
मुंबई : सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या जवळचे मानले जाणारे अण्णासाहेब डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बुधवार, ३० जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, आ. विक्रांत पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. याप्रसंगी अण्णासाहेब डांगे यांचे दोन सुपुत्र माजी नगराध्यक्ष राजेंद्र उर्फ चिमण डांगे आणि माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे यांच्यासह ईश्वरपूर येथील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अण्णासाहेब डांगे यांनी भाजपच्या वाटचालीत मोलाचा वाटा दिला. ते आता पुन्हा एकदा आपल्या घरात परत आले आहेत. आम्ही लहान कार्यकर्ते असल्यापासून प्रमोदजी, गोपीनाथजी अण्णा या सगळ्यांनी खूप कष्टातून या पक्षाला मोठे केले आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवले. अण्णासाहेब डांगे संघ आणि जनसंघापासून या पक्षात काम करत होते. त्यांनी आपल्या जीवनातील अतिशय महत्वाचे वर्ष भारतीय जनसंघाला दिले. त्यानंतर सातत्याने मिळेल ती जबाबदारी पार पाडली."
अण्णांनी कधीही मूळ विचारावर प्रहार केला नाही
"मी महापौर असताना टँकरमुक्त महाराष्ट्र यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तयार करण्यात आले आणि त्याचा सदस्य म्हणून मला अण्णांसोबत काम करण्याची संधी मिळाली. अण्णांचे स्थान पक्षात खूप मोठे होते. गोपीनाथजी अण्णांबरोबर सल्लामसलत केल्याशिवाय कधीच निर्णय घेत नव्हते. दुर्दैवाने त्या काळात काही गैरसमज तयार झाले आणि अण्णांनी परखड आणि थेट भूमिका घेतली. पण ज्यावेळी ते दुसऱ्या पक्षात गेले त्यावेळी सर्वच कार्यकर्त्यांना दु:ख झाले. पण दुसऱ्या पक्षात काम करत असताना अण्णांनी कधीही मूळ विचारावर प्रहार केला नाही. आता जेव्हा ते मला भेटायला आले तेव्हा आपल्या घरात परत येण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. अण्णांसारखे जेष्ठ नेते भाजपमध्ये आल्यामुळे पक्षाला एक शक्ती लाभेल," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सांगलीतून अजून काही पक्ष प्रवेश होतील का? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "तुम्हाला जो प्रवेश अपेक्षित आहे तो आमच्या मनात सध्यातरी नाही."