ठाणे : ठाणे-मुलुंड दरम्यान होत असलेल्या नवीन रेल्वे ( Railway ) स्थानकाच्या कामात रेल्वेच्या उच्च दाब वीज वाहिनीचा अडथळा होत आहे. तेव्हा, स्थानकाचे काम थांबु नये यासाठी यावर महिनाभरात तोडगा काढण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
केंद्र व राज्य सरकार आणि ठाणे महापालिकेच्या प्रयत्नातुन ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या सुमारे १४ एकर जागेवर ठाणे आणि मुलुंड दरम्यान विस्तारीत नवीन ठाणे रेल्वे स्थानक बांधण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकल्पात ३.७७ एकर जमिनीवर रेल्वे काम करणार असून १० एकरवर ठाणे महापालिका काम करणार आहे. या स्थानकाच्या कामासाठी एकूण रु. ११९ कोटी ३२ लक्ष तसेच जोडरस्ते आणि आजुबाजुचा परिसर विकसीत करणेसाठी रु. १४३ कोटी ७० लक्ष असा एकूण रु. २६३ कोटी ०२ लक्ष इतका खर्च येणार आहे. यामध्ये रेल्वे परिचलन क्षेत्रामधील ट्रॅक बांधणे, रेल्वे स्टेशन इमारत बांधकाम बांधणे आदी अनुषंगिक कामे रेल्वेकडून तर,परिचलन क्षेत्राच्या बाहेरील डेक, रॅम्प आदी अनुषंगिक कामे स्मार्ट सिटीच्यावतीने करण्यात येत आहेत. त्या कामाची पाहणी आयुक्त राव यांनी नुकतीच केली.
या पाहणी दरम्यान या प्रकल्पाशी निगडित वेगवेगळ्या विषयांची आयुक्तांनी माहिती घेतली. मध्य रेल्वेच्या मार्गावरून जाणाऱ्या उच्च दाब वीज वाहिनीमुळे काम थांबू नये, यासाठी आयुक्तांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना १५ डिसेंबरपर्यंत तात्पुरती उपाययोजना आणि महिनाभरात पर्यायी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच, या वाहिनीचा टॉवर हटवून ही वाहिनी भूमिगत करण्याबाबत रेल्वे, महापालिका आणि महावितरण यांनी एकत्रित मार्ग काढावा, असेही आयुक्तांनी सांगितले. नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याबाबतही तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही आयुक्त राव यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.
नवीन रेल्वे स्थानक असे असेल
नविन रेल्वे स्थानक १४.८३ एकर जागेवर होणार असून त्यापैकी ३.७७ एकर जागेवर रेल्वे रूळ व तळमजला अधिक दोन मजली इमारत उभी राहणार आहे हे काम रेल्वे करणार आहे.या स्थानकांवर एकूण तीन फलाटांपैकी एक होम प्लॅटफॉर्म आणि तीन पादचारी पुल असणार आहेत. परिचालन क्षेत्राचे काम ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेतून होत आहे. स्थानकाच्या इमारती समोर १५० मीटर लांब व ३४ मीटर रुंद असा सॅटिस डेक असणार आहे. तर २.५ एकर जागेमध्ये २५० चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी पार्किंग आहे.