पाळीव प्राण्यांच्या नोंदणीसह लसीकरणही!; पालिकेचे विविध संस्थांच्या मदतीने विशेष अभियान

    19-Feb-2024
Total Views |
Vaccination along with pet registration

मुंबई
: बृहन्मुंबई महानगरपालिकेने यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ॲनिमल्स आणि झीमॅक्स टेक सोल्युशन प्रा. लिमिटेड या सेवाभावी संस्थेच्यावतीने मुंबईतील पाळीव प्राण्यांची नोंदणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेद्वारे महानगरातील विविध सदनिका, बंगले, सोसायटीमधील नागरिकांकडे असलेल्या पाळीव प्राण्यांची माहिती संकलित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी गट प्रत्येक सोसायटीला भेट देणार आहेत. मुंबईकर नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेऊन कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
 
प्राणी कल्याण करणे व त्यासोबतच प्राण्यांपासून मानवामध्ये होणारे संक्रमण टाळण्यासाठी पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबालसिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. आश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे माणसांना होणाऱ्या संक्रमणाचा धोका कमी करणे तसेच श्वानांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्यावतीने 'मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प' अंतर्गत भटक्या श्वानांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी नुकतेच अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यानंतर आता पाळीव प्राण्यांची देखील नोंदणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

महानगरपालिकेचे पथक घरोघरी करणार सर्वेक्षण

मुंबई शहरातील पाळीव प्राण्यांच्या लोकसंख्येबद्दल महत्त्वाची माहिती गोळा करण्यासाठी एक व्यापक सर्वेक्षण करत आहेत. यामध्ये प्राण्यांचे आरोग्य, लसीकरण स्थिती आणि नोंदणी याविषयी तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रतिनिधी बृहन्मुंबईतील प्रत्येक सोसायटीला भेट देणार आहेत.

मुंबईकरांचा सहभाग महत्त्वाचा!

पाळीव प्राण्यांच्या निरोगी आयुष्यासाठी तसेच रेबीज आणि लेप्टोस्पायरोसिस यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबईकरांनी देखील मुंबई महानगरपालिकेला सहकार्य करावे. त्यासाठी https://www.pets-survey.org/bm या लिंकवर आपल्याकडे असलेल्या पाळीव प्राण्यांची नोंद करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.