सनातनद्वेषी द्रमुकविरोधात तामिळ जनतेच्या मनात रोष – पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारतीय आस्थेप्रती नकारात्मकता ही तर काँग्रेसची परंपरा; वैयक्तिक नव्हे, जागतिक कल्याणासाठी भारत कटीबद्ध
15-Apr-2024
Total Views | 42
1
नवी दिल्ली: सनातनद्वेषातूनच द्रमुकचा जन्म झाला आहे. मात्र, या सनातनद्वेषी पक्षाला तामिळी जनता आता कंटाळली असून त्यांचा द्रमुकचा रोष भाजपकडे सकारात्मक पद्धतीने वळतो आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी एका मुलाखतीत केले आहे.
एशियन न्यूज इंटरनॅशनलच्या (एएनआय) संपादक स्मिता प्रकाश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली मुलाखत सोमवारी सायंकाळी प्रसारित करण्यात आली. यावेळी पंतप्रधानांनी विविध राजकीय मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. तामिळनाडूमध्ये भाजपला मोठी संधी असल्याचे संकेत पंतप्रधानांनी मुलाखतीत दिले. ते म्हणाले, जनसंघापासून भाजपच्या जवळपास पाच पिढ्यांनी तामिळनाडूमध्ये पक्षासाठी खस्ता खाल्ल्या आहेत. काँग्रेसपासून निराश झालेल्या तामिळी जनतेने प्रादेशिक पक्षांवर विश्वास ठेवला होता. मात्र, या प्रादेशिक पक्षांनीही त्यांचा भ्रमनिरास केला आहे. भ्रष्टाचार आणि घराणेशाहीस तामिळी जनता आता कंटाळली असून द्रमुकविषयी त्यांच्या मनात रोष निर्माण झाला आहे. त्याचवेळी त्यांनी केंद्रातील आमच्या सरकारचे काम बघितले आहे, जगभरात भारताचा वाढलेला दबदबाही ते बघत आहेत. त्यामुळे द्रमुकप्रती त्यांच्या मनात असलेला रोष भाजपकडे सकारात्मकरित्या वळत असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
सनातनद्वेषातूनच द्रमुकचा जन्म झाल्याचा टोला पंतप्रधानांनी लगावला. ते पुढे म्हणाले, द्रमुकचा सनातनदेष समजू शकतो. मात्र, काँग्रेसला या सनातनद्वेष्ट्यांसोबत जाण्याची नेमकी काय गरज आहे, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा ठरतो. काँग्रेसच्याच इंदिरा गांधी या रुद्राक्ष धारण करत असत, त्यामुळे काँग्रेसने आपल्या सनातनद्वेषाची चिकीत्सा करण्याची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे उत्तर विरुद्ध दक्षिण असा वाद उभा करणारे, केंद्र विरूद्ध राज्य संघर्ष असल्याचा दावा करणारे पक्ष आणि मोदी सर्वसत्ताधीश झाल्यास लोकशाहीस धोका असल्याचा बालिश विचार पसरविणारे विदेशी प्रसारमाध्यमांना भारत नेमका समजलाच नसल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.
निवडणुकीतून काळ्या पैशाला हद्दपार करण्यासाठीच निवडणूक रोखे योजना होती, याचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला. एकेकाळी निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी पैसा येत होता, रोख्यामुळे त्यावर पायबंद बसणे शक्य होते. त्याचप्रमाणे ईडी, सीबीआयची कारवाई आणि ईव्हीएमविषयी अपप्रचार करणारे आपल्या पराभवाचे कारण शोधत आहेत. मात्र, आता भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनण्यासोबतच २०४७ पर्यंत विकसित होण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी सज्ज झाल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
श्रीराम मंदिरास राजकीय मुद्दा काँग्रेससह विरोधी पक्षांनी बनविला आहे. ज्यावेळी जनसंघाचा – भाजपचा जन्म झालाच नव्हता, त्याचवेळी या मुद्द्याचे समाधान करणे शक्य होते. अगदी देशाच्या फाळणीनंतरही ते करणे शक्य होते. मात्र, लांगुलचालनासाठी हा मुद्दा जिवंत ठेवण्यात आला. त्यासाठी न्यायालयाचही श्रीराम मंदिरास विरोध करण्यात आला होता. मात्र, हिंदू समाजाने ५०० वर्षांचा संघर्ष – बलिदान आणि दीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर लोकसहभागातून मंदिर उभारले. त्यावेळीही प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण त्यांनी नाकारले. असाच प्रकार स्वातंत्र्यानंतर सोमनाथ जीर्णोद्धारावेळी केला होता. त्यामुळे भारताच्या मूळ आस्थेस विरोध करणे हेच काँग्रेसचे धोरण असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
के. अण्णामलाई यांचे तामिळनाडूस कौतुक
तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांचे पंतप्रधानांनी मुलाखतीत विशेष कौतुक केले. ते म्हणाले, अण्णामलाई यांनी भारतीय पोलिस सेवेतून बाहेर पडून भ्रष्टाचाराविरोधात लढा सुरू केला आहे. त्यासाठी त्यांनी द्रमुक अथवा अन्य पक्षाची निवड न करता भाजपची निवड केली आहे. ही बाब तामिळी जनतेस अगदी भावली आहे. त्यामुळे त्यांच्याप्रती राज्यात मोठे आकर्षण आहे, असे पंतप्रधान म्हणाले.