“आम्ही सन्मानाने मरु का शकत नाही?” दिलीप प्रभावळकरांचा विचार करायला लावणारा प्रश्न

    14-Feb-2024
Total Views | 54

dilip prabhavalakr
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : इच्छामरण या विषयावर आत्तापर्यंत कधी मनमोकळेपणाने बोलले गेले नाही. किंवा कोणत्या माध्यमातून तो विषय मांडला गेला नाही. मात्र, ‘आता वेळ झाली’ या चित्रपटातून दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि यात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. याच चित्रपटाच्या निमित्ताने दिलीप प्रभावळकर यांच्याशी ‘महाएमटीबी’ने गप्पा मारल्या.
 
आता वेळ झाली या चित्रपटात सक्रिय इच्छामरण या विषयावर भाष्य करण्यात आले आहे. चित्रपटाबद्दल बोलताना दिलीप प्रभावळकर म्हणाले की, “काळाच्या पुढचा विचार करणाऱ्या क्रांतीकारक शशीधरची भूमिका मी साकारली आहे. त्या माणसाचं असं मत आहे की, जर आपण आपलं जगणं कसं असलं पाहिजे याचं नियोजन करु शकतो, तर मरणाचं नियोजन का करु शकत नाही? तसेच, सरकारकडून ज्या सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातात त्या जर आम्हाला वयोवृद्ध झाल्यानंतर गरजेच्या काही जणांना वाटत नसतील तर त्यांना इच्छामरण का दिले जाऊ शकत नाही असा प्रश्न सडेतोडपणे विचारणारा हा सामान्य माणूस आहे. आणि अशी व्यक्तीरेखा मी यापुर्वी कधीच केली नसल्यामुळे माझ्यासमोर आव्हान होतं आणि या भूमिकेला मला योग्य न्याय द्यायचा होता”.
 
पुढे ते असं देखील म्हणाले की, “प्रत्येक कलाकार उत्तमोत्तम कलाकृतींच्या शोधात असतो आणि माझा तो शोध पुन्हा एकदा आता वेळ झाली या चित्रपटाच्या निमित्ताने पुर्ण झाला. आणि इच्छामरणाविषयी असा विचार करणाऱ्या माणसाची भूमिका साकारताना एक कलाकार म्हणून माझी विचारसरणी फार प्रगल्भ झाली”, असेही प्रभावळकर म्हणाले.
 
'आता वेळ झाली' या चित्रपटाचा भावनिक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. पासष्टी पार केलेल्या शशिधर लेले आणि रंजना लेले यांची इच्छामरणाची परवानगी मिळवण्यासाठीची धडपड यात दिसत आहे. समाजाचा या विषयाप्रती असलेला दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे. यात दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी यांच्यासह भारत दाभोळकर, सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, जयंत वाडकर, अभिनव पाटेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 
डेल्ल्लास आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, शारजाह फिल्म्स प्लॅटफॉर्म इंटरनॅशनल फेस्टिव्हल अशा अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हजेरी लावणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत नारायण महादेवन यांनी केले असून इमेजीन एंटरटेन्मेंट अँड मीडिया, अनंत नारायण महादेवन फिल्म्स यांच्या सहयोगाने 'आता वेळ झाली' या चित्रपटाचे दिनेश बंसल, जी. के. अग्रवाल आणि अनंत महादेवन निर्माते आहेत. २३ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांना हा चित्रपट चित्रपटगृहात पाहता येणार आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121