मुंबई, दि.२५: घर खरेदीदारांना भविष्यात पार्किंग संबंधित समस्यांना सामोरे जायला लागू नये यासाठी सदनिका नोंदणीच्या वेळी दिल्या जाणाऱ्या नियतवाटप पत्रात आणि केल्या जाणाऱ्या विक्री करारांमध्येच पार्किंगचा सर्व तपशील असलेले जोडपत्र जोडणे बंधनकारक केलेले आहे. या जोडपत्रात जेथे पार्किंग दिले जाणार आहे तिथला क्रमांक, पार्किंगचा आकार, उंची, रुंदी, पार्किंगचे इमारतीतील ठिकाण याबाबतच्या सर्व तपशीलाचा उल्लेख करावा लागणार आहे. यात कुठल्याही त्रुटी राहू नये यासाठी महारेराने या जोडपत्राचा आदर्श मसुदाही जारी केला आहे.
विकासकांकडून विकत घेतलेल्या आच्छादित, मेकॅनिकल, गॅरेज पार्किंग मध्ये इमारतीच्या बीममुळे वाहन पार्क करता येत नाही, पार्किंग लहान असल्याने वाहन पार्क करता येत नाही, वाहन पार्क केल्यानंतर बाहेर पडायला जागा नाही, दरवाजा उघडताच येत नाही या आणि अशा अनेक तक्रारी पार्किंगच्या अनुषंगाने महारेराकडे आलेल्या आहेत. महारेराने याची गंभीर नोंद घेतली आहे. डिसेंबर २२ मध्ये महारेराने जारी केलेल्या प्रमाणित विक्री करारात दैवी आपत्ती, चटई क्षेत्र, दोष दायित्व कालावधी आणि हस्तांतरण करार ह्या बाबी प्रत्येक विक्री करारात बंधनकारक केलेल्या आहेत. याबाबत घर खरेदीदाराच्या संमतीने कुठलेही बदल केलेले असले तरी ते महारेराला मान्य होणार नाही, असे महारेराने जाहीर केलेले आहे.
महारेराने आता या चार निकषांमध्ये पार्किंगचाही समावेश केला आहे. येथून पुढे पार्किंगचे संपूर्ण तपशील असलेल्या विहित जोडपत्राबाबत महारेरा आग्रह राहणार आहे. यामुळे पार्किंगच्या अनुषंगाने वाद उद्भवून नवीन जागेत गेल्यानंतर जो मनस्ताप घर खरेदीदारांना सहन करावा लागतो , तो येथून पुढे सहन करावा लागणार नाही. यापूर्वीही महारेराने ३० जुलै २०२१ ला परिपत्रक जारी करून पार्किंगच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या होत्या. मात्र पार्किंगबाबत आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने ग्राहकहित अधिक संरक्षित करण्यासाठी, हे नवीन परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे.