श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर पाडूनच...! एएसआयने 'या' ऐतिहासिक दस्तावेजाच्या हवाल्याने केला खुलासा
04-Feb-2024
Total Views | 377
लखनौ : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जागी असलेले मंदिर उद्ध्वस्त केल्यानंतर मुघल शासक औरंगजेबाने तेथे शाही ईदगाहची इमारत बांधली होती. अशी माहिती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) ने ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे दिली आहे. माहिती अधिकारांतर्गंत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, एएसआयने ही माहिती दिली.
उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील रहिवासी अजय प्रताप सिंह यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे देशभरातील मंदिरांची माहिती मागवली होती. यामध्ये मथुरा येथील श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाबाबतही प्रश्न विचारण्यात आला होता. या उत्तरात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, आग्रा यांनी ऐतिहासिक नोंदींचा हवाला दिला आहे.
आरटीआयमध्ये दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, ब्रिटिश राजवटीत १९२० मध्ये अलाहाबाद येथून प्रसिद्ध झालेल्या राजपत्रात यूपीच्या विविध जिल्ह्यांतील ३९ स्मारकांची यादी देण्यात आली आहे. यामध्ये ३७ व्या क्रमांकावर श्रीकृष्णाचे जन्मस्थान कटरा केशवदेव भूमीचा उल्लेख आहे. मशिदीच्या जागी पूर्वी कटरा टेकडीवर केशवदेव मंदिर होते, ते पाडून मशीद बांधण्यात आली, असे त्यात म्हटले आहे.
मथुरेचे केशवदेव मंदिर हे एक अतिशय प्राचीन मंदिर आहे, जे सुमारे पाच हजार वर्षे जुने आहे. कंसाच्या कारागृहात ज्या ठिकाणी श्रीकृष्णाचा जन्म देवकीच्या पोटी झाला, त्या ठिकाणी नंतर केशवदेव मंदिर बांधण्यात आले, असे सांगितले जाते. श्रीकृष्णाचे पणतू व्रज आणि व्रजनाभ यांनी राजा परीक्षित यांच्या मदतीने हे मंदिर बांधले होते. ज्याचा इतर राजांनी वेळोवेळी जीर्णोद्धार केला.
मुघल आक्रमक औरंगजेबाने १६७० मध्ये मथुरेतील केशवदेवाचे मंदिर पाडण्याचा हुकूम जारी केला होता, असा हिंदू पक्षाचा दावा आहे. त्यानंतर तेथे शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली. या मशिदीत स्वतः औरंगजेब नमाज अदा करण्यासाठी आला होता, असे सांगितले जाते.
मथुरेतील हा वाद १३.३७ एकर जमिनीच्या मालकी हक्काशी संबंधित आहे. श्री कृष्ण जन्मस्थानभूमीकडे १०.९ एकर जमीन आहे, तर शाही इदगाह मशिदीकडे अडीच एकर जमीन आहे. हिंदू बाजू या संपूर्ण जमिनीवर आपला दावा करते. हिंदू बाजूनेही ईदगाहची रचना हटवून श्रीकृष्ण जन्मस्थानी मंदिर बांधण्याची मागणी केली आहे.