“तसं असतं तर मी कधीच बिग बॉस होस्ट केलं नसतं”, 'बिग बॉस'च्या होस्टींगवर महेश मांजरेकरांनी दिलं उत्तर
01-Aug-2024
Total Views | 45
मुंबई : मराठी बिग बॉसची मनोरंजनविश्वात तुफान क्रेझ आहे. नुकताच मराठी बिग बॉसचा ५ वा सीझन सुरु झाला असून या नव्या सीझनचा नवा होस्ट रितेश देशमुख असून तो काय कल्ला करणार हे पाहण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. पण तरीही बिग बॉस फॅन होस्ट महेश मांजरेकर यांना मिस करत आहेत. आधीचे चार सीझन महेश मांजरेकर यांनी गाजवले. वीकेंडचा वार, बिग बॉसची चावडी यात ते त्यांच्या खास शैलीने स्पर्धकांची शाळा घ्यायचे. पण, यंदाच्या सीझनमध्ये ते नसल्यामुळे 'बिग बॉस मराठी ५' तुम्ही का होस्ट करत नाही आहात, याबाबत महेश मांजरेकरांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. त्याबद्दल बोलताना त्यांनी अखेर मोठा खुलासा केला आहे.
अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नुकतीच अमोल परचुरे यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत 'बिग बॉस मराठी ५'बद्दल प्रश्न विचारताच ते म्हणाले, "ज्यावेळी मी बिग बॉस होस्ट करायला सुरुवात केली. तेव्हा फक्त एका वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट होतं. होस्ट करण्याच्या आधी मी कधीच बिग बॉस पाहिलं नव्हतं. मला असं वाटायचं की हे काय बघायचं...पण, नंतर होस्ट करायला लागल्यानंतर बिग बॉस पाहिलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा खूप इंटरेस्टिंग खेळ आहे. मग, एकाचे दोन, दोनाचे तीन आणि तीनाचे चार सीझन मी केले".
पुढे ते म्हणाले की, "पाचव्या सीझनमध्ये त्यांना खरंच वाटलं असेल की मी रिपीटेटिव्ह होत आहे. त्यांना जे हवंय ते कदाचित माझ्यात कमी असेल. पण, जेव्हा मला पहिल्यांदा होस्ट करण्याची संधी दिली होती. तेव्हा मला वाटलेलं की मी का? म्हणजे तेव्हाही खूप स्टार्स होते. त्यामुळे आज रितेशचं नाव ऐकल्यावर मला वाटलं अरे क्या बात है! नशीब त्यांनी पहिल्या सीझनला रितेशला घेतलं नाही. तसं असतं तर मी कधीच बिग बॉस होस्ट केलं नसतं. चार वर्ष मी बिग बॉस खूप एन्जॉय केलं. होस्ट बदलायचा की नाही हे त्यांच्या हातात आहे. मी होस्ट करत असल्याने दरवर्षी बिग बॉस बघायचो..कारण मला ते बोलायला लागायचं. पण, मी यावर्षीही तितक्याच आवडीने बघेन. मी जे काही केलंय त्याचा आनंद आहे. मला वाटतं की लोकांनाही बदल हवा आहे आणि मलाही तो बघायचा आहे".