मुंबईतील खड्डे भरण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान

गुंदवली मेट्रो स्‍थानकाच्‍या रस्त्याची दुरुस्ती "जिओ पॉलिमर" तंत्रज्ञानाचा वापर

    26-Jun-2024
Total Views | 35
gundavali


मुंबई, दि.२६ : 
मुंबई महानगरपालिकेच्‍या अखत्‍यारित असणा-या रस्‍त्‍यांची देखभाल दुरुस्‍ती महानगरपालिकेद्वारे नियमितपणे करण्‍यात येत आहे. या अंतर्गत पश्चिम द्रुतगती मार्गावर गुंदवली उन्‍नत मेट्रो स्‍थानका खालील सिमेंट काँक्रिट रस्‍त्‍याचे 'जिओ पॉलिमर' तंत्रज्ञान वापरून काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. जिओ-पॉलिमर काँक्रिट हे नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणास फायदेशीर बांधकाम साहित्य आहे. त्‍याचे प्रमुख वैशिष्‍ट्य म्‍हणजे ते लवकर 'सेट' होते. खडबडीत रस्‍त्‍यांची डागडुजी या पद्धतीने करता येते. त्‍यामुळे वाहतूक सुरळीत होण्‍याबरोबरच स्‍थानिक रहिवाशांनादेखील दिलासा मिळाला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(एमएमआरडीए)ने अंधेरी - पूर्व ते दहिसर-पूर्व मेट्रो रेल्‍वे प्रकल्‍प कार्यान्वित केला आहे. मात्र, या मेट्रो स्थानकाखालील सिमेंट काँक्रिट रस्‍त्‍यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे झाल्याने महामार्गावरील नियमित वाहतूक प्रभावित झाली होती. स्‍थानिक रहिवाशांसह प्रवाशांनी या बाबतच्या तक्रारी महानगरपालिका प्रशासनास केल्‍या. या तक्रारींची अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी गंभीर दखल घेतली. रस्‍ते दुरूस्‍तीकामी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाने नवीन व प्रगत अभियांत्रिकी पद्धतींचा अवलंब करावा, असे स्‍पष्‍ट निर्देश दिले. त्‍यानुसार, रस्‍ते विभागाने पश्चिम द्रुतगती मार्गावर गुंदवली उन्‍नत मेट्रो स्‍थानका खालील सिमेंट काँक्रिट रस्‍त्‍याच्‍या दुरूस्‍तीकामी 'जिओ पॉलिमर' तंत्रज्ञानाचा वापर केला. त्‍यामुळे वाहतूक सुरळीत होण्‍याबरोबरच स्‍थानिक रहिवाशांनादेखील दिलासा मिळाला आहे.

जिओ-पॉलिमर काँक्रिट हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान

जिओ-पॉलिमर काँक्रिट हे नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणास फायदेशीर बांधकाम साहित्य आहे. त्‍याचे प्रमुख वैशिष्‍ट्य म्‍हणजे ते लवकर 'सेट' होते. खडबडीत रस्‍त्‍यांची डागडुजी या पद्धतीने करता येते. वर्दळीचे रस्‍ते, प्रमुख चौक (जंक्‍शन) आदी ठिकाणी पारंपरिक पद्धतीने काँक्रिटीकरण करावयाचे झाल्‍यास वाहतूक पोलिसांच्‍या परवानगीने सुमारे ३० दिवसांचा 'ब्‍लॉक' घ्‍यावा लागतो. त्‍यामुळे प्रवाशांसोबतच नागरिकांचीदेखील गैरसोय होते. यावर पर्याय म्‍हणून बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने आगामी काळात रस्त्यावरील भेगा दुरूस्त करण्यासाठी आणि देखभालीसाठीच्या जिओ-पॉलिमर काँक्रिट सारख्या पर्यांयांचा वापर करावा, अशी शिफारस पवईस्थित भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी, मुंबई) तज्‍ज्ञांनी केली आहे.

खड्डा न करता रस्ता दुरुस्त

जिओ पॉलिमर काँक्रिट पद्धतीचा वापर सिमेंट काँक्रिट रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी प्रामुख्याने करण्यात येतो. सिमेंट काँक्रिटचा रस्ता खराब झाला असेल तर संपूर्ण पृष्ठभाग न काढता खड्ड्यांमध्ये जिओ पॉलिमर काँक्रिट भरले जाते आणि ते मूळ सिमेंट काँक्रिट समवेत एकजीव होते. विशेष म्हणजे या पद्धतीने खड्डे भरल्यानंतर अवघ्या २ तासात रस्ता वाहतुकीसाठी खुला करता येवू शकतो. त्‍यानुसार, बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासन जिओ-पॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. या तंत्रज्ञानाद्वारे दररोज रात्री रस्‍ते दुरूस्‍ती करत दुस-या दिवशी सकाळी वाहतूक सुरळीत ठेवता येते.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121