नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या (आप) खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा स्वीय सहायक (पीए) विभव कुमारचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात मालीवाल प्रकरणात अरविंद केजरीवाल यांचा पीए विभन कुमार याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
विभव कुमार याने २५ मे रोजी न्यायालयात याचिका दाखल केली होती. विभवचे वकील हरिहरन यांनी सुनावणीदरम्यान आरोप केला की शरीराच्या संवेदनशील भागांवर जखमांच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. त्यामुळे हत्या करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच मालीवाल यांना निर्वस्त्र करण्याचा विभवचा हेतू नव्हता. परिणामी या जखमा मालीवाल यांनी स्वत: हून केलेल्या असू शकतात, असा दावा विभव कुमारच्या वकिलांनी केला आहे.
सुनावणीवेळी पिडीत स्वाती मालीवालदेखील उपस्थित होत्या. विभव कुमारच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकून त्यांना भर न्यायालयातच रडू फुटले. त्या म्हणाल्या, विभव हा सामान्य माणूस नसून तो मंत्र्यांना मिळणाऱ्या सुविधा वापरत आहे. त्यामुळे त्याला जामीन मिळाला तर आपल्या जीवाला धोका असल्याची भिती मालीवाल यांनी व्यक्त केली आहे.