राज्यातील ‘हिट अँड रन' प्रकरणांवर मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय!
08-Jul-2024
Total Views | 49
मुंबई : राज्यात सध्या ‘हिट अँड रन'च्या घटना वाढल्या असून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या घटनांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रामध्ये ‘हिट अँड रन’ च्या घटनांमध्ये कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाईचे निर्देश त्यांनी दिले आहे.
काही धनदांडगे, राजकारणी लोक त्यांच्या पदाचा गैरवापर करून व्यवस्था वाकविण्याचा प्रयत्न करत असतील तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला आहे. सर्वसामान्य नागरिक हे आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ‘हिट अँड रन’ सारखी प्रकरणे अत्यंत गांभीर्याने हाताळावीत आणि पीडितांना न्याय देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत.
तसेच या प्रकरणांमध्ये कुणीही दोषी असो, मग तो कितीही श्रीमंत, प्रभावशाली, किंवा नोकरशहा, लोकप्रतिनिधींची मुलं तसेच कोणत्याही पक्षाचा असो, त्यांना पाठिशी घातले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्व जनतेसाठी, सुरक्षित महाराष्ट्रासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.