मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेना विरुद्ध उबाठा थेट लढत! रवींद्र वायकरांना उमेदवारी जाहीर
30-Apr-2024
Total Views | 113
मुंबई : शिवसेनेने नुकतीच मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर हे महायूतीचे अधिकृत उमेदवार राहणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा थेट सामना रंगणार असल्याचे बोलले जात आहे.
एकेकाळी रवींद्र वायकर यांना उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जात होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ठाकरेंची साथ सोडत काही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. त्यानंतर आता मंगळवार, ३० एप्रिल रोजी शिवसेनेने त्यांना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचे तिकीट दिले आहे.
रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरी येथील कथित भूखंड घोटाळ्याचा आरोप असून याप्रकरणी ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, त्यांनी उबाठा गटाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या उमेदवारीची चर्चा रंगली होती. आता यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दुसरीकडे, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात उबाठा गटाने अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध उबाठा असा सामना रंगणार आहे.