मुंबई : “आणीबाणीच्या कालावधीत मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या दोन जागांसाठी लागलेल्या निवडणुकीत भारतीय जनसंघाचे उमेदवार डॉ. वसंत कुमार पंडित आणि प्रा. कानिटकर यांचा दणदणीत विजय झाला. त्यावेळी मुंबईतील पदवीधरांनी काँग्रेसच्या आणीबाणीच्या निर्णयाविरोधात मतदान केले. त्यामुळे ज्यांनी आणीबाणी देशावर लादली, त्यांचे आजही वर्तन बदलेले नाही. त्यामुळे त्यांना प्रत्येक निवडणुकीत हरवणे हाच मार्ग आहे,” असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल तथा भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी केले. याबरोबरच पदवीधर निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. भाजप मुंबई कार्यालय, वसंतस्मृती येथे बुधवार, दि. 25 जून रोजी ’आणीबाणी आणि लोकशाहीची हत्या’ या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
नाईक पुढे म्हणाले की, ”49 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली. परंतु, त्या आणीबाणीचा शेवट इंदिरा गांधींच्या पराभवाने झाला. त्यावेळी संपूर्ण देशात भारतीय जनसंघ, रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांना आणीबाणीला विरोध केल्यामुळे अटक करण्यात आली.” जवळपास एक लाख लोकांना आणीबाणीच्या काळात अटक करण्यात आली होती. मात्र, वेगवेगळ्या पत्रकांच्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये जनजागृती केली, अशा अनेक आठवणींचा पट त्यांनी श्रोत्यांसमोर मांडला.
आम्हाला संविधानाची प्रत दाखविणे हा राहुल गांधींचा बालिशपणा
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, ”ज्यांनी संविधानातील मुल्यांची पायमल्ली केली, तेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज आम्हाला संविधानाची प्रत दाखवत आहेत. तो त्यांचा बालिशपणा आहे. काँग्रेसचा अहंकार तेव्हाही आणि आजही कायम आहे. जेवढा अपमान इंदिरा गांधींच्या पापी काँग्रेसने संविधानाचा केला, तेवढा आजवर कोणीच केला नाही. देशाच्या स्वातंत्र्याचे पहिले आंदोलन इंग्रजांविरोधात होते, तर दुसरे आंदोलन काँग्रेसविरोधात होते. इंदिरा गांधी काँग्रेसप्रती इंग्रजांसारखे वागले,” अशी टीका ही त्यांनी केली.
तसेच, “संविधानावर गप्पा मारणार्या काँग्रेसने आणीबाणी लादून संविधानाचा अपमान केला होता, हे विसरू नये. तो दिवस आठवला, तर आजही अंगावर काटा येतो. मात्र, आता तशी परिस्थिती पुन्हा कधीच निर्माण होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत सुरक्षित आहे,” असे विधान या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिलेल्या नफिसा मुजफ्फर हुसैन यांनी केलेे. या कार्यक्रमात भाजप महामंत्री संजय उपाध्याय, ज्येष्ठ नेते मधु चव्हाण, कांताबाई नलावडे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्तेदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्तापिपासू महिलेने लोकशाहीला नख लावण्याचे काम केले
सत्तापिपासू महिलेने दि. 25 जून 1975 रोजी भारताच्या लोकशाही मुल्याला नख लावण्याचे काम केले. त्या महिलेचे नाव म्हणजे इंदिरा गांधी. त्यामुळे आता संविधानावर गप्पा मारणार्या काँग्रेसने आणीबाणी लादून संविधानाचा अपमान केला होता, हे विसरू नये. तो दिवस आठवला, तर आजही अंगावर काटा येतो. मात्र, आता तशी परिस्थिती पुन्हा कधीच निर्माण होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात भारत सुरक्षित आहे.