८८ किलो चांदी, सव्वा किलो सोने, इटलीत लाखोंची मालमत्ता! 'इतक्या' कोटींच्या मालकीण आहेत सोनिया गांधी
16-Feb-2024
Total Views | 68
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. आपल्या अर्जात त्यांनी आपल्या संपत्तीचा देखील खुलासा केला आहे. सोनिया गांधी उमेदवारी अर्जात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे त्यांच्या मूळ देशात म्हणजेत इटलीमध्ये अजूनही संपत्ती आहे. यासोबतच त्याच्याकडे ८८ किलो चांदी आणि १..२८ किलो सोने आणि दागिने आहेत. याशिवाय त्यांची दिल्लीतही जमीन आहे.
सोनिया गांधी यांनी नुकताच राजस्थानमधून राज्यसभेच्या उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या चल आणि अचल मालमत्तेची माहिती दिली आहे. प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली एकूण संपत्ती १२.५३ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये त्यांनी शेतजमीन, पुस्तकांचे उत्पन्न, सोने-चांदी, बँकेत जमा केलेले पैसे आदी माहिती दिली आहे.
सोनिया गांधी यांनी सांगितले की त्यांच्याकडे १.२८ किलो सोने आणि ८८ किलो चांदी आहे, ज्याचे बाजार मूल्य अंदाजे १.०७ कोटी आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे ९०,००० रुपये रोख आहे. तर ५.३० लाख रुपये एचडीएफसी बँकेच्या खात्यात आहेत. त्यांच्याकडे ३.८८ कोटी रुपयांची म्युच्युअल फंड गुंतवणूक देखील आहे. त्यासोबतच २८.५३ लाख रुपयांचे रोखे खरेदी केले आहेत.
सोनिया गांधी यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे, त्यांच्याकडे यंग इंडिया लिमिटेड कंपनीतही त्यांचे शेअर्स आहेत, त्याबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. याशिवाय त्यांना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसकडून १.६९ लाख रुपयांची रॉयल्टी मिळते. अशा प्रकारे, त्यांची एकूण चल संपत्ती ६.३८ कोटी आहे. मात्र, त्यांच्याकडे स्वत:ची कोणतीही गाडी नाही.
अचल संपत्तीबाबत, त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे दिल्लीतील डेरामंडी गावात ३ बिघा (२५२९.२८ चौरस मीटर) शेतजमीन आहे, ज्याची किंमत २३,२८० रुपये प्रति चौरस मीटर या दराने ५.८८ कोटी आहे. याशिवाय त्यांना इटलीतील वडिलोपार्जित मालमत्तेतही हिस्सा मिळाला आहे, ज्याचे बाजार मूल्य २६.८३ लाख आहे. अशा प्रकारे त्यांच्याकडे एकूण ६.५३ कोटी रुपयांची अचल संपत्ती आहेत.