मुंबई, दि.२५: पावसाळ्यात विना विलंब आणि विनाअडथळा लोकल वाहतूक सुरु राहावी यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे टीमने मे-जून-२०२४ दरम्यान १.५५ लाख घनमीटर गाळ काढला असल्याचा दावा केला आहे.
पावसाळ्यात रेल्वे गाड्या सुरळीत चालवण्यामध्ये असणाऱ्या विविध आव्हानांपैकी एक प्रमुख म्हणजे रेल्वे रुळांवर स्वच्छता राखणे हे आहे. रेल्वे रुळांवर टाकण्यात आलेला कचरा आणि गाळ यामुळे रुळांनाच धोका निर्माण होत नाहीतर यामुळे रेल्वे रुळाखाली जाणारे नाले देखील तुंबतात. या कारणाने पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचते. हे लक्षात घेता मध्य रेल्वेचा मुंबई विभाग हा गाळ आणि कचरा हटविण्यासाठी चोवीस तास अथकपणे काम करत आहे. जेणेकरून पावसाळ्यात रेल्वे रूळ गाळ आणि कचरामुक्त असतील.
मध्य रेल्वे टीमने मे ते जून-२०२४मध्ये एका महिन्यात १.५५ लाख घनमीटर सांडपाणी/कचरा साफ केला आहे, तर मे ते जून-२०२३ या कालावधीत १.३० लाख घनमीटर सांडपाणी/कचरा साफ केला आहे. पोकलेन (२१०,११०) माऊंट केलेल्या डीबीकेएम आणि जेसीबी मशिनच्या साहाय्याने गाळ काढण्याचे आणि गोळा करण्याचे काम केले जात आहे. रेल्वे रुळावर कचरा करू नका किंवा रुळांवर कचरा टाकू नका, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.