नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! तब्बल ५५ नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
24-Feb-2024
Total Views | 104
नांदेड : नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून अनेक नगरसेवकांनी अशोक चव्हाण यांना पाठिंबा दिला आहे. शनिवारी तब्बल ५५ नगरसेवकांनी अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी नांदेडमध्ये चव्हाणांचे भव्य स्वागत करण्यात आले.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण हे पहिल्यांदाच नांदेड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या उपस्थितीत नांदेडमधील ५५ पेक्षा जास्त नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.
यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, "१२ तारखेपासून २४ तारखेपर्यंत या १२ दिवसांत जो बदल घडला त्यानंतर नांदेडमध्ये आल्यावर तेवढंच उत्स्फुर्त स्वागत केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. मला अनेकांनी विचारलं की, तुम्ही अचानक भाजपमध्ये कसे काय गेलात. मोदीजींनी विकसित भारताची घोषणा केली आणि मी मनाशी गाठ बांधली आता विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित नांदेड ही भुमिका घेऊन चालायचं आहे. नांदेड जिल्ह्याची विकासाची भूक पुर्ण करायची आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या मागील कार्यकाळातील नगरसेवकांशी आज विस्तृत चर्चा झाली. सुमारे ५५ हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व माजी नगरसेवकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन व स्वागत करतो," असेही ते म्हणाले.