पवार आमच्यासोबत येण्यास ५० टक्के तयार! प्रफुल्ल पटेलांचा दावा
11-Apr-2024
Total Views | 78
मुंबई : आम्ही सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शरद पवार ५० टक्के आमच्यासोबत येण्यास तयार झाले होते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. एएनआय या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही त्यांच्या या वक्तव्याला दुजोरा दिला आहे.
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, "२ जुलै २०२३ रोजी अजित पवार आणि आमचे मंत्री महाराष्ट्र सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर १५ आणि १६ जुलैला दोनदा आम्ही शरद पवारांची मुंबईत भेट घेतली. आम्ही त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांना आमच्यात सामील होण्याची विनंती केली. आम्हाला तुमच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे, असे आम्ही त्यांना सांगितले. पुढे अजित आणि शरद पवार यांची पुण्यात एका उद्योगपतींच्या घरी भेट झाली. आमची त्यांच्याशी चर्चा सुरु होती आणि शरद पवार आमच्यासोबत येण्यासाठी ५० टक्के तयार होते," असा दावा त्यांनी केला आहे.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली. "मी निवडणूकांच्या वेळी काही बोलणार नाही पण हे सत्य आहे," असे म्हणत त्यांनी प्रफुल्ल पटेलांच्या विधानाला दुजोरा दिला आहे. राज्यात सध्या लोकसभा निवडणूकांची रणधूमाळी सुरु आहे. अशातच प्रफुल्ल पटेल यांनी हा मोठा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.