ठाणे : महायुती सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले असतानाही मराठा समाजाची ढाल करून मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन शनिवारी ठाण्यात देखील मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोकोचा प्रयत्न करण्यात आला. मात्र,पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने मराठा आंदोलकांना कॅडबरी जंक्शन उड्डाणपुलाखाली ताब्यात घेण्यात आले. बारावीच्या परीक्षा सुरु असल्याने ठाण्यात प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन केल्याचे मराठा समाजातर्फे सांगण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले आणि त्याचा मोठा प्रश्न मार्गी लागला. या निर्णयाचे ठाणेकरांनी स्वागत केले. त्याचवेळी ओबीसी मधून मराठ्यांना हक्काचे टिकणारे आरक्षण मिळावे, याकरिता जरांगे पाटील यांची राज्यभरात आंदोलन सुरू आहेत.राज्य सरकारने परिपत्रक काढुन कुणबी प्रमाणपत्र सापडलेल्याच्या सगेसोयरे यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली. मात्र त्याची अंमलबजावणी सरकारने केली नाही. सहा लाख हरकती आल्याने त्यांचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदे विधिमंडळात घेतली.
त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला आहे. त्यानुसार आज राज्य भरात रास्ता रोको करण्यात आले. ठाण्यातील मराठा कार्यकर्त्यांनी वर्तकनगर, कॅडबरी चौक, यासह चार ठिकाणी आंदोलन केले. बारावीची परिक्षा लक्षात घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात घोषणबाजी करण्यात आली. या रास्ता रोको आंदोलन प्रकरणी पोलिसांनी दत्ता चव्हाण, डॉ. पांडुरंग भोसले, कृष्णा पाटील, दिनेश पवार, निखिल जाधव, सागर भोसले, प्रवीण कदम, सूरज कोकाटे, विश्वास पाटील, रमेश चौधरी, शरद जगदाळे, तानाजी पोळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.