मुंबई : राज्य सरकारने अयोध्येत आणि श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही घोषणा केली. याशिवाय राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध घोषणा करण्यात आल्या.
राज्यातील पर्यटकांना आणि भाविकांना किफायतशीर दरात उत्तम सुरक्षित सुविधा पुरवण्यासाठी जम्मु काश्मीरमधील श्रीनगर आणि श्रीरामजन्मभुमी अयोध्या इथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी राज्य शासनाने अतिशय मोक्याची जागा उपलब्ध करुन घेतली असून या जागांसाठी ७७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.
तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी शाश्वत पर्यटन धोरण आखण्यात येणार आहे. राज्यातील ५० पर्यटन स्थळांची निवड करुन त्याठिकाणी थीम पार्क, साहसी खेळ, शॉपींग मॉल, वॉटर पार्क आणि निवासी व्यवस्था करण्यात येत आहे. लोणार, अजिंठा वेरुळ, कळसूबाई भंडारदरा, त्र्यंबकेश्वर आणि कोकणातील सागरी किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटनासाठी उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. कोकण विभागात पर्यटनाला चालना देण्यासाठी शिवकालीन ३२ गडकिल्ल्यांचे नुतनीकरण आणि संवर्धन करण्यात येणार असल्याची घोषणाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे.