मुंबई, दि.१८: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई आणि उपनगरात विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरु आहेत. यासोबतच नवी मुंबई आणि ठाणे या परिसरातही एमएमआरडीच्या माध्यमातून मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांची कामे सुरु आहेत. अशातच ठाण्यातील तीन हात नाका, एलबीएसमार्ग येथील रस्त्यावर पडलेल्या एका खड्डयांचे छायाचित्र पोस्ट करत सोशलमिडीयावर आलेल्या तक्रारीचे एमएमआरडीएकडून २४ तासांच्या आत निवारण करण्यात आले आहे.
आज सर्वच प्राधिकरणे आणि सरकारी कार्यालये ही सोशलमिडीयावर आपल्या कामाची प्रसिद्धी करताना दिसून येतात. अशातच अनेक सुजाण नागरिक आपल्या तक्रारी प्राधिकरणापर्यंत पोहोचविण्यासाठी याच सोशलमिडीयाचा प्रभावीपणे वापर करताना दिसतात. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, सर्व विभागीय कार्यालये, एमएमआरडीए, सिडको, महत्वाची सरकारी कार्यालये, सर्व जिल्हाधिकारी कार्यालये, प्राधिकरणांवरील अधिकारी हे सोशलमिडीयावर नागरिकांकडून आलेल्या तक्रारींचा योग्य पाठपुरावा करत असल्याचे दिसून येते. तर अनेक तक्रारी लवकरात लवकर सोडविण्यावर प्राधिकरणे भर देताना दिसत आहे.
ठाणे जिल्ह्यातील एका सामाजिक कार्यकर्ता असणाऱ्या एक्स वापरकर्त्यानी दि. १७ एप्रिल रोजी तीन हात नाका, एलबीएस मार्ग येथे टाटा इन्फ्राने बांधलेल्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे लोकांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. याबाबतचे ट्विट छायाचित्रासह पोस्ट केले. तसेच,याबाबत टाटा अधिकाऱ्यांना रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विचारल्यावर त्यांनी एमएमआरडीएकसून निधी मिळत नसल्याची तक्रार केल्याचा उल्लेखही या एक वापरकर्त्याने आपल्या ट्विटमध्ये केला. ठाणे शहर आणि या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी या ट्विटला दिलेल्या प्रतिसादामुळे केवळ २४ तासांच्या आत एमएमआरडीएने या तक्रारीची दाखल घेतली. इतकेच नाहीतर एका रात्रीत हा रास्ता दुरुस्तही केला. त्यामुळे या वापरकर्त्याने दुरुस्त केलेल्या रस्त्याचे फोटो शेअर करत एमएमआरडीए आणि टाटा इन्फ्राचे आभार मानले.