‘मेरी आवाज ही पेहचान है’… लतादीदींच्या सुरमय आठवणी!

    06-Feb-2024
Total Views | 98

Lata Mangeshkar


मुंबई :
‘मेरी आवाज ही पेहचान है” हे सुमधुर गाणे आजही ऐकले की गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो. साधी राहणी जरी असली तरी लतादीदींनी संगीत क्षेत्रात केलेल्या अजरामर कारकिर्दीला जगात तोड नाही. आज ६ फेब्रुवारी लता दीदींचे दुसरा पुण्यस्मरण दिवस. याच निमित्ताने त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा..
 
आपल्या सुमधुर गायनाने केवळ देशातीलच नाही, तर जगभरातील श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा आवाज म्हणजे गायिका लता मंगेशकर. आजही त्या आपल्यात नाहीत, या गोष्टीवर विश्वास ठेवणे खरं तर कठीणच जाते. अगदी एखादी पूजा असो वा देशाप्रती प्रेम व्यक्त करण्याचा दिवस... एकही समारंभ लता मंगेशकर यांच्या गाण्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.
 
बालपणापासूनच दीदी आपले वडिल आणि पहिले गुरू पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून गायनाचे धडे घेत होत्या. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी लतादीदींनी वडिलांच्या संगीत नाटकांमधून कामं करण्यास सुरुवात केली. लतादीदींच्या गायनकलेत कायमच त्यांच्या पंडित दीनानाथ मंगेशकर यांची छटा जाणवायची. मात्र, वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी लता दीदींचे पितृछत्र हरपले. त्यांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी दीदींवरच आली. आपल्या कुटुंबासाठी मनोरंजन विश्वात काम करण्याचा निर्णय दीदींना घेतला.
 
सुरुवातीला लता मंगेशकर यांनी मराठी चित्रपटात अभिनेत्री म्हणून कारकिर्द सुरु केली होती. त्यानंतर तर त्या गायनाकडे वळल्या. १९४५ साली लता मंगेशकर मुंबईत आल्या आणि त्यांनी उस्ताद अमानत अली खान यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. यानंतर अवघ्या एका वर्षातच त्यांच्या वाट्याला पहिले हिंदी गाणे आले. ज्याचे बोल होते ‘पा लागूँ कर जोरी’. या संगीतप्रवासाची सुरुवातच इतकी दमदार झाली की दीदींनी कधी मागे वळून पाहिलेच नाही.
 
हिंदी सिनेसृष्टीतील प्रत्येक संगीतकार, गायक यांच्यासोबतीने लतादीदींनी गाणी गायली. केवळ भावगीत आणि देशभक्तीपार गीतंच नव्हे दीदींनी गझल आणि प्रेमगीते देखील गायली. दीदींच्या आवाजाची जादू २० पेक्षा अधिक भाषांमध्ये श्रोत्यांना ऐकण्याची पर्वणी मिळाली. दीदींच्या नावे १९७४ ते १९९१ या कालावधीत २५ हजार गाणी गात ‘सर्वाधिक रेकॉर्डिंग’चा हा बहुमान नोंद केला गेला. ‘मेरी आवाजही पहचान है...’ या गाण्याच्या बोलाप्रमाणेच गान कोकिळा लता मंगेशकर त्यांच्या सुमधुर सुरांमुळे आजही चाहत्यांच्या मनात अजरामर आहेत.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121