राम मंदिर संकुलात शेषावतार मंदिराचा समावेश; अपोलो हॉस्पिटलही सुरू होणार!
01-Jun-2024
Total Views | 44
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : अयोध्या (Ayodhya Ram Mandir) येथे राम मंदिर निर्माण समितीच्या दोन दिवसीय बैठकीचा नुकताच समारोप झाला. या बैठकीत राम मंदिर संकुलाच्या भविष्याला आकार देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मंदिर संकुलात शेषावतार मंदिराचा समावेश आणि अपोलो हॉस्पिटलची सुरूवात, हे त्यापैकी दोन महत्त्वाचे निर्णय आहेत. शेषावतार मंदिराच्या उभारणीसाठी वास्तुविशारद आशिष सोमपुरा यांची नियुक्ती केल्याचे समोर येत आहे. संकुलाच्या चालू विकासातील महत्त्वपूर्ण टप्पे आहेत.
त्याचबरोबर मंदिर ट्रस्टसाठी आणखी एक कार्यालय व मंदिर परिसरात ५०० लोकांची क्षमता असलेले सभागृह बांधण्यावर बैठकीत एकमत झाले. दरम्यान राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी संकुलातील कामाची पाहणी केली. वास्तुविशारद आशिष सोमपुरा शेषावतार मंदिराचे डिझाइन आणि रेखाचित्र तयार करत असून मंदिराचे बांधकाम लवकरच सुरु होणार आहे.
हा प्रकल्प ऑगस्टपर्यंत 'एल अँड टी'कडे सुपूर्द करण्याच्या योजनांसह सुविधा केंद्राचे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अपोलो हॉस्पिटल आणि श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट यांच्यात २५ मे रोजी करार झाला. या बैठकीला ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय, मंदिर बांधकाम प्रभारी गोपाल राव, राम मंदिर वास्तुविशारद आशिष सोमपुरा आणि टाटा आणि एल एण्ड टी चे अभियंते उपस्थित होते.