"सत्ता नसल्यामुळे जाती धर्मांमध्ये दंगली पेटवण्याचं कामं सुरु आहे!"

ज्योती वाघमारेंची शरद पवारांवर नाव न घेता टीका

    26-Feb-2024
Total Views |

Sharad Pawar & Jyoti Waghmare


मुंबई :
स्वत:कडे सत्ता नसल्यावर जाती धर्मांमध्ये दंगली पेटवण्याचं काम सुरु आहे, अशी टीका शिवसेना नेत्या ज्योती वाघमारेंनी शरद पवारांचे नाव न घेता केली आहे. तसेच ५० वर्षांनंतर दुसऱ्याच्या खांद्यावर बसून रायगडावर तुतारी वाजवायला जाणाऱ्यांना जे जमलं नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी करुन दाखवलं आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत. मनोज जरांगेंकडून सतत राज्य सरकारवर करण्यात आलेल्या टीकेला त्यांनी आता प्रत्युत्तर दिले.
 
ज्योती वाघमारे म्हणाल्या की, "महाराष्ट्र हा शिवछत्रपतींचा आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या कुठल्याही मागणीबाबत सरकार सकारात्मक राहिलेलं आहे. आपण शांतपणे विचार केल्यास आपल्या एक लक्षात येईल की, मनोज जरांगेंच्या मागण्या सतत बदलत्या राहिलेल्या आहेत. कधी ते फक्त मराठवाड्यातील कुणब्यांपुरतं बोलतात, कधी सरसकट आरक्षण देण्याची भुमिका घेतात तर कधी सगेसोयऱ्यांबद्दल बोलतात. या प्रत्येक मागणीला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे."
 
"मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने शांततेत मोर्चे काढले. तसेच मुख्यमंत्री स्वत: त्यांना दोनदा भेटायला गेलेत आणि मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याची क्रांतीकारी भुमिका घेतली. सगळं मिळूनही जर पुन्हा पुन्हा आंदोलनाची भाषा होत असेल तर मग या आंदोलनाचा उद्देश आंदोलन आहे की, राजकारण आहे याचा विचार सुज्ञ मराठा समाजबांधवांनी आणि महाराष्ट्राने करावा," असे त्या म्हणाल्या.
 
त्या पुढे म्हणाल्या की, "जे लोक ५० वर्षांनंतर दुसऱ्याच्या खांद्यावर बसून रायगडावर तुतारी वाजवायला गेले त्यांना जे जमलं नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी करुन दाखवलं आहे. त्यामुळे आंदोलनाच्या पाठीमागून जर कुणी मराठा समाजबांधवांची डोकी भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या लोकांना मराठा समाजबांधवांनी ओळखावं," असं आवाहन त्यांनी केलं आहे.
 
"कोण कुणाची तुतारी वाजवत आहे आणि कुणाच्या कानात कोण फुंकत आहे, हे सुज्ञ महाराष्ट्राला कळून चुकलं आहे. स्वत:कडे सत्ता नसल्यावर जाती धर्मांमध्ये दंगली पेटवणं ही कामं सुरु आहेत. सरकार सकारात्मकपणे प्रतिसाद देत असताना लोकांची माथी भडकावण्याची कुणीही भुमिका घेऊ नये आणि आंदोलनाला हिंसक वळण देऊ नये, अशी माझी नम्र विनंती आहे. जे लोकं आंदोलनाच्या तव्यावर स्वत:च्या राजकारणाची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असतील त्यांना मराठा समाजबांधवच उघडे पाडतील," असेही त्या म्हणाल्या आहेत.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121