑलिम्पियाड, आंतरराष्ट्रीय भाषाशास्त्र ऑलिम्पियाड, आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड,इत्यादी विषयांची यादी यात आहे.
शालेय शिक्षण उत्तीर्ण होण्यासाठी बीजगणित, भूमिती, कॅल्क्युलस, सांख्यिकी असा अंतर्भाव असलेला गणित हा विषय प्रमुख असतो. गणित हा विषय अनेक विद्यार्थ्यांना नकोसा वाटणारा तर काहींचा तो लाडका असतो, हे कसेही असले तरी गणित हा विषय शालेय शिक्षणापासून आपल्या जीवनात महत्त्वाचा भाग असतो. गणित आणि खेळणे हे विरोधाभासी वाटू शकते, परंतु कोणत्याही खेळाडूसाठी गणितीय संकल्पना महत्त्वाच्या असतात. सगळ्याच क्रीडा प्रकारांमध्ये नियम, खेळ खेळण्याची पद्धत आणि जिंकण्याची रणनीती यामध्ये विशिष्ट प्रमाणात गणित समाविष्ट असते. हॉकी, फुटबॉलच्या मैदानांत मध्यभागी असलेली वर्तुळे खेळाडूंना खेळ सुरू करण्यासाठी कुठे रांगेत उभे राहायचे हे दाखवतात. दैनंदिन जीवनात भाजी आणण्यास, वाणसामान आणण्यास अशा शुल्लक वाटणार्या बाबींपासून ते घरबांधणी अशा किती तरी बाबतीत गणित जसे आवश्यक असते तसेच ते खेळातही गरजेचे कसे असते, हे आपण जाणून घेतले आहे.
तेव्हा ऑलिम्पिया, ऑलिम्पिक, ऑलि, ऑलिम्पियाड अन् ऑलिम्पिझम ह्यांची ऑलि ही वर्णमाला आपल्या जीवनातील शब्दसागरात आहे की नाही, हे आपण तपासून घेणं गरजेचंच आहे ना!
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
9422031704